स्त्रियांच्या सौंदर्यात वय या घटकाची खूप मोठी भूमिका असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सौंदर्यात लक्षणीय बदल होतात. काही बदल हे आव्हानात्मक असतात. या बदलांच्य परिणामावर मात करण्यासाठी मग विशेष काळजी घ्यावी लागते. तिशी आधी त्वचेसंबंधी निर्माण होणार्या समस्या पटकन बर्याही व्हायच्या. मात्र तिशी नंतर त्वचेसंबंधी उद्भवणार्या समस्या लवकर बर्या होत नाहीत. त्वचा कोरडी होने, कोरड्या त्वचेमुळे होणारे त्रास, उन्हामुळे काळी पडणारी त्वचा अशा अनेक समस्या निर्माण होतात.
30 नंतरच्या सौंदर्य समस्या
- त्वचेतील पेशींच्या उलाढालीचा कालावधी 28-35 दिवसांचा होतो. हाच कालावधी पूर्वी कमी दिवसांचा असायचा. त्याचा परिणाम म्हणून त्वचेवर मृत पेशी साठतात आणि त्वचा खराब होते.
- त्वचेच्या पेशींच्या उलाढालीचा वेग मंदावल्यानं त्वचेचा वरचा भाग ओलसर राहाणं अवघड होतं. त्वचा आळशी दिसते. खराब आणि शुष्क होते.
- कोलॅजन आणि इलॅस्टिन सारखी प्रथिनं त्वचेचं आरोग्य राखण्यास महत्त्वाची असतात. तिशी नंतर ही प्रथिनं तयार होण्याच्या व्यवस्थेत बिघाड होतो. तसेच त्वचेत असलेली ‘ह्यॅलुरेनिक अँसिड नामक साखर कमी होते. त्याचा परिणाम म्हणून कपाळावर सुरकुत्या दिसतात. हसताना ओठ आणि नाकाच्या आजूबाजूला सुरकुत्या दिसतात.
- तिशी नंतर संप्रेरकांमधे होणार्या बदलांमुळे चेहेर्यावर मोठे फोड येतात. ते दुखतात. तरुण वयातल्या मुरुम पुटकुळ्यांपेक्षा हे फोड वेगळे असतात. मोठे दिसतात आणि बरे होण्यासही वेळ लागतो. हे फोड दुखतात. त्यामुळे चेहेर्यावर कायमस्वरुपी डाग लागण्याची शक्यता असते.
- तिशी नंतर शरीरातला शुष्कपणा वाढतो. चेहेर्यावर काळे डाग पडतात आणि ते लवकर जातही नाही.
तिशीनंतर त्वचेत होणारे हे बदल काळजी वाढवणारे असले तरी योग्य काळजी घेतल्यास या बदलांचे परिणाम जाणवत नाही आणि दिसतही नाही. यासाठी प्रसिध्द सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी सांगितलेले सौंदर्य नियम तेवढे पाळावे लागतील.
30 नंतर त्वचेची काळजी कशी घ्याल?
* चेहेरा स्वच्छ करण्याच्या बाबतीत जागरुक राहायला हवं. एरवी साबण पाण्यानं चेहेरा धुणं म्हणजे चेहेरा स्वच्छ करणं नव्हे. उलट साबण पाण्याचा वापर करुन चेहेरा जास्त वेळ धुतल्यास त्याचा तोटाच होतो.
* रात्री झोपण्याआधी मऊ कापसानं चेहेर्यावर असलेली क्रीम पुसुन टाकावी. रात्री डोळ्याभोवती क्रीम लावू नये. त्यामुळे दुसर्या दिवशी डोळे सुजतात.
* त्वचा तेलकट असेल तर चेहेर्याला क्रीम आणि मॉइश्चरायझर लावू नये.
* त्वचा कोरडी असेल तर क्लींजिग क्रीम किंवा जेल वापरावं. आणि त्वचा तेलकट असेल तर फेस वॉशनं चेहेरा धुवावा.
* त्वचा जर मिश्र स्वरुपाची असेल तर क्लीजिंग मिल्क किंवा लोशन वापरलं तरी चालतं.
* तेलकट त्वचा असेल तर झेंडूच्या फुलांचा लेप उपयुक्त ठरतो. त्यासाठी झेंडूची फुलं कोमट पाण्यात रात्रभर भिजत घालावीत. सकळी त्यात दही आणि चंदन पावडर घालून मिक्सरमधे त्याचं दाटसर मिश्रण तयार करावं. हा लेप डोळे आणि ओठ सोडून संपूर्ण चेहेर्याला लावावा. 20 मिनिटानंतर चेहेरा धुवून घ्यावा.
* तेलकट त्वचेसाठी आणखी एक उपाय आहे. दोन चमचे ओटस, एक चमचा बदाम, गुलाब पाणी, मध आणि दही घालावं. हे उटणं चेहेर्यास लावावं. 20 मिनिटानंतर चेहेरा धुवावा.
* ज्यांची त्वचा सामान्य आहे किंवा कोरडी आहे त्यांनी अर्ध्या चमच्या मधात एक चमचा बदामचं तेल आणि दोन चमचे मिल्क पावडर मिसळावी. हे मिश्रण एकजीव करावं. हा लेप चेहेर्याला लावावा. वीस मिनिटानंतर चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा धुतल्यानंतर त्वचा मऊ झाल्याचं जाणवतं. दुधाच्या पावडरमधे त्वचा मऊ करण्याचे गुणधर्म असतात. बदामाचं तेलही त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
* त्वचा तेलकट, कोरडी किंवा मिश्र असली तरी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ग्रीन टी स्क्रब लावावा. हा स्क्रब तयार करण्यासाठी ग्रीन टीच्या पानांची तीन चमचे पावडर घ्यावी. आणि जितक्या चमचे पावडर घेतली तेवढंच त्यात दही आणि मध घालावं. मिश्रण घट्ट राहू द्यावं. हे मिश्रण चेहेर्याला लावून काही मिनिटं थांबावं आणि मग चेहेरा पाण्यानं धुवावा. त्वचा ही जर अति संवेदनशील असेल तर हे स्क्रब वापरु नये.