गौरी पटवर्धन
वर्गातल्या तमाम पोरींच्या मते दिसायला बऱ्यापैकी सुमारच असलेली ‘ती’. पण ती अचानक कॉलेजमध्ये ‘ब्युटी क्वीन’ ठरते! कोण ठरवतं तिला ब्युटी क्वीन? तर मुलं! बॉईज! ओळखीचे पुरुष! जातांना येतांना रस्त्यात भेटणारे अनोळखी पुरुष! या सगळ्यांच्या नजरेत तिच्या सौंदर्याची पावती असते. तिच्याबरोबरीच्या मुलींना हे अजिबात कळत नाही की ‘उसके पास ऐसा क्या हैं जो मेरे पास नहीं?’मग त्या तिचं कॉम्प्लेक्शन, हेअर कट, कपडे अशा बाबतीत ते शोधायला जातात. पण त्यातला नेमका कुठला फॅक्टर अपीलिंग आहे हे त्यांना ठरवता येत नाही. मग त्या सगळं तिच्यासारखं करायला जातात. तीही मात्रा लागू पडत नाही. आणि त्या सगळ्यातली गंमत ही असते, की बहुतेक वेळेला जिच्यामागे सगळ्या कॉलेजमधली पोरं गोंडा घोळत फिरत असतात, तिलाही सुरुवातीला हे नीटसं कळलेलं नसतं, की हे सगळे आपल्यालाच का भाव देतायत.अर्थात काही मुली अशा असतात की त्या ठरवून, आपल्याला काय चांगलं दिसेल, कशाकडे मुलं आकर्षित होतील याचा अंदाज घेऊन स्वतःची स्टाईल ठरवतात. पण बहुतेक वेळा निदान सुरुवातीला तरी त्यांचाही मटका लागलेला असतो. कारण मुळात समोरच्या व्यक्तीला आपण काय केल्याने सुंदर वाटू याचा काही सेट फॉर्म्युला नाही.
आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे समोरची व्यक्ती किंवा वर्गातली मुलं किंवा मेल कलिग्ज हे काही एकसारखा विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना कुठल्याही स्त्रीमध्ये एकच फॅक्टर आकर्षक वाटेल असं होणं कठीण असतं. आणि तरीही, नेमक्या काही जणीच का बरं सगळ्यांना अट्रॅक्टीव्ह वाटतात?त्या सगळ्या गोऱ्या असतात का? तर नाही.त्या सगळ्या उंच असतात का?सगळ्याच्या सगळ्या बारीक असतात का?लांब दाट केस असलेल्या असतात का?कुरळे केस असलेल्या असतात का?पारंपरिक कपडे घालणाऱ्या असतात का?तोकडे मॉडर्न कपडे घालणाऱ्या असतात का?तर यापैकी कुठलाच एक निकष त्या सगळ्याजणींना लागू होत नाही. काही जणी बुटक्या आणि काहीशा स्थूल असतात, काही सावळ्या असतात, काही दिसायला अगदी काकूबाई छाप असतात आणि तरीही…तरीही त्या पुरुषांच्या दृष्टीने आकर्षक असतात आणि आपण नसतो! त्यांची कामं कोणीही पटकन करून देतं आणि आपल्या कामांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात.मग त्या सगळ्या जणी गोडबोल्या असतात का?तर छे! त्यातल्या काही जणी फटाकड्या असतात, काही तर फटकन तोंडावर अपमान करण्यासाठी प्रसिद्ध असतात. काहीजणी तर चक्क गबाळ्या वाटतील अशा असतात. मग त्यांच्यात असं काय असतं जे आपल्यात नसतं? त्याचा काही सीक्रेट फॉर्म्युला? आहे का? काय असतो सौंदर्याचा सिक्रेट फॉर्म्युला? तो आपल्यलाा सापडेल का?