जेव्हा एखादा कार्यक्रम असतो किंवा दसरा- दिवाळीसारखे मोठे सण असतात, तेव्हा आपल्या भरजरी कपड्यांसोबत मॅच करतील, असे मोठे झुमके घालण्याचा मोह आवरता येत नाही. बाजारात झुमके प्रकारचे एवढे आकर्षक कानातले मिळतात की हे कानातले खरेदी करण्याचा आणि घालण्याचा मोह काही टाळता येत नाही. शिवाय आपल्याला असंही वाटत असतं की भरजरी कपडे घातले की त्याला शोभणारे छान झुमकेच कानात असायला हवेते. या कानातल्यांमुळे खरंतर खूप त्रास होतो. पण कानातले घालण्याची आपली इच्छाच एवढी दांडगी असते की त्यासमोर होणारा त्रास आपल्याला काहीच वाटत नाही.
कार्यक्रमापुरतं आपण हसत हसत हा त्रास सहन करतो. पण त्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस मात्र कान खूप दुखतात. खूप खाज येते आणि काही वेळा तर कानाच्या छिद्रातून पस, पाणी आणि रक्तही येतं. मग त्याच्या पुढचे आठ- दहा दिवस कानातले घालायचे म्हणजे अंगावर काटा येतो. पण आता असा त्रास सहन करण्याची काही गरज नाही. कारण या काही अशा टिप्स आहेत, ज्यामुळे आपण मोठे कानातलेही आरामात घालू शकू आणि शिवाय कानदेखील दुखणार नाही.
१. वेल लावा
जर कानातले खूप जड असतील तर त्या कानातल्यांना शोभतील असे वेल घ्या. हे वेल कानाच्या पुढच्या भागातून सुरू होणारे आणि वर जाऊन कानाच्या मागच्या भागात अडकणारे हवेते. यामुळे कानातल्यांचा भार वेलांवर जातो आणि तो छिद्रांवर येण्याऐवजी कानाच्या वरच्या भागावर पडतो. पण वेल निवडताना ते वजनाने हलके असतील, असे बघा.
२. सपोर्ट पॅचचा वापर कर
कोणत्याही बाजारपेठेत कानासाठी आरामदायी ठरणारे सपोर्ट पॅच अगदी सहज मिळतात. हे पॅच पारदर्शक आणि अतिशय मऊ असतात. नावाप्रमाणेच हे झुमक्यासारख्या लोंबकळणाऱ्या कानातल्यांसाठी आधार ठरतात. यांचा आधार मिळाल्यामुळे कानातल्याचा भार छिद्रांवर येत नाही. शिवाय सपोर्ट पॅच चटकन दिसूनही येत नाहीत. त्यामुळे झुमके घालणार असाल तर सपोर्ट पॅचचा वापर करायला विसरू नका.
३. वजनदार कानातले घेणं टाळा
कानातले घेताना बाजारात थोडा शोध घ्या. सध्या बाजारात असे अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत जे दिसायला तर अतिशय हेवी, जड वाटतात. पण प्रत्यक्षात ते वजनाने खूपच हलके असतात. घेण्यास थोडा उशीर झाला, असे कानातले शोधायला त्रास झाला तरी चालेल. पण जड कानातले घालून कानांना दुखापत करून घेण्यापेक्षा असे कमी वजनाचे कानातले शोधून घालणे कधीही चांगले.
४. चेनचा वापर करा
यालाच काही जण वेल असंही म्हणतात. एक वेल अशा प्रकारचे असतात जे कानाच्या पुढच्या भागातून सुरू होतात आणि कानावर चढून कानाच्या मागच्या बाजूला पॅक करायचे असतात. दुसरे एक वेल असतात ते कानाच्या मागच्या भागातून लावायचे आणि त्याचे हूक केसांमध्ये अडकवायचे. याला खूप जणी चेन असं म्हणतात. अशा प्रकारचा चेनचा वापर केला तरी कानातल्याचे ओझे कमी होते. कारण कानावरचा सगळा भार केसांवर लटकवलेले हूक सांभाळते. वेलची निवड करताना ते जास्त वजनदार घेणे टाळा.
हेवी कानातले घालताना काळजी घ्या...
- हेवी कानातले घालणे खूप आवडत असले तरी अशा कानातल्यांचा वापर जरा जपूनच करा.
- वारंवार हेवी कानातले घालू नयेत.
- अनेकदा हेवी कानातले घातल्यामुळे मानदुखीचा त्रासही होऊ शकतो.
- वजनदार कानातले घालताना अनेकदा कानाच्या पाळ्या फाटण्याचाही धोका असतो. अशावेळी ऑपरेशन करून कान शिवण्याची वेळ येते.
- अनेकदा जड कानातले जेव्हा दोन- तीन तास कानात ठेवून आपण काढतो, तेव्हा कानाच्या छिद्रातून पाणी, पस येण्याचा त्रासही होतो. कानाच्या छिद्राला आणि त्याच्या आसपासच्या जागेला खूप खाज येते. यातून फंगल इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे जड कानातले घालणे शक्य तेवढे टाळलेलेच बरे.