थंडी पडली की तरुणींमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होतात. छान चमकदार त्वचा एकाएकी रुक्ष, खरखरीत व्हायला लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या, चेहरा कोरडा पडणे, त्वचा निघून येणे अशा तक्रारी महिला करताना दिसतात. मग यासाठी बाजारात मिळणारे वेगवेगळे क्रीम लावून त्वचेचा ओलावा टिकवायचे प्रयत्न केले जातात. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. तसेच ठराविक काळाने पुन्हा त्वचा आहे तशीच होतो. कधी थंडीमुळे ओढल्यासारखी वाटते तर कधी कोरडेपणामुळे खाजही येते. त्वचेच्या या समस्या थंडीच्या दिवसांत सामान्य असल्या तरी त्यावर काही ठोस उपाय केले तर पुढचे दोन ते तीन महिने त्वचा चमकदार राहायला मदत होते. यासाठी बाहेर जाताना ऐनवेळी काही उपाय करण्यापेक्षा रात्री झोपतानाच थोडी काळजी घेतली तर? पाहूयात झोपताना लावायचे काही फेसपॅक ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा मस्त फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करुन तयार केलेले हे फेसपॅक तुमच्या चेहऱ्याची चमक नक्कीच वाढवतील.
१. पूर्वीपासून रंग उजळण्यासाठी आणि त्वचा मुलायम राहण्यासाठी आपली आई आणि आजी वापरत असलेला हा अतिशय उत्तम आणि सोपा असा फेसपॅक आहे. १ चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि ४ चमचे गुलाबपाणी एकत्र करावे. हे जास्त प्रमाणात केल्यास एखाद्या बाटलीत किंवा लहानशा बरणीत भरुन ठेवू शकता. हे एकत्रित केलेले मिश्रण ५ ते ६ थेंब घेऊन चेहरा आणि मानेवर एकसारखे लावावे. रात्रभर हे मिश्रण असेच चेहऱ्यावर ठेवून सकाळी चेहरा साध्या पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेचा ग्लो तर वाढेलच पण रंग उजळण्यासही मदत होईल. तुमची त्वचा जास्तच कोरडी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मध घालू शकता. त्यामुळे फेसपॅक थोडासा चिकट होईल पण त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल.
२. नारळाचे तेल आणि गुलाबपाणी हातावर एकत्र करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावे. नारळाचे तेल घरात सहज उपलब्ध असलेली गोष्ट आहे. एरवी तेलाने चिपचिप होते असे वाटते. पण थंडीच्या दिवसांत त्वचेचा कोरडेपणा घालवायचा असेल तर हा उत्तम उपाय ठरु शकतो. पाणी आणि तेल एकत्र कसे होणार असे जर आपल्याला वाटत असेल तर हातावर दोन्ही घेऊन दोन्ही हात एकमेकांवर चोळल्यावर ते एकत्र होते. ५ थेंब नारळाचे तेल आणि ३ थेंब गुलाबपाणी घेतल्यास चेहऱ्याला ते पुरेसे होते. रात्रभर हे लावून ठेवावे आणि सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा.
३. ऑलिव्ह ऑइल अनेक अर्थांनी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्यास त्याचा चेहऱ्याची रुक्षता कमी होण्यास फायदा होतो. मात्र या तेलाने समाज केल्यावर कोणतेही क्रीम किंवा लोशन चेहऱ्याला लावू नये. ऑलिव्ह ऑइल चेहऱ्याचा ग्लो वाढविण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. एक आठवडा दररोज हा प्रयोग केल्यास त्याचा त्वचा मुलायम होण्यास चांगला फायदा होतो.
४. १ चमचा कोरफड जेल, ५ थेंब ग्लिसरीन आणि ५ थेंब बदाम तेल एकत्र करुन हा पॅक चेहऱ्याला लावावा. रात्रभर तसाच ठेवावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. हा पॅक नुसता लावून उपयोग नाही तर त्याने चेहऱ्याला ५ ते ६ मिनिटे मसाज करणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहऱ्याचे रंध्र मोकळे होऊन हा पॅक आतपर्यंत उपयुक्त ठरु शकतो. हा पॅक तुम्ही जास्तीचाही बनवून ठेवू शकता. तसेच यातील सगळे घटक हे नैसर्गिक असल्याने अशाप्रकारचे पॅक चेहऱ्याला लावून चेहऱ्याचे सौंदर्य नक्कीच खुलते.