उत्तर कोरिया देशात नुकतेच काही नवे कायदे करण्यात आले आहेत. यानुसार तेथील नागरिकांना विदेशी कपडे घालण्यास मनाई आहे. विदेशी चित्रपट पाहिले, विदेशी फॅशन केली किंवा उघडं अंग दाखविणारी फाटकी जीन्स घातली, तर तेथील नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई इतकी कठोर असेल की नागरिकांना फाशीची शिक्षादेखील होऊ शकते, असे तेथील हुकूमशहा किम जोंग उन यांनी सांगितलं आहे.
अनेकांचा आक्षेप असणारी ही फाटकी जीन्स भारतीय तरूणाईची मात्र जान आहे. तरूण मुलीच नव्हे तर तिशी- पस्तीशीच्या यंग वूूमन देखील तितक्याच आवडीने रिप्ड जीन्स घेण्यात अग्रेसर आहेत. गुडघ्यावर, मांडीवर फाटलेली ही जीन्स हमखास हटके लूक देणारी आहे, असा तरूणाईचा फंडा आहे.
आपल्याकडेही नुकतेच काही महिन्यांपुर्वी या फाटक्या जीन्सवरून वादंग उठले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांनीही तीन महिन्यांपुर्वी फाटक्या जीन्सविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. यावादात अभिनेत्री कंगणा रणौत, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही उड्या घेतल्या होत्या आणि रिप्ड जीन्स घालणे ही ज्याची त्याची आवड आहे, असे ठणकावून सांगितले होते.
कधी आली ही फाटकी जीन्स
गरिबी आणि श्रीमंतीचा भेद मिटवून टाकणारी ही फाटकी जीन्स हॉलीवूडमध्ये जन्माला आली. १९७० साली आलेली ही फॅशन सुरूवातीला लोकांना विचित्र वाटली. पण नंतर तिच्यातली स्टाईल लक्षात आल्यावर लोकांनी स्वत:हून त्यांच्याकडच्या जीन्स रिप्ड करायला म्हणजे त्यावर कट मारायला सुरूवात केली. त्या काळात केवळ मोठमोठाले ब्रॅण्डच रिप्ड जीन्सचे उत्पादन करायचे. हजारो रूपये मोजून लोक या जीन्स खरेदी करायचे. कधी काळी श्रीमंतांपुरतीच मर्यादित असलेली ही स्टाईलीश जीन्स आता मात्र अगदी सहज आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत बाजारात उपलब्ध आहे.