आपलं कितीही वय झालं तरी आपण तरुण दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. मग हे वय लपविण्यासाठी कधी काही घरगुती उपाय केले जातात तर कधी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे उपाय केले जातात. सणावाराच्या काळात तर नटूनथटून मिरवण्यातली मजाच काही और असते. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आपला लूक यंग दिसावा यासाठी फॅशनशी निगडित काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. काही सोप्य गोष्टी केल्यास तुम्ही आहात त्यापेक्षा नक्की लहान दिसू शकता. आता असे कोणते बदल केलेत तर तुम्ही यंग दिसाल याबद्दल जाणून घेऊया.
१. अनेकदा आपण साडी नेसली किंवा ड्रेस घातला की केस गळ्यान नको म्हणून ते बांधून टाकतो. पण ते बांधताना जर तुम्ही मानेवर रबर लावले तर नकळत आपण वयाने जास्त वाटतो. पण हेच रबर जर तुम्ही केस थोडे वरच्या बाजूला घेऊन लावले म्हणजेच हाय पोनी घातला तर तुम्ही यंग दिसू शकता.
२. सणावाराला साधारणपणे आपण पारंपरिक कपड्यांवर टिकली लावणे पसंत करतो. सध्या बाजारातही वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या पाहायला मिळतात. तुम्हाला टिकली लावायची असेल तर थोडी लहान आकाराची टिकली लावा. मोठ्या टिकलीमुळे तुम्ही विनाकारण वयस्कर दिसू शकता.
३. केस मोकळे सोडले किंवा बांधले तरीही मध्यभागी भांग पाडू नका. मधल्या भांगामुळे आपण जास्त वयाचे दिसतो. हेच जर साईड पार्टीशन केले तर तुम्ही तरुण दिसता. त्यामुळे हेअरस्टाइल करताना याची काळजी घ्यायला हवी.
४. कपड्यांची निवड करतानाही योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. खूप ढगळे, गोल गळ्याचे कुर्ते घातले तर तुम्ही मोठे दिसता. हेच तुम्ही थ्री फोर्थ बाह्यांचे किंवा फूल स्लिव्हजचे कपडे घालणार असाल तर व्यवस्थित फिटींगचे आणि थोडे बंद गळ्याचे कुर्ते घालायला हवेत. त्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि आहात त्याहून यंग दिसायला मदत होईल.
५. पंजाबी ड्रेस घालताना दुपट्टा छातीवरुन टिपिकल असा दोन्ही बाजूला घेण्यापेक्षा एका खांद्यावर, हातावर घेतल्यास तुम्ही नक्कीच यंग दिसता.
६. तसेच टिपिकल पंजाबी ड्रेस वापरण्यापेक्षा थोडे ट्रेंडी कुर्ते वापरा. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते मिळतात, यात बाह्यांना किंवा कुर्त्यामध्येही हटके फॅशन असतात असे कुर्ते घातल्यामुळे तुम्ही काकूबाई न दिसता थोड्या ट्रेंडी आणि तरुण दिसता.
७. कानातले घालताना टिपिकल टॉप्स घालण्यापेक्षा थोडे लोंबणारे आणि हटके असे कानातले घातले तर त्याचा तुमच्या लूकमध्ये लगेच फरक पडतो.
८. बाहेर जाताना आपण सामान्यपणे पर्स किंवा बॅग सोबत घेतो. यामध्ये तुम्ही टिपिकल खांद्याला अडकवण्याची पर्स घेतली तर तुमचा लूक वयस्कर होऊ शकतो. पण हेच तुम्ही एखादी ट्रेंडी स्लिंग पर्स घेतली तर तुम्ही यंग दिसू शकता. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग पर्स पाहायला मिळतात.
९. तुम्ही जिन्स वापरत असाल तर टीशर्ट किंवा टॉपवर तुम्ही डेनिमचे जॅकेट किंवा ब्लेझर घालू शकता. हे जास्त जाड वाटत असेल तर उन्हाळ्यात घालता येतील अशी पातळ जॅकेटसही बाजारात सहज मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्की तरुण दिसाल.
१०. चप्पल घालतानाही टिपिकल अंगठ्याची किंवा खडे असलेली चप्पल किंवा सँडल न घालता थोडे ट्रेंडी बूट किंवा सँडल घालू शकता. त्यामुळे तुमचा काकूबाई लूक जाऊन यंग दिसण्यास मदत होईल. तसेच एकदम फ्लॅट चप्पल घालत असाल तरीही त्यात अनेक चांगले पर्याय उपलब्ध असतात, त्यांचा आवर्जून विचार करा.