Join us  

बिकीनी, फ्रेंच, ब्राझिलियन व्हॅक्स हे प्रकार नक्की काय? प्रायव्हेट पार्टच्या व्हॅक्सिंगबाबत हे समजून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 6:02 PM

खालच्या भागाचे व्हॅक्सिंग करावे का? करायचे असेल तर कोणत्या प्रकारचे करायचे आणि त्याबाबत तरुणींना एक ना अनेक प्रश्न असतात, अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न...

ठळक मुद्देजाणून घ्या खालचे केस काढण्याच्या पद्धतीतील फरकतुम्हाला पडू शकतात अशा काही सोप्या पण नेमक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न

व्हॅक्सिंग करणे म्हणजे एकप्रकारची स्वच्छताच. आता हाताचे, पायाचे, अंडरआर्मसमधले व्हॅक्सिंग करणे ठिक आहे. पण तुम्ही प्रायव्हेट पार्टचे व्हॅक्सिंग करत असाल तर तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या व्हॅक्सिंगच्या प्रकारांची माहिती असायला हवी. कधी ट्रीपला जाताना लहान कपडे घालायचे म्हणून, तर कधी स्वच्छता म्हणून, इतकेच काय तर जोडीदाराला चांगले वाटावे यासाठीही अनेक जणी प्रायव्हेट पार्टचे व्हॅक्सिंग करतात. हा भाग नाजूक असल्याने याठिकाणी व्हॅक्सिंग करणे काहीसे जोखमीचे काम असते. चुकून एखाद्या ठिकाणी जास्त गरम व्हॅक्स लागले तर त्वचा भाजू शकते किंवा व्हॅक्सिंगची पट्टी जोरात ओढली गेल्यास जखमही होऊ शकते. त्यामुळे याठिकाणचे व्हॅक्सिंग करताना फारसे कॅज्युअल न राहता योग्य ती काळजी आणि पुरेशी माहिती घेणे आवश्यक आहे. तुम्ही नव्यानेच या भागाचे व्हॅक्सिंग करत असाल तर तुमच्यासाठी हे तिन्ही सारखेच असते पाहूयात बिकीनी वॅक्स, फ्रेंच व्हॅक्स आणि ब्राझिलियन व्हॅक्समधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. 

१. बिकीनी व्हॅक्स - हा व्हॅक्सिंगचा अतिशय सामान्य प्रकार असून पहिल्यांदाच पार्लरमध्ये जाऊन प्रायव्हेट पार्टचे व्हॅक्सिंग करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना हॉट शॉर्टस किंवा बिकिनी असे कपडे खरंच घालायचे आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. या व्हॅक्सिंगमध्ये बिकिनीच्या आजुबाजूला येणारे सगळे केस काढले जातात. हे व्हॅक्सिंग म्हणजे खालच्या भागाच्या व्हॅक्सिंगच्या प्रकारातील पहिला टप्पा आहे. यामध्ये तुम्हाला पँटी काढावी लागत नाही. त्याच्या बाजुने योग्य पद्धतीने व्हॅक्सिंग केले जाते. त्यामुळे तुम्हाला अनोळखी व्यक्तीसमोर आतले कपडे काढायची लाज वाटत असेल तर हे व्हॅक्सिंग हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. 

२. फ्रेंच व्हॅक्स - हे बिकीनी व्हॅक्सिंगप्रमाणेच असते. यातही खालच्या भागाचे सगळे केस काढले जात नाहीत. काही भाग तसाच ठेवतात पण सर्वाधिक भागातील केस काढले जातात. हे व्हॅक्सिंग केल्यानंतर तुम्हाला खालचा भाग एकदम स्वच्छ वाटायला लागतो. पहिल्यांदाच खालच्या भागाचे व्हॅक्सिंग कऱणाऱ्यांसाठी फ्रेंच व्हॅक्स हा उत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये जास्त त्रासही होत नाही, त्यामुळे तुम्ही हे व्हॅक्सिंग नक्की करु शकता. मात्र यामध्ये तुम्हाला अंतर्वस्त्र काढावे लागते, याची तयारी ठेवायला हवी. 

३. ब्राझिलियन व्हॅक्स- हे व्हॅक्सिंग सर्वात प्रसिद्ध असले तरीही ते सर्वात जास्त पेनफूल असते. कारण यामध्ये तुमचा खालचा सगळा भाग एकदम चकचकीत स्वच्छ केला जातो. या व्हॅक्सिंगनंतर एकही केस शिल्लक राहत नाही. ज्यांना एकदम स्वच्छ हवे आहे अशांनी हे व्हॅक्सिंग करायला हरकत नाही. मात्र यासाठीही अंतव्रस्त्रे काढावी लागतात. तसेच हे व्हॅक्सिंग करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला सोयीचे होईल अशा पद्धतीने पायांची पोझिशन ठेवावी लागते. त्यामुळे तुम्हाला ते काही प्रमाणात लाजिरवाणे होऊ शकते. 

व्हॅक्सिंगला जाताना या टिप्स आवर्जून लक्षात ठेवा 

१. खालचा भाग स्वच्छ ठेवा - स्वच्छता म्हणजे केस काढणे इतकेच नसून व्हॅक्सिंगला जाताना समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल वाटावे यासाठी आंघोळ करुन पार्लरमध्ये जा. खालचा भाग कोमट पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवा. तसेच तुमच्यासोबत वेट वाईप्स ठेवा जेणेकरुन व्हॅक्सिंग सुरु करण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा हा भाग स्वच्छ करुन घेऊ शकता.

२. त्वचा तयार ठेवा - ज्यादिवशी तुम्हाला व्हॅक्सिंगसाठी जायचे असेल तेव्हा त्वचा नीट असेल याची काळजी घ्या. म्हणजे व्हॅक्सिंग सगळीकडे नीट लागून तुमचे सगळे केस व्यवस्थित निघायला मदत होईल.

३. दुखण्यासाठी तयार राहा - व्हॅक्सिंग हे केल्यावर आपल्याला छान, स्वच्छ वाटत असले तरी ते करताना खूप जास्त त्रास होतो. खालचा भाग तर जास्त नाजूक असतो, त्यामुळे जास्त दुखू शकते. हा त्रास जास्त होऊ नये म्हणून तुमच्या अपॉइनमेंटच्या आधी काही दिवस अल्कोहोल आणि कॉफी किंवा कॅफेन घेणे टाळा. हा त्रास जास्त होतो असे वाटत असेल तर व्हॅक्सिंग करायच्या ४५ मिनिटे आधी एखादी पेनकिलर घ्या.

४. पाळीच्या आधी आणि नंतर टाळा - तुम्हाला जेव्हा मासिक पाळी येणार असते तेव्हा या भागाची त्वचा जास्त सेन्सिटीव्ह होते. त्यामुळे मासिक पाळीच्या आधी आणि नंतरचे ५ दिवस व्हॅक्सिंगची अपॉईनमेट घेऊ नका.

सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न 

१. बिकीनी व्हॅक्सच्या आधी केस ट्रीम करायची गरज असते का? 

- नाही. असे करायची काहीही गरज नसते. तुम्हाला अनोळखी व्यक्तीसमोर जाताना आपले खालचे केस जास्त लांब आहेत असे वाटत असते, त्यामुळे हा प्रश्न पडतो. पण केस कापले तर व्हॅक्सिंगमध्ये उरलेले लहान केस नीट निघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे परीणाम मिळत नाहीत. 

२. पहिल्यांदाच बिकीनी व्हॅक्स करताना काय तयारी करायची? 

- पहिल्यांदा व्हॅक्सिंगला जाताना तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या तयार असणे गरजेचे असते. हे करताना आपल्याला त्रास होणार आहे याची कल्पना तुम्हाला असायला हवी. सलूनमध्ये जाताना आंघोळ करुन जायला विसरु नका. तसेच तुमच्या विश्वासातले आणि चांगलेच सलून निवडा.

३. ब्राझिलियन व्हॅक्समध्ये नक्की कुठले कुठले केस काढतात

- ब्राझिलियन व्हॅक्समध्ये केवळ प्रायव्हेट पार्टवरचे केस काढले जातात असे नाही. तर पुढच्या भागाबरोबरच मागच्या भागापर्यंत सगळे केस काढले जातात. यामध्ये आपल्याला पृष्ठभागाच्या फटीमध्ये असलेल्या केसांचाही समावेश होतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्स