Join us  

तिची फिगर भारी आहे, आपणच कसे गबाळे ? -असा प्रश्न पडतो, त्याचं हे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 3:49 PM

आपला कम्फर्ट, आत्मविश्वास आणि फिटनेस वाढवायचा. मग फिगरच नाही आपणच सुंदर दिसायला लागतो.

ठळक मुद्देमुळात फिगर ही गोष्ट वजन आणि डाएटपेक्षाही फिटनेसवर अवलंबून असते हेच आपण मुळात लक्षात घेतलेलं नसतं.

गौरी पटवर्धन

सुंदर दिसणे यात कपडे, मेकअप, स्किन, केस असल्या गोष्टींच्याही आधी येणारी गोष्ट म्हणजे फिगर. चांगली फिगर असणं हा सुंदर दिसण्यासाठी फारच मोठा गुण असतो. पण ती फिगर कमवायची कशी हे मात्र आपल्याला जाम लक्षात येत नाही.

त्यासाठीची सुरुवात आपण अर्थातच डाएटने करतो. मग रोज एकच फुलका खाणं, भात बंद, बाहेरचं खाणं पूर्ण बंद असले अघोरी प्रकार सुरु होतात. ते अर्थातच काहीच दिवसात ढासळतात.

कारण एका दिवसाला एकच फुलका खाऊन कुणी कसं जगेल? कामासाठी बाहेर फिरणाऱ्यांना बाहेर खाणं पूर्णपणे बंद करणं ऑलमोस्ट अशक्य असतं. त्यामुळे मग हळूचकन आपल्याच डाएटचे नियम मोडले जातात आणि आपली फिगर आहे तशीच राहते.

मग त्याला कंटाळून आपण जरा अभ्यास करून डाएट करायचं ठरवतो. मग त्यात कमी कार्बोहायड्रेट्स, शून्य कार्बोहायड्रेट्स, हाय प्रोटीन, हाय फॅट, लो फॅट, पॅलिओ, इंटरमिटंट फास्टिंग, स्मूदीज असे अनेकानेक प्रकार आपला गोंधळ वाढवतात. मग आपण त्यातलं काहीतरी एक निवडतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. 

पण… अं हं! आपल्या फिगरने ठरवलेलं असतं की आपण मुळीच आपला शेप सोडायचा नाही. शिवाय घरात आधीच चार माणसांचा स्वयंपाक करून वर आपल्यासाठी वेगळं काहीतरी रांधायचं मुळात कठीण, त्यात ते बेचव असतं. मग आपणच केलेला पास्ता इतर लोक खात असतांना आपण सॅलडचा बाऊल घेऊन बसायचं हेही शक्य होत नाही. त्यामुळे हेही डाएट लौकरच कोलमडतं.

यदाकदाचित कोणाला इतका मनाचा निग्रह टिकवता आलाच तर त्यांचं वजन कमी होतं खरं, पण फिगर काही छान होत नाही. काहीजणी या प्रकारात बारीक होतात, पण त्यांची फिगर त्यांना हवी तशी होत नाही. कारण मुळात फिगर ही गोष्ट वजन आणि डाएटपेक्षाही फिटनेसवर अवलंबून असते हेच आपण मुळात लक्षात घेतलेलं नसतं. ते एकदा लक्षात आलं की आपल्याला हे समजतं, की व्यायाम करणाऱ्या मुली रूढ अर्थाने कशाही दिसणाऱ्या असल्या तरी सुंदर का दिसतात.

त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या फिट असतात. त्यांचे मसल्स टोन्ड असतात. त्यांचं पोश्चर छान असतं. आणि मुख्य म्हणजे केवळ व्यायाम आणि फिटनेस यातूनच येऊ शकणारा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे भरपूर असतो. अशा वेळी त्यांना ऑलमोस्ट कुठलेही कपडे चांगले दिसतात, कारण फिगर चांगली असते.

त्यामुळे आपल्याला जर फिगर चांगली हवी असेल, तर डाएटची मदत घ्यावीच लागते. पण दिवसाकाठी थोडा तरी व्यायाम केल्याशिवाय आपल्याला जी स्टायलिश फिगर अपेक्षित असते ती होऊ शकत नाही.

कारण फिटनेसमुळे जो कॉन्फिडन्स येतो तो इतर कशानेच येत नाही. 

नुसतं वजन कमी असल्याने कॉन्फिडन्स येत नाही, पण सलग पाच किलोमीटर पळू शकण्याने, पन्नास सूर्यनमस्कार घालता येण्याने, वेगवेगळी आसनं करता येण्याने मात्र भरपूर कॉन्फिडन्स येतो.

आणि तो एकदा आला की फॅशन बिशन नसली तरी चालतं!

आपण आपल्याला सुंदर वाटण्यासाठी काय करायचं? आपला कम्फर्ट, आत्मविश्वास आणि फिटनेस वाढवायचा. मग फिगरच नाही आपणच सुंदर दिसायला लागतो.

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्स