वाढत्या वयात काळ्याभोर केसांचा रंग बदलून केस पांढरे व्हायला सुरूवात होते. सध्याची अनियमित जीवनशैली, हार्मोनल बदलांमुळे वयस्कर लोकांमध्येच नाही तर तरूणी मुलींचेसुद्धा केस पांढरे होतात. एखादा पांढरा केस दिसला तरी, आपण एवढ्या लवकर म्हातारं दिसतोय असं कुठेतरी वाटू लागतं. खूप कमी लोक केस नैसर्गिकरित्या पांढरं होण्याकडे सकारात्मकतेनं पाहतात.
अभिनेत्री समीरा रेड्डीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. पांढऱ्या केसांवरून ज्या महिला सतत चिंतेत असतात त्याच्यांसाठी समीराची ही पोस्ट नक्कीच प्रेरणादायक ठरेल. या फोटोत तुम्ही पाहू शकता नेव्ही ब्लू रंगाच्या टि-शर्टमध्ये समीरानं आपले फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये दोन्ही फोटोत समीराचे पांढरे केस स्पष्ट दिसत आहेत. सुंदर हेअरस्टाईल करत समीरानं आपले केस बांधले आहेत.
या पोस्टमध्ये समीरानं लिहिले की, माझ्या वडीलांनी मला विचारलं की, 'तू तुझे पांढरे केस लपवत का नाही'. लोक काय म्हणतील याचा विचार करून ते मला असं विचारायचे. मी उत्तर दिलं की, 'काय फरक पडतो जर मी केस लपवले नाही तर. मी वयस्कर असून सुंदर आणि आकर्षक नाही असा याचा अर्थ होतो का? मी असा विचार अजिबात करत नाही. मुक्त आणि स्वतंत्र राहायला मला आवडतं.
कोणीही माझे पांढरे केस पाहू नये म्हणून मी दर २ आठवड्याला केस का रंगवायचे? आज मी स्वत:साठी चांगला वेळ घालवून मला आवडणारा, हवा त्या रंगाचा आनंद घेऊ शकते. मला कल्पना आहे की मी एकटी नाही. बदल आणि स्वीकृती तेव्हाच होऊ शकते तेव्हा जुन्या परंपरा आणि जुने विचार मोडीस निघतील. तेव्हाच आपण एकमेकांना आहे तसंच राहू देऊ.
आपण आत्मविश्वास नैसर्गिकरित्या मिळवू शकतो मुखवट्याखाली स्वत:चं रूप लपवून नाही. त्यानंतर माझ्या वडीलांना समजले. मलाही त्यांची वडील म्हणून माझ्याप्रती असलेली काळजी लक्षात आली. प्रत्येक दिवशी आपण पुढे जायला शिकतो आणि नवीन जागा शोधतो. ही ती छोटी पायरी आहेत जी आपल्याला खूप मोठ्या ठिकाणी घेऊन जाते.' असं म्हणत तिनं आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.