आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेवर सूक्ष्म रंध्रं ( pores) असतात. ज्याद्वारे त्वचा श्वास घेत असते. पण ही रंध्रं मोठी होतात आणि चेहेऱ्यावर खड्डे पडल्यासारखं (open pores) दिसतं. या समस्येला ओपन पोर्सची समस्या असं म्हटलं जातं. सीबम ग्रंथीतून तेलाची निर्मिती जास्त झाल्यास चेहेऱ्यावर खड्डे दिसतात. चेहेऱ्यावरील खड्डे म्हणजे सौंदर्यात बाधा. यामुळे त्वचेचा पोत देखील खराब होतो. ही समस्या घालवण्यासाठी महागड्या ट्रीटमेण्टची गरज नाही. सोप्या घरगुती उपायांनी ( home remedy for open pores on face) ही समस्या सहज दूर करता येते.
Image: Google
चेहेऱ्यावर खड्डे का पडतात?
1. चेहेऱ्यावरील रंध्रं मोठी होण्यामागे अनुवांशिकता हे देखील कारण असतं. घरातल्या सगळ्याच सदस्यांच्या चेहेऱ्यावर जर खड्डे असतील तर त्याच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या बाबतीतही ही समस्या निर्माण होते.
2. जसं जसं वय वाढतं तशी चेहेऱ्याची लवचिकता कमी होते. चेहेऱ्याची त्वचा ओढल्यासारखी दिसते. त्वचा सैल पडते. यामुळेही चेहेऱ्याच्या त्वचेवरील रंध्रं मोठी दिसतात. वयानुसार त्वचा जाड होते. त्वचेवरच्या छोट्या पेशी रंध्रात जमा होवून रंध्रं मोठी होतात.
3. जास्त काळ उन्हात राहिल्यानं त्वचेवरची रंध्र मोठी होतात. उन्हात जास्त काळ राहिल्यानं त्वचेतून कोलॅजन, इलास्टिन आणि पाणी हे घटक निघून जातात. यामुळे त्वचेवरच्या पेशी आकसतात , खेचल्या जातात आणि चेहेऱ्यावरची रंध्रं मोठी होतात.
4. त्वचेवरील रंध्रांमध्ये जर तेल आणि मृत पेशी जास्त प्रमाणात जमा झाले असल्यास रंध्रं मोठी दिसतात. त्वचेवरील ही रंध्रं मोठी दिसायला लागली की चेहेऱ्यावर खड्डे पडल्यासारखे वाटतात. यालाच ओपन पोर्स समस्या असं म्हणतात.
Image: Google
चेहेऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी..
1. काकडी आणि लिंबू
चेहेऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी काकडी आणि लिंबाचा एकत्रित उपयोग फायदेशीर ठरतो. काकडीमध्ये असलेल्या सिलिकामुळे त्वचा तरुण दिसते, चेहेऱ्यावरील खड्डे कमी होतात. तर लिंबामध्ये ॲस्ट्रिजेण्ट हा घटक असतो त्याचा उपयोगही चेहेऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी होतो. यासाठी 2 चमचे काकडीचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस घ्यावा. हे दोन्ही चांगले एकत्र मिसळून कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहेऱ्यावर लावावं. चेहेऱ्यावर लावलेला रस सुकला की थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.
Image: Google
2. मुल्तानी माती
मुल्तानी मातीमुळे चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या बऱ्या होतात. तसेच चेहेऱ्यावरील मोठी रंध्रं ही कमी होतात. मुल्तानी माती त्वचेवरील रंध्रात जमा झालेले तेल आणि घाण शोषून घेते. मुल्तानी मातीमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. आठवड्यातून एकदा चेहेऱ्यास मुल्तानी माती लावल्यास रंध्रं घट्ट आणि छोटी होतात. हा उपाय करण्यासाठी 2 मोठे चमचे मुल्तानी माती आणि थोडं पाणी घेवून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यावर लावून सुकू द्यावी. ती सुकल्यानंतर चेहेरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
3. हळद
हळदीमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म असतात. हळदीमुळे त्वचेवरची सूज कमी होते, तसेच रंध्रात वाढणारे जिवाणू मरतात. चेहेऱ्यावरील खड्ड्यांसाठी हळदीचा उपचार करताना एक चमचा हळद आणि त्यात थोडं पाणी घालून पातळसर पेस्ट करावी. ही पेस्ट चेहेऱ्याला लावून दहा मिनिटं ठेवावी. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
Image: Google
4. केळाचं साल
केळाच्या सालात ल्यूटिन नावाचं ॲण्टिऑक्सिडण्ट असतं. त्वचेचं पोषण करण्यास त्याचा उपयोग होतो. केळाच्या सालात असलेल्या पोटॅशियममुळे त्वचेवरील दोष कमी होतात. केळाच्या सालाचा उपाय करण्यासाठी केळाचं साल घेऊन ते चेहेऱ्यावर गोलाकार घासावं. केळाच्या सालानं 15 मिनिटं मसाज करावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास चेहेऱ्यावरील रंधं छोटी होतात.