Join us  

64 वर्षांच्या डिंपल कपाडियाचे केस पाहून म्हणाल, राज क्या है सुंदर बालों का? वाचा, तेच हे सिक्रेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 5:03 PM

सौंदर्य आणि केसांच्या बाबतीत तरुणींनाही आदर्श वाटणाऱ्या डिंपल कपाडियाच्या केसांचं रहस्य आहे तिच्या लहानपणापासूनच्या सवयीत आणि ती घेत असलेल्या केसांच्या काळजीत. काय आहे डिंपलचे हेअर सिक्रेट?

ठळक मुद्देडिंपल आपल्या सुंदर केसांचं श्रेय आईच्या खास तेलाला देते. हे खास तेल आजही डिंपल नियमित वापरते.केसांना पोषण मिळून केस मजबूत राहाण्यासाठी डिंपल क खास हेअर पॅक लावते.आईचं खास तेल, होममेड हेअर पॅक यासोबत आणखी एक गोष्ट डिंपल आवर्जून केसांना लावते ती म्हणजे कांद्याचा रस.

डिंपल कपाडिया 64 वर्षांची आहे, पण तिच्या केसांबद्दल आजही तरुण मुलींना आणि महिलांना कुतुहल वाटतं. या वयातही डिंपलचे लांब दाट केस पाहून डिंपलचे हे खरे केस आहेत की खोटे असा प्रश्न पडतो. खरे असतील तर वयानुसार जाणवणाऱ्या केस गळण्याच्या समस्येला डिंपलला तोंड द्यावंच लागलं नाही का? असा कुतुहलमिश्रित प्रश्नही पडतो. तरुणींनाही आदर्श वाटणाऱ्या डिंपल कपाडियाच्या केसांचं रहस्य आहे तिच्या लहानपणापासूनच्या सवयीत आणि ती घेत असलेल्या केसांच्या काळजीत. 

Image: Google

डिंपल म्हणते. आईनं लहानपणी लावलेली सवय आज साठी उलटून गेली तरीही कायम आहेशी सवय माझ्यापुरतीच मर्यादित नसून माझ्या मुली, नातवंडं यांनाही ती लागली आहे. केसांना चपचपीत तेल लावून आई घट्ट दोन वेण्या घालून द्यायची. चित्रपटात काम करायला लागल्यानंतर दोन बांधलेला वेण्या गेल्या पण चपचपीत तेल लावण्याची सवय आजही कायम आहे. त्याचा परिणाम म्हणजे कोणतीही स्टाइल न करता माझे केस सुंदर, दाट दिसतात. तेलाची मालिश नियमित करुनही कधीही केस तेलकट दिसले/ दिसत  नाही. हेच आपल्या केसांचं वैशिष्ट्य असल्याचं डिंपल सांगते. 

वयाच्या 13 वर्षापासून चित्रपटात काम करणाऱ्या डिंपलला केस सुंदर दिसावेत यासाठी कोणतीही स्टाइल करावी लागली नाही. आयुष्यात दोनदाच तिने केस कापले. पण कापलेले केस पाहून तिला आपण बकरीसारखं दिसतो असं वाटलं. तेव्हा पासून तिने कधीही  केस कापले नाही. 

Image: Google

केसांना कलर करण्यापेक्षा हायलायटर वापरणं डिंपलला नेहमीच सोयीचं वाटतं. केवळ काळे आणि ब्राऊन रंगाचे केस डिंपलला नकोसे वाटतात. पक्ष्यांच्या पंखावर जसे निरनिराळे रंग असतात, तशा रंगाच्या छटा हायलायटरद्वारे देता येतात. डिंपलनं  1984 मध्ये लंडनमध्ये असताना डिंपलनं पहिल्यांदा केसांना हायलायटर लावले आणि तेव्हापासून डिंपल हायलायटरच्या प्रेमात पडली ते आजतागयत. पांढऱ्या केसांना न लपवता हायलायटर वापरुन ती पांढऱ्या केसांची शोभा वाढवते. 

परदेशातून आल्यानंतर एकदा आपल्या केसात अशक्य गुंता झाला. तेव्हा पहिल्यांदा आपण केसांसाठी बियरचा वापर केला होता. डिंपल म्हणते बियर ही केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.

 

Image: Google

आईच्या तेलाचा वारसा

डिंपल आपल्या सुंदर केसांचं श्रेय आईच्या खास  तेलाला देते. हे खास तेल आजही डिंपल नियमित वापरते. बदाम आणि चंदन तेल एकत्र करुन त्यात जिरेनियम या औषधी फुलाचं तेल घातलं जात. हे तिन्ही तेल नीट एकत्र करुन त्यात रोजमेरी आणि लव्हेण्डर या इसेन्शिअल तेलाचे थेंब घालून हे तेल पुन्हा नीट ढवळून घेतलं जातं. या तेलानं केसांच्या मुळांची मालिश करायची. रात्रभर तेल केसांना लावलेलं राहू द्यावं. दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवावेत. या तेलामुळे केस दाट आणि लांब होतात.  केसांचा पोतही सुधारतो. आपल्या केसांना या तेलामुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही मिळाल्याचं डिम्पल म्हणते. केस निरोगी राहाण्यासाठीचा हेअर पॅक

केसांना पोषण मिळून केस मजबूत राहाण्यासाठी डिंपल एक खास हेअर पॅक लावते. यात 5 अंड्याचा पांढरा भाग आणि एक अंडं पूर्ण असं एकत्र करुन नीट हलवून घेते. त्यात एक पिकलेलं केळ कुस्करुन घालते. ते नीट एकत्र करुन केसांना लावते. हा पॅक लावून तो केसांवर अर्धा तास ठेवावा. मग कोमट पाण्यानं केस धुवावेत.  या हेयर पॅकमुळे केस निरोगी राहातात, मजबूत होतात आणि केसांचा पोतही चांगला राहातो.

Image: Google

डिंपलचा फेव्हरिट कांद्याचा रस

आईचं खास तेल, होममेड हेअर पॅक यासोबत आणखी एक गोष्ट डिंपल आवर्जून केसांना लावते ती म्हणजे कांद्याचा रस. कांद्याचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. यामुळे केस मजबूत होतात. कांद्याचा रस 20 ते 30 मिनिटे केसात लावून ठेवावा. मग केस शाम्पूनं धुवावेत. कांद्याच्या रसाचा वास केसांतून पटकन जात नाही. त्यामुळे कांद्याचा रस केसांना लावावासा वाटला नाही तर कांद्याच्या रसाचं तेल मिळतं. ते केसांना लावावं. कांद्याच्या रसाचा समावेश असलेला शाम्पू वापरणंही फायदेशीर असल्याचं डिंपल सांगते. 

Image: Google

केस चांगले ठेवण्यासाठी..

केस चांगले ठेवण्यासाठी खास उपाय डिंपल सांगते. 1. केस खूप वेळा विंचरु नये. यामुळे केसातील ओलेपणा/ आर्द्रता निघून जाते. 2. आहारात अ, क या जीवनसत्त्वाच, झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.  या घटकांमुळे आपल्या केसांचं योग्य पोषण होतं. 3. केमिकलयुक्त कंडिशनर वापरणं टाळावं. कंडिशनर म्हणून दही, अंडं आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. 4.  ब्लो ड्रायरनं केस वाळवणं, केसांना सरळ किंवा कुरळे करण्यासाठी हाॅट आर्यन या साधनाचा वापर करणं शक्य तितका टाळावा. 5. केसांची टोकं नियमित कापावीत. यामुळे केसांना फाटे फुटणं, केसात गुंता होणं यासारख्या समस्या टाळल्या जातात. 6. ऊन, वारा, पाऊस यापासून केसांचं संरक्षण व्हावं यासाठी शक्य तेव्हा केस बांधून ठेवावेत. यामुळे केसांचा पोत चागला राहातो. 

टॅग्स :केसांची काळजीडिम्पल कपाडियाब्यूटी टिप्स