Join us  

Winter Care Tips: कोरड्या खरखरीत त्वचेचा त्रास विसरा, मध आणि गुलाबपाण्याचा करा मस्त उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 7:22 PM

त्वचेला थंडीचा सामन करण्याचं बळ देणं आणि त्यासाठी तिला पोषक तत्त्वं पुरवणं हे गरजेचं असतं. या पोषणासाठी घरातील मध आणि गुलाब पाण्याचा चांगला उपयोग होतो. 

ठळक मुद्देमध आणि गुलाबपाण्याचा लेप जर चेहर्‍याला नियमित लावला तर कडाक्याच्या थंडीतही त्वचा सुरक्षित राहाते.

ऋतू कोणताही असो चेहर्‍याची त्वचा मऊ मुलायमच असायला हवी. ही गरज तर थंडीत जास्तच जाणवते. कारण ठरवूनही चेहरा कोरडा आणि ओढलेला दिसतो, ओठ पांढरे पडतात, फाटतात, गाल उलल्यासारखे दिसतात. मोकळेपणानं हसूही शकत नाही इतकी चेहर्‍याची त्वचा आकसते. हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा जपण्यासाठी-वाढवण्यासाठी, कोरडी त्वचा मुलयम करण्यासाठी केवळ विकतच्या क्रीम्स लोशन्सवर अवलंबून भागत नाही. त्यासाठी घरगुती उपाय जास्त परिणामकारक ठरतात.

हिवाळ्यातल्या थंड आणि कोरड्या हवामानाचा परिणाम आधी त्वचेवर होतो कारण त्वचा ही जास्त संवेदनशील असते. ती आपल्या ताकदीने थंडीचा सामन करत असते. या संघर्षात त्वचेचा आतला ओलेपणा हरवतो आणि त्वचा कोरडी पडायला लागते. अशा परिस्थितीत त्वचेला थंडीचा सामन करण्याचं बळ देणं आणि त्यासाठी तिला पोषक तत्त्वं पुरवणं हे गरजेचं असतं. या पोषणासाठी घरातील मध आणि गुलाब पाण्याचा चांगला उपयोग होतो.

Image: Google

मध आणि गुलाबपाणी

मध आणि गुलाबपाण्याचा लेप जर चेहर्‍याला नियमित लावला तर कडाक्याच्या थंडीतही त्वचा सुरक्षित राहाते.हा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा मध घ्यावं. हे दोन्ही चांगलं एकजीव करावं. चेहरा आधी धुवून रुमालानं टिपून घ्यावा. मग हा लेप चेहरा आणि मानेला हळुवार मसाज करत लावावा. 20 मिनिटं तो चेहर्‍यावर राहू द्यावा. मग चेहरा कोमट पाण्यानं धुवावा आणि रुमालानं टिपावा . या लेपाचा चांगला परिणाम दिसण्यासाठी हा लेप किमान आठवड्यातून दोन वेळा तरी लावायला हवा.

Image: Google

लेपाचा परिणाम काय होतो?

* मध आणि गुलाबपाणी या नैसर्गिक घटकांचा वापर करुन हा लेप करत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यास मदत होते.

* मधात त्वचेला आद्र/ ओलसर ठेवण्याचा गुणधर्म असतो. त्याचा फायदा या लेपानं त्वचेला मिळतो.

* गुलाब पाणी त्वचा कोरडी पडल्यामुळे होणारी आग तर थांबवतंच पण त्वचेचा पोत आतून सुधारतं. त्याचा परिणाम त्वचा छान ताजीतवानी दिसते. गुलाब पाण्याचा उपयोग नैसर्गिक टोनर म्हणूनही करतात.