आपली वजन, उंची, शरीराचा बांधा, रंग हे सगळे आपल्याला जन्मत: मिळालेले असते. या सगळ्या गोष्टी अनुवंशिक असण्याची शक्यताच जास्त असते. आपले आई-वडिल, आजी-आजोबा यांच्या गुणसूत्रांवरुन आपली शारीरिक ठेवण साधारणपणे ठरते. एकदा एखाद्याची ठेवण विशिष्ट प्रकारची असेल तर त्यामध्ये आपल्याला बाह्यरित्या फारसा बदल करता येत नाही. आपला रंग, उंची, दिसणे हे जसे आपल्याला जन्मत: मिळालेले असते त्याचप्रमाणे आपल्या नखांची ठेवण ही अनेकदा आपली आई किंवा वडील यांच्यासारखीच असते. आपण नखांना कितीही शेप दिला किंवा वेगवेगळी नेलपेंट लावून ते आकर्षक दिसावेत यासाठी प्रयत्न केला तरी आपल्या नखांचा नैसर्गिकरित्या एक विशिष्ट आकार असतोच. आपल्या नखांचा हाच आकार आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपल्याला काही गोष्टी सांगतात. पाहूयात कशाप्रकारच्या नखांच्या लोकांचा व्यक्तिमत्त्व कसे असते (What Does Your Nail Shape Say About You)...
१. लांब नखे
तुमची नखे लांबसडक असतील तर तुमचे मन सतत संभ्रमावस्थेत असण्याची शक्यता जास्त असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशाप्रकारची नखे असणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूची वाढ ही दोन्ही बाजूने झालेली असते. अशा लोकांची कल्पनाशक्ती तर अफाट असतेच, पण दुसरीकडे ते लॉजिकलही असतात. आजूबाजूचे वातावरण अशा लोकांना सहज व्यापून टाकते, त्यामुळे त्यांची जगाकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.
२. लहान पण आडवी नखे
रुंद नखे असलेल्या स्त्रिया त्यांच्या डाव्या मेंदूचा जास्त प्रमाणात वापर करतात. हे लोक आपल्या मनातील बोलतात. ते अधीर आणि रागीट स्वभावाचे असू शकतात. आणि त्याहूनही अशी नखे असणारे जास्त भावनिक असतात. या लोकांचे हृदय हे त्यांच्या बुद्धीवर राज्य करते.
३. बोटांप्रमाणे गोलाकार नखे
ज्यांची नखे गोलाकार आणि बोटांच्या आकाराची असतात असे लोक अतिशय भाग्यवान असतात. हे लोक आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात. अशा लोकांच्या आजुबाजूला भांडणे सुरू असतील तर हे लोक मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि त्यात ते यशस्वीही होतात. हे लोक आनंदी व्यक्तिमत्त्वाचे आणि सामाजिक प्रकारचे असतात. मात्र अशामुळे या लोकांवर विश्वास ठेवणे इतरांना काहीसे अवघड जाते.
४. चौकोनी आकाराची नखे
हे लोक चिकाटीचे आणि हिमतीचे असतात. हे गुण सर्वोत्तम गुणांपैकी असले तरी गंभीर आणि मेहनती असल्यामुळे हे लोक हट्टी असण्याचीही शक्यता असते. थोडं मोकळेपणाने वागलात आणि लवचिकता ठेवली तर अशा लोकांचे आयुष्य अधिक सुरक होऊ शकते.
५. त्रिकोणी आकाराची नखं
या लोकांकडे कायम नवनवीन कल्पना असतात. इतरांकडून सुटलेले बारीकसारीक तपशील या लोकांच्या चटकन लक्षात येतात. हे लोक जास्त सर्जनशील असतातच पण ते संवेदनशीलही असतात. चुकीचे वागणाऱ्या लोकांना या लोकांच्या लेखी अजिबात थारा नसतो.
६. बदामाच्या आकाराची नखे
हे लोक अत्यंत प्रामाणिक असतात, तसेच त्यांची कल्पनाशक्तीही अफाट असते. या लोकांकडे विनम्रता असली तरी तरी सहनशीलता मात्र अतिशय कमी असते. त्यामुळे अशा लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध अशा एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांना राग सहन होत नाही.
७. तलवारीच्या आकाराची नखं
तलवारीसारखी नखे असणारे लोक जास्त मेहनती असतात. त्यामुळे त्यांनी ठरवलेली उद्दीष्टे ते वेळेत पूर्ण करतात. आपली प्रगती व्हावी यासाठी आवडत नसलेल्या गोष्टींवरही हे लोक मेहनत घेतात. संथपणे काम करणारे आणि या लोकांच्या पद्धतीने काम न करणाऱ्यांशी ते अजिबात पटवून घेऊ शकत नाहीत.