बारीक असणाऱ्यांना आपण थोडे जाड असावे असे वाटते आणि जाड लोकांना आपण बारीक असतो तर छान दिसलो असतो असे वाटत असते. त्यासाठी डाएट, व्यायाम इतर वेगवेगळे उपाय केले जातात पण जाडी मात्र काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. आता असे असूनही आपण बारीक म्हणजेच स्लीम-ट्रीम दिसावे असे या जाड असणाऱ्या प्रत्येकीला वाटते. पण शरीरावरची वाढलेली चरबी कमी व्हायचं नाव घेत नसते आणि कोणतेही उपाय करुन जाडी लपत नसते. अशावेळी फॅशनबाबतच्या काही सोप्या ट्रीक्स तुम्ही माहित करुन घेतल्या तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा थोड्या बारीक दिसू शकता किंवा तुमची जाडी समोरच्यांना लक्षात येणार नाही. यासाठी तुम्हाला या ट्रीक्स कोणत्या ते समजून घ्यावे लागेल. पाहूयात काही सोप्या ट्रीक्स....
१. जीन्स कोणत्या रंगाची वापरावी - आपल्याकडे फिक्या आणि गडद रंगाच्या काही जीन्स असतात. फिक्या रंगांमध्ये स्काय ब्लू, क्रिम, ऑफ व्हाईट, फिकट ग्रे अशा रंगांच्या जीन्स आपण साधारणपणे वापरतो. पण तुम्हाला तुमची जाडी जास्त दिसू द्यायची नसेल तर तुम्ही गडद रंगाच्या जीन्स वापरु शकता. फिक्या रंगामध्ये तुमच्या शरीराचा भाग जास्त दिसू शकतो. तर गडद रंगामध्ये हा भाग नकळत झाकला जातो.
२.जीन्सची वेस्ट कशी असावी - तुम्हाला बारीक आणि उंच दिसायचे असेल तर तुम्ही लो वेस्ट जीन्स वापरणे योग्य नाही. तुम्ही हाय वेस्ट जीन्स वापरायला हवी. लो वेस्ट जीन्समुळे तुमची पोटाची आणि कंबरेची चरबी थोडी जास्त असेल तर ती जीन्सच्या वरच्या भागातून बाहेर आल्यासारखी वाटू शकते. हेच हा भाग हाय वेस्ट जीन्सने झाकलेला असेल तर तुम्ही नक्कीच उंच आणि बारीक दिसाल.
३. वन पीस घालताना - तुम्ही एखाद्या ट्रीपला किंवा पार्टीला वन पीस घालून जाता. अशावेळी या वनपीसमध्ये तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर कंबरेला एक छानसा बेल्ट लावा. त्यामुळे तुमची कंबर ड्रेसमध्ये थोडी बारीक दिसू शकेल. बेल्ट लावला नाही तर तुम्ही उगाचच जाड आहात असे दिसेल. त्यामुळे वन-पीस घालताना ही काळजी नक्की घ्यायला हवी.
४. प्रिंटेड कपड्यांविषयी - तुम्ही कोणतेही कपडे घातले तरी बारीक दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर शक्यतो प्लेन कपडे वापरा. वेगवेगळ्या प्रकारची प्रिंट असलेले कुर्ते, टॉप यामध्ये तुम्ही नकळत जाड दिसता. त्यामुळे बारीक आणि उंच दिसण्यासाठी प्रिंटेडपेक्षा प्लेन कपडे वापरा.
५. कपड्यांचा गळा कसा असावा - तुम्ही थोडे हेल्दी आहात, त्यातच तुमची उंचीही कमी आहे अशावेळी तुम्ही फार जाड नसाल तरीही जाड आहात असे वाटते. याचे कारण म्हणजे आपण घालत असलेले कपडे. त्यामुळे आपण बारीक दिसावे असे वाटत असेल तर आपल्या कपड्यांबाबत आपण बारकाईने विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही कपड्यांचा गळा व्ही प्रकारचा असेल तर तुम्ही त्यात उंच आणि बारीक दिसायला मदत होते. तेव्हा गोल, चौकोनी किंवा आणखी कोणत्या प्रकारच्या गळ्याचे कपडे घेण्यापेक्षा किंवा शिवण्यापेक्षा व्ही आकारातील गळ्याच्या कपड्यांना पसंती द्या.