- डॉ. केतकी गोगटे
आपला चेहेरा हीच आपली ओळख. आणि त्वचा हा चेहेऱ्याचा मुख्य घटक. आपला चेहेरा तेव्हाच छान दिसतो जेव्हा, आपली त्वचा निरोगी आणि सुदृढ असते. त्वचेचं आरोग्य सुधारणं हाच सुंदर दिसण्याचा मुख्य मार्ग आहे त्वचेचं आरोग्य हे ब्यूटी प्रोडक्टसवर अवलंबून नसतं. तर आहार हाच त्वचेचं आरोग्य जपण्याचा मुख्य मार्ग आहे. यु आर व्हॉट यू इट असं म्हणतात. आणि ते खरंच आहे. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर , त्वचेवर परिणाम होतो. आपण जे आणि जसं खातो तशी आपली त्वचा होते आणि आपला चेहेरा म्हणजे आहारातून पोटात जाणाऱ्या पोषणमूल्यांचा आरसाच असतो. आताचा काळ हा अन्न घटकांच्या अनुपलब्धतेमुळे होणाऱ्या तशा प्रकारच्या कुपोषणाचा नाही. त्यामुळे कुपोषणामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात असं नाही. उलट अतिपोषण आणि चुकीचं पोषण यातून त्वचेच्या समस्या निर्माण होतात. चुकीचं खाणं, नको तेच अति खाणं म्हणजे एक प्रकारचं कुपोषणच. तर सध्या त्वचेशी सांंधित समस्यांना या प्रकारचं कुपोषण कारणीभूत ठरत आहे.
आहार नियम नीट पाळले नाही तर त्याचा परिणाम चेहेऱ्यावर दिसतो. त्वचा कोरडी होते. सुरकुत्या पडतात. त्वचा सैल पडते. पेलाग्रा सारखे आजार होतात. ज्यात त्वचेचा दाह होतो.
अॅक्ने ही त्वचेची मुख्य समस्या. वयात येणाऱ्या मुलींना ही अॅक्ने समस्या असणं म्हणजे त्यांच्या चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं ही सर्वसामान्य बाब आहे . त्यावर उपचारांची गरज पडत्त नाही. पण जेव्हा ही अॅक्ने समस्या गंभीर होते, मुरुम, पुटकुळ्यांमुळे चेहेरा बिघडतो, चेहेऱ्यावर डाग आणि खड्डे पडायला लागतात तेव्हा ही समस्या सोडवताना प्रामुख्याने आहाराचा विचार करावा लागतो. प्रौढ वयातही अॅक्नेपासून महिलांना मुक्ती हवी असते.
- क्रॅश डाएटमुळेही चेहेऱ्यावर पुटकुळ्या येतात. तसेच जिममुळेही चेहेऱ्यायावर मुरुम, पुटुकूळ्या येतात. कारण जिममधे व्यायाम सुरु केला की प्रथिनांचं सेवन वाढवलं जातं. आणि कर्बोदकांचं कमी केलं जातं. या अती प्रथिनांचा नकारात्मक परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.
- थायरॉइड समस्येतही पिंपल्स असतात. या प्रकारचं हार्मोनल असंतुलन हे आहारावर खूप अवलंबून असतं.
आहारातून त्वचेचं आरोग्य कसं सांभाळायचं?
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड खायला हवं. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे ज्यामुळे साखर एकदम वाढत नाही. कॉर्नफ्लेक्स , चहा, ज्यूस यात थेट साखर असते. मैद्याचे पदार्थ खाल्याने साखर पटकन वाढते. त्यामुळे आहारात लो ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ असणं गरजेचं आहे. त्यासाठी फळं , उसळी, ओटमिल यांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ पचवायला शरीराला वेळ लागतो. त्यामुळे शरीरातील साखरही हळूहळू वाढते. साखर वाढली नाही की मुरुम पुटकुळ्याही येत नाही.
- रंगीत फळं, रंगीत भाज्या या आहारात असायलाच हव्यात. रंगीत फळं आणि भाज्या यामधे अॅण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतात. हे अॅण्टिऑक्सिडण्टस त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असतात. अॅण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण ज्यांच्यात कमी असतं त्यांची रखरखीत आणि खडाडीत होते. अॅण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचा मऊ राहाते.
- रंगीत भाज्या आणि फळांमधे कारोटेनॉइडस असतात. काही कारोटेनॉइडसचं अ जीवनसत्त्वात रुपांतर होतं. आणि त्वचेसाठी अ जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं. यामुळे त्वचेतल्या पेशींची पुर्ननिर्मिती होते आणि त्वचा ताजी तवानी दिसते.
- भाज्या आणि फळांमधे क जीवनसत्त्व असतं. क जीवनसत्त्वामुळे त्वचेचं आरोग्य सांभाळणाऱ्या कोलॅजनची निर्मिती होते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर रंगीत फळं आणि भाज्या यांचं सेवन आवश्यक आहे.
- बदाम, अक्रोड, जवस, चिआ सीडस यांचं सेवन करावं. कारण यातून त्वचेला सेलेनिअम, ओमेगा ३, ओमेगा ६ सारखे अत्यावश्यक फॅटी अॅसिडस मिळतात. फॅटी अॅसिडमुळे कोलॅजनची निर्मिती होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.
- दही, ताक असे दुधाचे पदार्थ खावेत.
- त्वचेच्या आरोग्यासाठी गुड र्काा या वर्गातील कर्बोदकं महत्त्वाची असतात. म्हणून भाज्या, फळं, शेंगा, कडधान्यं खावीत. हे पदार्थ लो ग्ग्लायसेमिक इंडेक्स असलेले आहेत. त्यामुळे साखर वाढून त्वचेच्या समस्या निर्माण होत नाहीत.
- कच्च्या भाज्या सॅलेड स्वरुपात खाव्यात. यातून तंतुमय घटक शरीरात जातात. यामुळे पोट साफ राहातं. शरीरातील विषारी घटक याद्वारे बाहेर पडतात. तंतुमय पदार्थ त्वचेचं आरोग्य सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. - पाणी हा आहारातला मुख्य घटक. पुरेसं पाणी पिल्यानं त्वचेचं आरोग्य सांभाळलं जातं. त्वचा ओलसर राखण्यास, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास पाणीच मदत करतं. पाणी जर कमी प्यायलं गेलं तर चेहेरा ओढल्यासारखा दिसतो. त्वचा निस्तेज होते.
त्वचेच्या आरोग्यासाठी काय टाळायला हवं?
- एव्हरीथिंग दॅट कमस इन पॅकेट ते टाळायला हवेत. मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ,बेकरीचे पदार्थ हे टाळायला हवेत.
- फळांचे ज्यूस न घेता अख्ख्या स्वरुपात फळं खायला हवीत. ज्यूसमुळे शरीरात साखरेचं पाणीच जातं. ते हानिकारक असतं. फळांमधला चोथा हा महत्त्वाचा असतो.
- दुधाचे पदार्थ चालतात. पण दूध सेवन टाळायल हवं. कारण त्यामुळे इस्ट्रोजन हे हार्मोन्स वाढतं. आणि त्यामुळेही त्वचा खराब होते. हल्ली गाईंना हार्मोंन्सची इंजेक्शनं दिली जातात. दुधाद्वारे हे हार्मोनस आपल्याही शरीरात जातात, म्हणून दूध टाळायला हवं.
- हाय ग्ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जे चटकन साखर वाढवतात ते टाळायला हवेत. जसे मैद्याचे ब्रेड, पांढरा तांदूळ, केक, कुकीज, गोड पदार्थ, वेफर्स, फ्रूट योगर्ट हे पदार्थ टाळायला हवेत.
- रिफाइंड कर्बोदकं असलेले पदार्थ टाळावेत. जसे मैद्याचे ब्रेड , वेफल्स, पेस्ट्रीज, पिझ्झा हे पदार्थ रिफाइंड कर्बोदकं आहेत. ती टाळायला हवीत.
आहाराचे हे नियम पाळल्यास त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि चेहेरा छान दिसतो.
( त्वचाविकार तज्ज्ञ, हार्मोनी हेल्थ हब , नाशिक)
शब्दांकन- माधुरी पेठकर