केस पांढरे होण्याला आता काही वय राहिलेलं नाही, हेच खरं.... आरशात डोकावून पाहिल्यावर जेव्हा केसांत पांढरे केस चमकू लागतात, तेव्हा खरोखरंच प्रत्येक केसागणिक बीपी वाढत जातं. पुढे पुढे तर असं होऊन जातं की नको, नको आणखी बारकाईने केस बघायलाही नकोत आणि ते पांढऱ्या केसांचं दिसणंही नको. पण डोक्यावरचे पांढरे केस वाढत असताना असं शांत तरी किती दिवस बसणार? शिवाय आपण शांत बसल्याने केस पांढरे होण्याचे थोडीच थांबणार?
त्यामुळे पांढऱ्या केसांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याच्यावर काहीही उपाय न करता स्वस्थ बसून राहणं, या दोन्ही गोष्टी पुर्णपणे चुकीच्या आहेत. डोक्यात पांढरे केस दिसायला लागताच लगेच पॅनिक होऊ नका. या गोष्टीचं खूप टेन्शनही घेऊ नका. कारण अनेक अकाली केस पांढरे होत असतील तर त्यासाठी अनेक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. या सोप्या ब्यूटी ट्रिटमेंट्स आपण घरच्याघरी करू शकतो आणि केसांचं अकाली पांढरं होणं रोखू शकतो. शिवाय हे उपचार नैसर्गिक असल्यामुळे त्याने केसांवर कोणताही विपरित परिणाम होत नाही. त्यामुळे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हा घ्या एक सोपा घरगुती उपाय..
केसांना लावा दुधी भोपळ्याचं तेल
Bottle Gourd oil for hair
आरोग्यासाठी दुधी भोपळा किती गुणकारी आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे भोपळ्याचं सूप, भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचे पराठे यासारख्या वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून भोपळा आपल्या पोटात जाणं खूप आवश्यक असतं. हाच भोपळा आता आपल्याला आपल्या केसांसाठी वापरायचा आहे. अकाली पांढऱ्या झालेल्या केसांना पुन्हा काळं करण्याचा सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे डोक्याला भोपळ्याच्या तेलाने मसाज करणे.
कसं तयार करायचं दुधी भोपळ्याचं तेल ?How to make Bottle Gourd oil
- भोपळ्याचं तेल तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. हे तेल बनविण्यासाठी आपल्याला केवळ भोपळा आणि खोबरेल तेल या दोन गोष्टी लागणार आहेत.
- यासाठी सगळ्यात आधी एखादा मध्यम आकाराचा ताजा, फ्रेश भोपळा घ्या.
- सालासकट या भोपळ्याच्या लहान लहान फोडी करा आणि त्या चार ते पाच दिवस उन्हात वाळवू द्या.
- चार, पाच दिवसांनी जेव्हा भोपळा सुकेल तेव्हा तो तेलासाठी वापरा.
- २०० मिली. नारळाचं तेल एका पातेल्यात गरम करायला ठेवा.
- तेल गरम झालं की त्यात भोपळ्याचे सुकलेले तुकडे टाका आणि तेल १५ ते २० मिनिटे तापू द्या.
- जेव्हा भोपळ्याचे तुकडे काळे पडतील, तेव्हा गॅस बंद करा.
- थोडा वेळ भोपळा तेलात राहू द्या आणि त्यानंतर तेल गाळून घ्या.
- या तेलाने आठवड्यातून दोनदा केसांना हळूवार हाताने मसाज करा.
- तेल लावल्यानंतर दोन तास डोक्याला राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू लावून केस धुवून टाका.
- या तेलाचा नियमित वापर केल्यास केस अकाली पांढरे होणं थांबतं आणि केस छान काळेभोर, चमकदार होतात.