Join us  

त्वचा कोरडी असो की तेलकट, वापरा 4 प्रकारचे कॉफी स्क्रब, चेहरा दिसेल क्लिन आणि सॉफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 1:43 PM

चेहरा क्लीन आणि साॅफ्ट करण्यासाठी करा काॅफीचा उपाय.. 4 प्रकारच्या त्वचेसाठी काॅफी स्क्रबचे 4 प्रकार

ठळक मुद्देत्वचा कोणत्याही प्रकारची असो आणि कोणतीही सौंदर्य समस्या असो काॅफी स्क्रबच्या मदतीनं त्यावर उपाय करता येतो.

काॅफी हे केवळ एक पेय नाही तर चेहऱ्याला सौंदर्य प्रदान करणारा उपाय देखील आहे. काॅफीच्या मदतीनं चेहेरा खोलवर स्वच्छ करता येतो. काॅफी पावडर जर चेहेऱ्याला लावली तर त्वचेखालचा रक्तप्रवाह सुधारतो. काॅफीमुळे त्वचेवरची रंध्रं खोलवर् स्वच्छ होतात . त्यामुळेच काॅफीच्या मदतीनं तेलकट त्वचा, चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, डाग या समस्या दूर होतात. त्वचा कोणत्याही प्रकारची असो आणि कोणतीही सौंदर्य समस्या असो काॅफी स्क्रबच्या मदतीनं त्यावर उपाय करता येतो. 

Image: Google

कोरड्या त्वचेसाठी काॅफी स्क्रब

त्वचा कोरडी असल्यास काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा चमचा काॅफी पावडर, 1 चमचा दही घ्यावं. एका वाटीमध्ये काॅफी पावडर आणि दही एकत्र करुन त्याची मऊ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावण्याआधी हात स्वच्छ धुवावेत. बोटांचा वापर करत तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहेरा आणि मानेवर गोलाकार मसाज करत लावावी. हा मसाज 10 मिनिट करावा. मसाज केल्यानंतर 5 मिनिटांनी चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

तेलकट त्वचेसाठी काॅफी स्क्रब

तेलकट त्वचेसाठी काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी 1 चमचा काॅफी पावडर, 1 चमचा बेंटोनाइट क्ले ( चिकण माती), अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यावं.  एका वाटीत या तिन्ही गोष्टी एकत्र करुन चांगल्या एकजीव करुन घ्याव्यात. हे काॅफी स्क्रब चेहेरा आणि मानेवर मसाज करत लावावं. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी काॅफी स्क्रब चेहेऱ्यावर लावताना टी झोनकेले जास्त लक्ष पुरवावं. कारण तेथेच सर्व तेलकटपणा एकवटलेला असतो. 5-7 मिनिटं मसाज करत काॅफी स्क्रब चेहेऱ्यास लावावं. काॅफी स्क्रब लावून झालं की ते 15-20 मिनिटं चेहेऱ्यावर राहू द्यावं.स्क्रब सुकण्यास 15-20 मिनिटं लागतात. नंतर चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा. तेलकट त्वचेशी निगडित समस्या दूर करण्यासाट्ही आठवड्यातून 2 ते 3वेळा चेहेऱ्यास काॅफी स्क्रब लावावं.

Image: Google

चेहेऱ्यावर सतत मुरुम पुटकुळ्या येत असतील तर

त्वचेच्या रंध्रात तेलकटपणा आणि घाण साचून राहाते. यामुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येऊन चेहरा खराब होतो. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांची समस्या दूर करण्यासाठी 1 चमचा काॅफी पावडर, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे कोमट पाणी घ्यावं. एका वाटीमध्ये काॅफी पावडरमध्ये तांदळाचं पीठ मिसळावं. काॅफी पावडर आणि तांदळाचं पीठ एकत्र करुन घेतलं की त्यात 2 चमचे कोमट पाणी घालावं. हे सर्व नीट एकत्र करुन त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यावर लावावी. चेहेऱ्यावर लावलेले काॅफी स्क्रब वाळू द्यावं. नंतर ते पाण्यानं स्वच्छ धुवावं. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावावं. चेहेरा नीट स्वच्छ होण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा हे काॅफी स्क्रब लावावं.

Image: Google

मिश्र त्वचेसाठी

ज्यांची त्वचा कोरडी आणि तेलकट अशी मिश्र असते अशा प्रकारच्या त्वचेसाठीही काॅफी स्क्रब फायदेशीर ठरतं.  मिश्र त्वचेसाठी काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा चमचा काॅफी पावडर, अर्धा चमचा ओटमील पावडर, 1 चमचा दूध आणि अर्धा चमचा कोरफड गर घ्यावा.वाटीमध्ये सर्व सामग्री घालून एकजीव करावी. हे मिश्रण चेहेरा आणि मानेस गोलाकार मसाज करत लावावं. 7-8 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहेरा सुकू द्यावा. चेहेरा सुकल्यावर पाण्यानं स्वच्छ धुवावा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी