केस हा प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यातील महत्त्वाचा घटक असतो. हे केस मुलायम, घनदाट, काळेभोर असावेत असे आपल्याला कायमच वाटत असते. मग यासाठी कधी घरगुती तर कधी पार्लरमध्ये जाऊन एक ना अनेक उपाय केले जातात. केस धुणे हे केसांची काळजी घेण्यातील एक महत्त्वाचे काम असते. आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना केसांना तेलाने चंपी करुन शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करुन आपण आवर्जून केस धुतो. यामुळे आपले केस चांगले राहतील असे आपल्याला आपसूकच वाटते. पण प्रत्यक्षात तसे नसून केस धुताना आपल्याक़डून काही चुका होतात आणि त्याचा केसांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. मग अचानक केस कोरडे व्हायला लागतात, कधी खूप कोंडा होतो तर कधी केस तुटतात. आता केस धुताना अशा कोणत्या चुका होतात आणि त्याचा केसांवर काय परिणाम होतो ते पाहूया...
१. केस धुण्याची योग्य पद्धत
आपण सगळेच केस शाम्पूने धुतो. पण शाम्पू करण्याआधी केसांना वाफ द्या. त्यामुळे केस खराब होण्यापासून वाचतील. वाफ घेतल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. केस धुण्यासाठी खूप गार पाणी किंवा खूप गरम पाणी घेणे टाळा. सामान्य तापमानाच्या पाण्याने केस धुतल्याने केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. पाणी जास्त गरम किंवा गार असेल तर केस कोरडे होऊ शकतात. काही मुलींना रोज किंवा एक दिवसाआड केस धुण्याची सवय असते. पण केस चांगलो राहावेत असे वाटत असेल तर असे रोजच्या रोज केस धुणे योग्य नाही, आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा केस धुवावेत.
२. कंडीशनर असा वापरा
शाम्पू झाल्यानंतर केसांना कंडीशनर लावल्याने केस मुलायम होण्यास मदत होते. म्हणून आपण नेहमी शाम्पूनंतर कंडीशनर वापरतो. पण हा कंडीशनर जास्त प्रमाणात लावल्यास केस खराब होण्याची शक्यता असते. आठवड्यातून दोन वेळा डीप कंडिशनिंग करा. कंडीशनर लावताना तो केसांच्या मूळांशी लागणार नाही याची काळजी घ्या, त्यामुळे केस गळण्याची समस्या होऊ शकते.
३. केस वाळवताना
केसांना शाम्पू आणि कंडीशनर लावल्यानंतर ते योग्य पद्धतीने वाळवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कॉटनच्या टॉवेलने केस योग्य पद्धतीने वाळवा. यामुळे केसांची आर्द्रता टिकून राहील आणि केस तुटण्यापासून वाचतील. केस टॉवेलने जोरजोरात रगडू नका. तसे केल्याने ते तुटण्याची आणि कोरडे होण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा घाईने कुठे बाहेर जायचे असले की केस वाळवण्यासाठी आपण ड्रायरचा वापर करतो, पण ड्रायरमुळे केसांना हिट लागते आणि केसांचा पोत खराब होतो.
४. हेअर केअर उत्पादनांबाबत
वेगवेगळ्या प्रकारचे सिरम, जेल, केसांचे सेटींग करण्यासाठी असणारे हेअर स्प्रे यांमुळे केसांचा पोत खराब होतो. त्यामुळे अशाप्रकारची उत्पादने वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. या उत्पादनांबाबत योग्य ती काळजी घेऊन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही उत्पादने वापरणे आवश्यक आहे.
५. जास्त वेळ केस धुवू नयेत
थंडीच्या दिवसांत आणि एरवीही गरम पाणी अंगावर चांगले वाटत असल्याने आपण शरीर आणि केस बराच वेळ धुवत राहतो. जास्त पाणी घातल्याने केस स्वच्छ होतील असे आपल्याला वाटते. पण त्यामुळे केस स्वच्छ न होता कमकुवत होतात आणि तुटतात. त्यामुळे आवश्यक तितकेच पाणी केसांवर घ्यायला हवे.