Join us  

पेडिक्युअरसाठी पार्लरमध्ये कशाला जाता? 2 प्रकारच्या स्क्रबनं घरीच करा मस्त पेडिक्युअर, पाय मऊमुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2022 4:53 PM

पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.  घरच्याघरी मिल्क स्क्रब आणि काॅफी स्क्रबनं पार्लरसारखं पेडिक्युअर करता येतं. 

ठळक मुद्देमिल्क स्क्रबनं पाय मऊ मुलायम होतात. 

पेडिक्युअर ही पार्लर ट्रीटमेण्ट असली तरी ती केवळ पायांच्या सौंदर्यासाठी नाही. पायांची योग्य काळजी घेण्यासाठी पेडिक्युअर करणं गरजेचं असतं. पेडिक्युअरमुळे पाय स्वच्छ राहातात, पायाच्या त्वचेला आर्द्रता मिळून पाय मऊ मुलायम राहातात. कुरुप किंवा बुरशीजन्य आजारांचा, पायाला संसर्ग होण्याचा धोका टळतो. पायावरची मृत त्वचा निघून जाते. नियमित पेडिक्युअर केल्यानं टाचांना भेगा पडत नाही. पायाकडील रक्तप्रवाह सुधारुन पायांना आराम मिळतो.  या फायद्यांसाठी नियमित पेडिक्युअर करणं गरजेचं आहे. पण म्हणून पेडिक्युअर पार्लरमध्ये जाऊनच करायला हवं असं नाही. घरच्याघरी पेडिक्युअर करणं सहज  शक्य आहे. मिल्क स्क्रब आणि काॅफी स्क्रबचा उपयोग करुन  घरच्याघरी पार्लरसारखं पेडिक्युअर करता येतं.

Image: Google

मिल्क स्क्रब

मिल्क स्क्रब करण्यासाठी  एक कप कोमट दूध घ्यावं. दुधात 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालावं. हे  चांगलं मिसळून यात 1 चमचा बेबी ऑइल घालावं. हे मिश्रण पायाला लावून स्क्रब करावं . हे स्क्रब करण्याआधी 10-15 मिनिटं पाय कोमट पाण्यात घालून बसावं. यामुळे पायाची त्वचा मऊ होते. त्वचेवर स्क्रब लावल्यानं पायावरची मृत त्वचा पटकन निघून जाते. या स्क्रबमुळे पायाच्या आर्द्रता मिळते. हे स्क्रब केल्यानंतर पायाच्या त्वचेत ओलसरपणा निर्माण होतो आणि पाय मऊ मुलायम होतात.

Image: Google

काॅफी स्क्रब

काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीत  1 मोठा चमचा काॅफी पावडर घ्यावी. त्यात 1 मोठा चमचा मीठ घालावं. काॅफी आणि मीठ मिसळून घ्यावं. यात अर्धा कप मध घालावं. स्क्रबला सुगंध येण्यासाठी यात इसेन्शियल ऑइलचे 2-3 थेंब घालावेत., मिश्रण एकजीव करावं. पायांना स्क्रब लावण्याआधी पाय कोमट पाण्यात 15-20 मिनिटं बुडवून ठेवावेत. मग पायांना  काॅफीच्या मिश्रणानं स्क्रब करावं. स्क्रब केल्यानंतर पाय स्वच्छ धुवून पाय रुमालानं टिपून घ्यावेत. पायांना तिळाच्या तेलाचा हलक्या हातानं मसाज करावा.  अशा प्रकारे काॅफी स्क्रबनं पेडिक्युअर केल्यानं पायांना आराम मिळतो. काॅफीमुळे पायावरची मृत त्वचा निघून जाते. मधामुळे पायाच्या त्वचेला आर्द्रता मिळून  पाय मऊ मुलायम होतात. 

   

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी