हिवाळा सुरू झाला की बाेचऱ्या थंडीसोबत अनेक समस्या छळू लागतात. उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू कसे निघून जातात, समजतही नाही. या दोन ऋतूंमध्ये आपल्याला आपल्या त्वचेकडे, केसांकडे विशेष लक्षही द्यावे लागत नाही. पण हिवाळ्यातले हवामान मात्र आपल्या त्वचेसाठी खूपच त्रासदायक ठरते. त्वचेकडे, केसांकडे या काळात दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम थेट त्वचा कोरडी पडण्यावर होतो. दररोज रात्री झोपताना व्हॅसलिन, सकाळी उठल्यावर मॉईश्चरायझर असं सगळं करूनही त्वचा अनेकदा उलते. मग केसांसाठी तर आपण असं काहीच दररोज करत नाही. त्यामुळे हिवाळ्यात केसांचे खूप जास्त नुकसान होते.
हिवाळ्यात बहुसंख्य लोकांना जाणवणारी एक प्रमुख समस्या म्हणजे केसात होणारा खूप जास्त कोंडा. कधी कधी हा कोंडा इतका जास्त वाढतो की अगदी आपण केसांचा थोडा भांग जरी बदलला, तरी लगेच त्या भांगात कोंड्याचा थर दिसू लागतो. चारचौघात ही गोष्ट खूपच लाजवते. कोंडा खूप वाढणं म्हणजे डोक्यातली कोरडी त्वचा वाढणं. कोरड्या पडलेल्या त्वचेमुळे मग डोक्यात खाजही सुटते. वारंवार डोकं खाजवावं लागतं.
यामुळे काही जणींच्या डोक्यात मग रक्त येऊन खपल्याही होतात. डोक्यात खूप जास्त कोंडा झाला की केसांना पोषण मिळत नाही. त्यामुळे मग इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात केस गळतीची समस्या खूप तिव्र स्वरूपात जाणवायला लागते. केसातला कोंडा चेहऱ्यावर आला की पिंपल्सचा त्रास सुरू होतो. असा सगळा त्रास टाळण्यासाठी सगळ्यात आधी डोक्यातला कोंडा कमी करायला हवा. म्हणूनच तर कोंडा कमी करण्यासाठी हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा.
१. कडूलिंबाची पाने
कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हेच गुणधर्म आपल्या केसांमधला कोंडा घालविण्यासाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे कडूलिंब २० ते २५ पाने घ्या. या पानांमध्ये लिंबाची १० ते १५ पाने टाका. थोडे पाणी गरम करा आणि त्यात ही पाने अर्धातास भिजू द्या. पाने भिजली की ती मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट हळूवारपणे केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.
२. डोक्याची मालिश करा
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, ही त्वचेची सगळ्यात मुख्य समस्या असते. त्वचा कोरडी झाल्यामुळेच कोंड्याचा त्रास सुरु होतो. कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्याची गरज असते. त्यामुळेच हिवाळ्यात डोक्याची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा डोक्याला चांगली मालिश करा. मालिश करण्यासाठी जे तेल वापराल ते आधी कोमट करून घ्या. मालिश करताना हळूवार करा. जोरजोरात नको.
३. संत्र्याची साले
यालाच आपण ऑरेंज पील पॅक असेही म्हणतो. पुर्वी शिकेकाईचा वापर करून महिला केस धुवायच्या. शिकेकाईमध्ये असणारा मुख्य घटक म्हणजे संत्र्याची साले. केसातला कोंडा कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालांपासून बनविलेला हेअरपॅक हा एक उत्तम उपाय आहे. संत्र्याची साले कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. सालं नरम पडली की ती मिक्सरमधून फिरवून वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा आणि त्यानंतर पाऊण- एक तासाने केस धुवून टाका.
४. मीठ
कोंडा कमी करण्यासाठी मीठ देखील उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी एक वाटी कोमट पाणी घ्या. या वाटीत एक टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात चांगले विरघळले की ते पाणी केसांच्या मुळाशी लावा. यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोरड्या केसांना मीठाचे पाणी लावू नका. हा उपाय करण्यासाठी केसांना थोडे तेल लावा आणि त्यानंतरच मीठाचे पाणी लावा.
५. मेथी हेअरपॅक
मेथीच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे हा हेअरपॅक केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. यामुळे केस निरोगी राहतात तसेच कोंडाही कमी होतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी मेथीचे जवळपास मुठभर दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते खलबत्त्यात कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर त्याची पेस्ट केसांना लावा. मेथ्या ज्या पाण्यात भिजवल्या होत्या, ते पाणी या पेस्टमध्ये वापरावे. एक तासाने केस धुवून टाका.
६. लिंबू किंवा दही
लिंबू, दही, ताक, ॲपलसाईड व्हिनेगर या पदार्थांमध्ये असणारे ॲसिडिक घटक डोक्याच्या त्वचेची पीएच पातळी संतूलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे असे आंबट पदार्थ केसाच्या मुळाशी लावा. या आंबट पदार्थात थोडा खाण्याचा सोडाही टाका.अर्धा- एक तास ते तसेच डोक्यावर राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा. हा उपाय केल्यावर शाम्पू लावा. मात्र कंडीशनर लावणे टाळा.