Join us  

केसांना कुणी लोणच्याच्या वासाचे आचारी तेल लावेल का? लावून तर पाहा, केसांच्या समस्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 5:30 PM

हिवाळ्यात केसांच्या विविध समस्या डोकं वर काढतात. अनेक समस्यांवरचा एक उपाय घरच्याघरी करता येतो. यासाठी ‘ब्यूटी इन्फ्ल्युएन्सर’ म्हणून ओळख असलेल्या वसुधा राय यांनी सांगितलेला लोणच्याच्या वासाच्या तेलाचा उपयोग करायला हवा.

ठळक मुद्देलोणच्याच्या वासाचं हे तेल घरच्याघरी तयार करता येतं. हे तेल तयार करताना सहज उपलब्ध होतील अशा 4 घटकांचा वापर केला जातो.वाताशी निगडित केसांच्या आणि त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी लोणच्याच्या वासाचं हे तेल हे फायदेशीर ठरतं.केसांना मेहंदी लावत असाल तर हे औषधी तेल वापरल्यास केसांवर मेहंदीचा परिणाम चांगला होतो.

 हिवाळ्यात त्वचा कोरडी होतेच, केस गळतात हा जणू निसर्गनियम असल्यासारखं याकडे बघितलं जातं. पण हा नियम आपण त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेतली तर किमान आपल्यापुरता तरी खोटाही ठरवू शकतो. थंडीत केसांना तेल लावण्याचा कंटाळा केला जातो. पण तेलामुळेच केसांना आणि टाळुला पोषण मिळतं. योग्य तेल जर केसांना लावलं गेलं तर केसांचं पोषण तर होतच शिवाय केस आणि टाळू निरोगी राहाण्यास स्वच्छ होण्यासही मदत होते. हिवाळ्यातली केस गळतीची समस्या घरच्याघरी सोडवायची असेल तर ‘ब्यूटी इन्फ्ल्युएन्सर’ म्हणून ओळख असलेल्या वसुधा राय यांनी सांगितलेला लोणच्याच्या तेलाचा उपयोग करायला हवा.

Image: Google

लोणच्याचं तेल आणि तेही केसांना कसं शक्य आहे? असा प्रश्न पडून या तेलाकडे संशयानं पाहाण्याआधी या तेलाला लोणच्याचं तेल का म्हणतात हे तरी समजून घ्यायला हवं. वसुधा राय या तेलाला ‘आचारवाला तेल’ असं संबोधतात ते या तेलाच्या वासामुळे. केसांसाठी वसुधा राय यांनी सांगितलेलं तेल तयार केलं की त्याचा लोणच्यासारखा वास येतो. अर्थात केस धूतल्यानंतर हा वास निघूनही जातो. पण हे तेल केसांचं पोषण करण्यास, केसांचा पोत सुधारण्यास, केस गळती थांबवण्यास आणि केस पांढरे होण्यापासून रोखण्यास उपयोगी पडतं. एका तेलामुळे केसांशी निगडित अनेक प्रश्न सुटणार असतील तर असं तेल अवश्य वापरायला हवं असं वसुधा राय सांगतात.

लोणच्याच्या वासाचं हे तेल घरच्याघरी तयार करता येतं. हे तेल तयार करताना सहज उपलब्ध होतील अशा 4 घटकांचा वापर केला जातो. हे सर्व घटक त्यांच्यातील पोषण गुणधर्मामुळे ओळखले जाऊन त्यांच्यातला समान वैशिष्ट म्हणजे हे घटक एकएकटे वापरले तरी त्यामुळे केसांना वेगवेगळा फायदा मिळतो. मग केसांशी निगडित अनेक फायदे या चार गोष्टी एकत्र करुन सहज करता येईल या भूमिकेतून वसुधा राय यांनी ही लोणच्याच्या वासाच्या तेलाची कृती सांगितली आहे.

आयुष्यभर मला कोणी एक ब्यूटी प्रोडक्ट वापरण्यास सांगितलं तर मी या लोणच्याच्या वासाचं तेल निवडेल. हे तेल केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. या तेलानं अंगाची मालिश केली आणि थोड्या वेळानं आंघोळ केली की त्वचा छान मऊ होते. या तेलाचा केसांसाठी उपयोग सांगताना वसुधा राय याचं आयुर्वेदाच्या दृष्टीनंही महत्त्व सांगतात/ वात प्रकृतीमुळे त्वचा आणि केस खराब होतात. टाळुची त्वचा खराब होवून केसात कोंडा होणं, टाळुची त्वचा कोरडी होवून खाज येणं, केस कमजोर होऊन तुटणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. वाताशी निगडित केसांच्या आणि त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी लोणच्याच्या वासाचं हे तेल हे फायदेशीर ठरतं.

Image: Google

कसं करायचं लोणच्याच्या वासाचं हेअर ऑइल?

वसुधा राय म्हणतात, ज्या प्रकारे आपली आई हे तेल तयार करायची त्याच प्रकारे मी देखील हे तेल तयार करते. यासाठी एक कप घाण्याचं मोहरीचं तेल, 10-12 कढी पत्त्याची पानं, 1 मोठा चमचा मेथ्या आणि औषधी भीमसेनी कापूर एवढी सामग्री लागते.

हे तेल तयार करताना आधी मोहरीचं तेल एका कढईत चांगलं उकळायचं. ते उकळलं की मग त्यात कढीपत्ता आणि मेथ्या घालाव्यात. गॅसची आच मंद करुन तेल आणखी 10 मिनिटं उकळवं. गॅस बंद करुन तेल थंड होवू द्यावं. थंड झालेल्या तेलात भीमसेनी कापूर चुरा करुन घालावा. हे तेल एकदा करुन ठेवलं तर महिनोनमहिने टिकतं. हे तेल भांड्यातून तसंच बाटलीत भरुन ठेवलं तरी चालतं किंवा गाळून घेतलं तरी चालतं.केसांना तेल लावताना आधी एका वाटीत हे तेल थोड्या प्रमाणात घ्यावं. ते थोडं कोमट करावं आणि बोटांनी हलका मसाज करत केसांना आणि टाळुच्या त्वचेला लावावं. तेल लावल्यानंतर अर्धा ते एक तासानं केस सौम्य शाम्पू आणि कोमट पाणी वापरुन धुवावेत.

Image: Google

काय होतो फायदा?

1. वसुधा राय सांगतात की हिवाळ्यात हे तेल अवश्य वापरावं. त्याचा फायदा होतो. कारण या तेलामुळे उब मिळते. थंडीत होणारा त्रास हे तेल कमी करतं.2. जर केसांना मेहंदी लावण्याची सवय असेल तर या तेलाचा वापर केल्यानं केसांवर मेहंदीचा रंग चढतो आणि टिकतोही.3. या तेलातील मेथ्यांचा उपयोग केस मऊ मुलायम होण्यासाठी होतो.4. या तेलातील कढीपत्त्यामुळे केस गळती थांबते आणि केस पांढरे होण्यावर नियंत्रण ठेवलं जातं.5. तेलातील भीमसेनी कापुराचा फायदा टाळुला येणारी खाज थांबवण्यास होतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स