चारचौघात डोकं खाजल्यास (itchy scalp) काय करावं ते सूचत नाही. कोणासमोर सारखं डोकं खाजवणं बरं दिसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकं का खाजतंय हे ही कळत नाही. वरवर पाहाता डोक्यात कोंडा, उवा, लिखांची समस्या जाणवत नसातानाही डोकं खाजतं. याचा अर्थ डोकं विनाकारण खाजतं असं नाही. आपल्याला दिसत नसलेलं कारण डोकं खाजण्यामागे असू शकतं. डोक्याच्या त्वचेला, केसांच्या मुळाशी संसर्ग झालेला असल्यास डोकं सतत खाजतं. अशा खाजेवर घरातल्या घरात सोपे उपाय (home remedies on scalp itchiness) करता येतात. डोक्यात सतत खाज येत असल्यास बेकिंग सोडा, खोबऱ्याचं तेल, लिंबाचा रस, कोरफड आणि कांद्याचा रस या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीतून उपाय करता येतात.
Image: Google
बेकिंग सोड्याची पेस्ट
डोक्याच्या त्वचेवर बुरशीचा संसर्ग झाल्यास डोक्यात खाज येते. या खाजेवर उपाय म्हणून बुरशी आणि जिवाणुरोधक असलेल्या बेकिंग सोड्याचा उपयोग करता येतो. बेकिंग सोड्याचा उपाय करताना एका वाटीत 2 चमचे भरुन बेकिंग सोडा घ्यावा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची सरसरीत पेस्ट तयार करावी. ही पेस्ट बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळाशी लाववी. पेस्ट लावल्यानंतर 15 मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. बेकिंग सोड्याची पेस्ट एकदा लावून खाज थांबली नसल्यास आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास डोक्यातली खाज दूर होते.
Image: Google
खोबऱ्याचं तेल
डोक्यातली खाज दूर करण्यासाठी खोबऱ्याचं तेल वापरावं. तेल हलक गरम करुन घ्यावं. तेलात कापूस बुडवून कापसाच्या मदतीनं केसांच्या मुळाशी खोबऱ्याचं तेल लावावं. हा उपाय रात्री करावा. डोक्यात रात्रभर तेल लावलेलं असू द्यावं. सकाळी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. अशा पध्दतीनं केसांच्या मुळाशी खोबऱ्याचं तेल लावल्यास डोक्यातली खाज दूर होते. कारण खोबऱ्याच्या तेलात बुरशी रोधक गुणधर्म असतात.
Image: Google
लिंबाचा रस
डोक्यातली खाज घालवण्यासाठी लिंबाचा रस हा उपयुक्त असला तरी त्याचा वापर जपून करावा. डोक्यात बारीक पुळ्या फोड हाताला लागत असती तर लिंबाचा रस लावू नये. लिंबाचा रस लावण्यासाठी एक वाटी घ्यावी. त्यात लिंबाचा रस पिळून घ्यावा. हा रस केसांच्या मुळाशी लावून 10 मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत.
Image: Google
कोरफडाचा गर
कोरफडचा गर किंवा कोरफड जेलचा वापर करुन डोक्यातल्या खाजेवर उपचार करता येतात. यासाठी कोरफडची ताजी पात घ्यावी. ती कापून त्यातला गर काढावा. हा गर हातावर घेऊन केसांच्या मुळाशी हलका मसाज करत लावावा. कोरफड गर किंवा जेल लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
Image: Google
कांद्याचा रस
केवळ डोक्यातली खाजच नव्हे तर केसांशी निगडित अनेक समस्यांवर कांद्याचा रस उपाय म्हणून लावता येतो. कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस केसांच्या मुळाशी आणि केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. 15 मिनिटानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत.