चेहरा स्वच्छ होण्यासाठी चांगल्या फेसवॉश किंवा साबणाचा शोध घेत असाल तर आधी चेहरा हा केवळ साबण आणि फेसवॉशनेच स्वच्छ होतो हा समज काढून टाका. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि शुष्क होते. अशा परिस्थितीत जर चेहरा धुण्यासाठी साबण आणि फेसवॉशचा वापर केला तर त्वचा आणखीनच कोरडी होते. साबण आणि फेसवॉशच्या वापरानं चेहर्याची त्वचा आक्रसते. साबण आणि फेसवॉशमधील घटकांमुळे चेहर्याची त्वचा केवळ कोरडी होते असं नाही तर ती काळवंडते देखील. म्हणूनच हिवाळ्यात चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमीच्या साबण आणि फेसवॉशला पर्याय शोधायला हवा. अर्थात यासाठीचा पर्याय हा नैसर्गिकच हवा.
Image: Google
चेहरा स्वच्छ करण्यासाठीच्या नैसर्गिक गोष्टी शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. या गोष्टी सहज घरात उपलब्ध होतात. मध, कच्चं दूध, गुलाब पाणी, काकडी आणि ऑलिव्ह तेल हे नैसर्गिक क्लिंजर म्हणून ओळखले जातात. चेहरा स्वच्छ होण्यासोबतच त्वचेचं पोषण करण्याचं, त्वचा ओलसर ठेवण्याचं कामही हे नैसर्गिक क्लिन्जर करतात. या आपल्या ओळखीच्या वस्तू क्लिंजर म्हणून कशा वापरायच्या हे मात्र माहित नसतं. कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. रुचि शर्मा यांनी मध, कच्चं दूध, काकडी, गुलाब पाणी आणि ऑलिव्ह तेलाचा उपयोग चेहरा स्वच्छ करण्यासाठी कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
Image: Google
मध
हिवाळ्यात साबण आणि फेसवॉशपेक्षा मधाचा उपयोग करणं जास्त सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. मधामधे मॉश्चरायजिंग घटक असतात. मधाचा वापर क्लींजर म्हणून केल्यास मधातील घटक त्वचेतील ओलावा धरुन ठेवतात. मधामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच पण ती उजळते आणि चमकतेदेखील. एक उत्तम नैसर्गिक क्लींजर म्हणून मध ओळखलं जातं. मधाच्या उपयोगानं त्वचेशी संबंधित इतर समस्याही सहज दूर होतात.मधाचा क्लीन्जर म्हणून वापर करताना एक चमचा पाणी घ्यावं. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावं. मग ते चेहर्याला लावावं. दहा मिनिटं थांबावं. नंतर चेहरा पाण्यनं स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा स्वच्छ होते, त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्वचा मऊ मुलायम होवून चेहर्यावर चमक येते.
Image: Google
कच्चं दूध
कच्च्या दुधात त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. अनेक सौंदर्य उत्पादनात कच्च्या दुधाचा वापर केला जातो. कच्चं दूध हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय आहे. दुधात अ आणि के हे जीवनसत्त्वं असतात. तसेच त्वचा ओलसर ठेवणारे घटक कच्च्या दुधात असतात. कच्च्या दुधामुळे चेहर्यावरची घाण, माती सहज निघून जाते.कच्च्या दुधाचा नैसर्गिक क्लिंजर म्हणून वापर करताना एका छोट्या वाटीत थोडं कच्चं दूध घ्यावं. ते कापसाच्या बोळ्यानं चेहर्याला लावावं. दूध लावून झाल्यावर 5-10 मिनिटं थांबावं. आणि मग चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. कच्च्या दुधामुळे त्वचा स्वच्छ होवून मऊ मुलायम होते.
Image: Google
काकडी
थंडीत केवळ चेहरा स्वच्छ करण्यासाठीच नाही तर त्वचा चमकण्यासाठी काकडीचा उपयोग होतो. काकडीत अ जीवनसत्त्व असतं. ते त्वचेसाठी उपयुक्त असतं. काकडीत भरपूर पाणी असतं. काकडीचा उपयोग चेहरा स्वच्छ करण्यासाठी केल्यास त्यामुळे त्वचा ओलसर राहाते. शिवाय काकडीच्या अशा उपयोगानं त्वचेचा रंगही उजळतो. त्वचेशी निगडित समस्या काकडीच्या वापरानं दूर होतात.काकडीचा उपयोग क्लिंजर म्हणून करण्यासाठी सर्वात आधी ताजी काकडी घेऊन ती किसावी. काकडीचं पाणी पिळून काढावं. हे पाणी चेहर्यावर कापसाच्या बोळ्यानं लावावं. थोडा वेळ ते चेहर्यावर सुकू द्यावं. नंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. काकडीच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ केल्यानं त्वचा ताजी तवानी होते, स्वच्छ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा ओलसर राहाते.
Image: Google
गुलाब पाणी
गुलाब पाण्याचा उपयोग टोनर म्हणून होतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण गुलाब पाणी हे नैसर्गिक क्लिंजर असून जे काम फेसवॉश करु शकत नाही ते काम गुलाब पाणी करतं. गुलाब पाण्यामुळे चेहर्यावर जमा झालेली घाण निघून जाते. गुलाब पाणी पटकन शोषलं जातं. गुलाब पाण्यातील घटक त्वचेच्या रंध्रांमधे अडकलेली घाण खोलातून स्वच्छ करतात. गुलाब पाण्यानं चेहरा स्वच्छ केल्यानं त्वचा ओलसर राहाते आणि चमकते देखील.गुलाब पाण्यानं चेहरा स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत 2-3 चमचे गुलाब पाणी घ्यावं. त्यात एक छोटा चमचा मुलतानी माती घालावी. हे चांगलं मिसळून त्याची मऊ पेस्ट करावी आणि चेहर्यावर लावावी. ही पेस्ट लावल्यानंतर चेहर्यावर ज्या ठिकाणी जास्त तेल आहे त्या चेहर्याच्या टी झोनमधे हलक्या हातानं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर दोन मिनिटांनी चेहर्यावरचा लेप स्वच्छ करावा. यासाठी तो रगडून साफ करु नये. एक मऊ रुमाल घ्यावा. तो कोमट पाण्यात पिळून चेहर्यावर फिरवून लेप काढावा आणि मग चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतं. त्याचा उपयोग नैसर्गिक क्लिंजर म्हणूनही होतो. ऑलिव्ह ऑइलनं चेहरा स्वच्छ करताना आधी हात स्वच्छ धुवावेत. थोडंसं ऑलिव्ह ऑइल घ्यावं. ते हातात काही वेळ चोळावं आणि मग ते तेल चेहर्यावर मसाज करत लावावं. दोन तीन मिनिटं थांबावं. मग रुमाल गरम पाण्यात बुडवून पिळून घ्यावा. हा रुमाल काही सेकंद चेहर्यावर झाकावा. थोडा वेळानं पुन्हा रुमाल गरम पाण्यात बुडवून-पिळून पुन्हा चेहर्यावर झाकावा. असं तीन चारदा केल्यावर चेहरा स्वच्छ होतो. शेवटी चेहरा साध्या पाण्यानं धुवावा.