Lokmat Sakhi >Beauty > थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय

थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय

हिवाळ्याची सुरुवात होताच त्वचा कोरडी पडू लागते. तिच्यातला ओलावा कमी होत जातो. पायांची इतकी वाईट अवस्था होते की चारचौघात लाज वाटते. असं सगळं टाळायचं असेल तर हे ७ घरगुती उपाय करून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 06:13 PM2021-10-29T18:13:38+5:302021-10-29T18:14:15+5:30

हिवाळ्याची सुरुवात होताच त्वचा कोरडी पडू लागते. तिच्यातला ओलावा कमी होत जातो. पायांची इतकी वाईट अवस्था होते की चारचौघात लाज वाटते. असं सगळं टाळायचं असेल तर हे ७ घरगुती उपाय करून बघा. 

In winter season skin becomes dry.. 7 Home Remedies for Soft Skin and cracked heels due to dryness | थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय

थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय

Highlightsहिवाळ्यात त्वचेचा पोत टिकवून ठेवायचा असेल तर शरीराचे आतून मॉईश्चरायझिंग करणारे काही घटक आपल्या पोटात जाणेही गरजेचे आहे.

उन्हाळा किंवा पावसाळा या दोन्ही ऋतुंमध्ये त्वचेचा जेवढा त्रास होत नाही, तेवढा त्रास एकट्या हिवाळ्यातच होतो. त्वचेच्या बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात त्वचेचा सगळा पोतच खराब होतो. त्वचा खूपच रुक्ष आणि कोरडी दिसू लागते. तरुण वयातही हात, पाय अक्षरश: सुरकुतलेले दिसू लागतात. चेहऱ्याचा ग्लो देखील कमी होऊ लागतो. यासोबतच सगळ्यात वाईट अवस्था होते ती तळपायांची. भेगाळलेले, कोरडे झालेले तळपाय तर चारचौघात खूपच लाज आणतात. मग हे पाय लपविण्यासाठी अख्खा हिवाळा सॉक्स घालून किंवा पाय न दिसणारे बुट घालून फिरावं लागतं. हे असं सगळं होऊ नये, म्हणून हे काही सोपे घरगुती उपाय नियमितपणे करा. 

 

१. दररोज मॉईश्चरायझर लावा
मॉईश्चरायझर म्हणजे थंडीच्या दिवसातला मोठा आधार आहे. त्यामुळे अंघोळ झाली की न चुकता सगळ्या शरीरावर मॉईश्चरायझर लावा. अनेकदा आपण फक्त हात आणि पायालाच माॅईश्चरायझर लावतो. पण थंडीचा कहर वाढला की पोट, पाठ हे भाग देखील कोरडे पडू लागतात. त्यामुळे हवं तर मॉईश्चरायझर बाथरूममध्येच ठेवा. अंग कोरडं केल्यानंतर सगळ्या अंगाला मॉईश्चरायझर लावा, पायांना सुद्धा मॉईश्चरायझर चोळा आणि त्यानंतरच पुढच्या कामाला लागा.

 

२. रात्री पेट्रोलियम जेली विसरु नका
अंघोळ केल्यानंतर मॉईश्चरायझर लावण्याएवढंच गरजेचं आहे रात्री सगळ्या अंगाला पेट्रोलियम जेली लावून थोडं मसाज करणं. कितीही थकवा आला तरी रात्री अंगाला पेट्रोलियम जेली लावण्यास विसरु नका. तळपायांना देखील पेट्रोलियम जेली लावा. 

३. आठवड्यातून एकदा मालिश करा
तेल लावून सर्वांगाला मालिश करणं हिवाळ्याच्या दिवसात खूप गरजेचं आहे. यासाठी खूप काही करण्याची गरज नाही. खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल अर्धी वाटी भरून घ्या. हे तेल थोडं काेमट करा आणि त्यानंतर ते हात, पाय, पाठ, पोट, तळपाय, मान, छाती या सगळ्या अवयवांना चोळून चोळून लावा. अर्धी वाटी तेल शरीरात जिरलं पाहिजे याची काळजी घ्या. १५ मिनिटे स्वत:च स्वत:ला मसाज करा. तेल अंगावर तसंच राहू द्या आणि अर्ध्यातासाने अंघोळ करा. अंगावर तेल लावलेलं असताना धुळीत जाणं टाळा. अगदी गच्चीवर किंवा अंगणात देखील जाऊ नका. शक्यतो एकाख खोलीत बसून रहा.

 

४. अंघोळीच्या पाण्यात टाका....
थंडीच्या दिवसात आपण थंडी वाजते म्हणून खूप गरम किंवा अगदी कडक पाणी घेतो. कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे डिहायड्रेशन होते. यामुळे त्वचेतला नैसर्गिक ओलावा कमी होऊन ती कोरडी पडते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात एखादा चमचा खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ओटमिल पावडर असं काहीही टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. त्वचा कोरडी पडण्याचा त्रास खूप कमी होईल. 

 

५. भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात खूप थंडी असल्याने जास्त तहान लागत नाही. त्यामुळे आपण इतर ऋतुंपेक्षा खूपच कमी पाणी हिवाळ्यात पितो. पण हे असं करणं आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक आहे. पाणी कमी प्यायल्यामुळे त्वचा शुष्क, कोरडी पडू लागते.  त्यामुळे त्वचेतला नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या. थंड पाणी प्यायले जात नसेल तर पाणी कोमट करून प्या. 

 

६. अशी करा मालिश
खोबरेल तेल, तिळाचे तेल हे तर त्वचेसाठी पोषक आहेतच पण ऑलिव्ह ऑईल, जोजोबा ऑईल आणि दही या तिन्ही गोष्टी समान प्रमाणात घ्या आणि या मिश्रणाने अंगाला मालिश करा. दोन्ही प्रकारच्या तेलाने त्वचा छान मॉईश्चराईज होऊन तिचे पोषण होते तर दह्यामुळे त्वचा चमकदार बनते. 

 

७. आहारात करा बदल
हिवाळ्यात त्वचेचा पोत टिकवून ठेवायचा असेल तर शरीराचे आतून मॉईश्चरायझिंग करणारे काही घटक आपल्या पोटात जाणेही गरजेचे आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष द्या. साजूक तूप खाण्याचे प्रमाण हिवाळ्यात वाढवा. त्यासोबतच भिजवलेले बदाम, टोमॅटो, गाजर, मटार, मसूर, दूध, पनीर, चीज यासारख्या पदार्थांचे आहारातील सेवन वाढवा. 

 

Web Title: In winter season skin becomes dry.. 7 Home Remedies for Soft Skin and cracked heels due to dryness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.