केसांना कृत्रिम आणि रसायनयुक्त कलर लावणं टाळून केस फॅशन म्हणून रंगवण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी, पांढरे केस झालेत म्हणून.. अशा अनेक कारणांनी केसांना मेहंदी लावली जाते. साधारण दर दिड दोन महिन्यांनी केसांना मेहंदी लावली जाते. पण हिवाळ्यात केसांना मेहंदी लावली की अनेकींना त्रास होतो. हिवाळ्यात मेहंदी लावली की ती बाधते. म्हणून ती लावावीशी वाटत नाही, पण केसांकडे बघता लावल्याशिवाय राहवतही नाही. मग काय करायचं?
Image: Google
हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्यास ती अनेकांना बाधते हे खरं आहे. पण म्हणून केसांची गरज असेल तर अवश्य मेहंदी लावावी असा सल्ला हेअर एक्सपर्ट देतात. यासाठी खास हिवाळ्यात मेहंदी लावताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास केसांना लावलेल्या मेहंदीचा त्रास होत नाही. यासाठी तज्ज्ञांनी पाच उपाय सांगितले आहेत.
हिवाळ्यात केसांना मेहंदी लावताना
Image: Google
1. आवळ्याचं पाणी
हिवाळ्यात केसांना मेहंदी लावण्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होवू नये यासाठी आवळ्याचं पाणी फायदेशीर आहे. आवळ्याच्या पाण्यात मेहंदी भिजवल्यास केसांना मेहंदीचा रंग चांगला आणि लवकर चढतोच . त्यामुळे जास्त वेळ केसांवर मेहंदी ठेवण्याची गरज पडत नाही. तसेच आवळ्यामुळे केस पांढरे होण्यावर नियंत्रण येतं. केसांवफ्र चमक येते. आवळ्याचं पाणी मेहंदी भिजवताना वापरताना आवळ्याची पावडर पाण्यात टाकून ती चांगली मिसळून घ्यावी. मग ते थोडं गरम करुन घ्यावं आणि या गरम पाण्यातच मेहंदी भिजवावी. आवळ्याच्या पाण्यात मेहंदी भिजवून केसांना लावल्यास केसांवर ती फक्त 40 मिनिटं ठेवली तरी चालते. 40 मिनिटांनी केस नेहमीप्रमाणे धुवावेत.
Image: Google
2. तिळाचं तेल
तिळाचं तेल हे गुणानं गरम असतं. तिळाचं तेल हिवाळ्यात केसांना लावल्यास केस काळेभोर राहातात आणि केसात चमकही येते. हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्यानंतर सर्दी खोकला होवू नये, यासाठी तिळाचं तेल मेहंदीत मिसळून लावल्यास फायदा होतो. तिळाच्या तेलानं केस लवकर रंगतात, शिवाय तिळाचं तेल गरम असल्यानं टाळूला ऊब मिळते. मेहंदी भिजवल्यावर त्यात थोडं तिळाचं तेल गरम करुन टाकावं आणि ते चांगलं मेहंदीमधे मिसळून मेहंदी केसांना लावावी.
Image: Google
3. लवंगाचं पाणी
लवंग हे केसांसाठी फायदेशीर असते. लवंगीमधे जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. तसेच दाह आणि सूजविरोधी गुणधर्म असल्यानं लवंगीचा उपयोग टाळूवरील सूज =कमी होते. केसांना मेहंदी लावल्यानंतर शरीर थंड पडू नये म्हणूनही लवंग उपयोगात येते. यासाठी मेहंदी भिजवण्याआधी थोडं पाणी घेऊन त्यात 7-8 लवंगा घालाव्यात. मग हे पाणी चांगलं उकळावं. पाणी उकळून लवंगाचा अर्क पाण्यात उतरला की गॅस बंद करावा. आणि मग हे पाणी कोमटसर असतानाच या पाण्यात मेहंदी भिजवावी आणि केसांना लावावी.
Image: Google
4. बीटाचा रस
बीटाचा रस पांढर्या केसांसाठी फायदेशीर असतो. मेहंदी भिजवताना त्यात बीटाचा रस घातल्यास मेहंदी केसांवर जास्त वेळ ठेवण्याची गरज नसते. बीटाच्या रसात अँण्टिऑक्सिडण्टस, क, ई जीवनसत्त्व आणि बिटा केरोटीन असतं. या गुणधर्मांमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेहंदी भिजवताना अर्धा वाटी बीटाचा रस घालावा. बीट किसून हातानं किंवा सुती कापडात बांधून पिळल्यास रस निघतो.
Image: Google
5. दालचिनी-ओवा -हळद
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेत मेहंदी लावण्यासाठी मेहंदी भिजवतांना दालचिनी, ओवा आणि हळदीचा उपयोग करावा. यासाठी दोन कप पाण्यात दालचिनी, ओवा आणि हळद घालून पाणी चांगलं उकळून घ्यावं. हे पाणी गाळून ते थोडं कोमट होवू द्यावं. मग या कोमट पाण्यातच मेहंदी भिजवावी आणि केसांना लावावी.हिवाळ्यत केसांना मेहंदी लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशीरा केसांना मेहंदी लावू नये. वातावरणात थंडावा असल्यानं त्याचा त्रास होतो. आणि हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्यावर ती एरवीपेक्षा लवकर धुवावी हा नियम आहे.