आपली त्वचा कायम तजेलदार आणि तुकतुकीच असावी असे प्रत्येकाला वाटते. पण कधी अनुवंशिकता म्हणून तर कधी अन्य काही कारणांनी तरुण वयातच त्वचा सुरकुतलेली दिसते. आपण राहत असलेले वातावरण आणि जीवनशैली यामुळेही त्वचा सैल पडल्यासारखी किंवा कोरडी होते. मग अगदी दैनंदिन ऑफीसला जाणे असो किंवा समारंभांना चेहऱ्यावर अगदी सहज दिसणाऱ्या या सुरकुत्या झाकणे अवघड होऊन जाते. आता वयाच्या पंचविशी-तिशीतच त्वचा सुरकुतली तर ती झाकण्यासाठी काही ना काही उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाणे किंवा वेगवेगळे फेस मास्क वापरणे असे उपाय केले जातात. पण सगळ्यांनाच हे उपाय परवडतील असे नाही. तेव्हा नियमितपणे काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही अशाप्रकारच्या सुरकुत्यांपासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकता. पाहूयात काही सोप्या आणि सहज करता येण्यासारख्या गोष्टी...
१. सूर्यापासून त्वचा जपा - ऊन अंगावर घेणे चांगले असते असे आपण म्हणत असलो तरीही ते कोवळे ऊन असते हे लक्षात घ्यायला हवे. इतर वेळी सूर्याची किरणे थेट अंगावर येत असतील तर त्यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. यामध्ये त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे आणि सुरकुतणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही दररोज घराबाहेर पडताना त्वचा थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी बाजारात सनस्क्रीन लोशनही मिळतात. ३० किंवा त्याहून जास्त SPF असलेले लोशन वापरा.
२. अँटीटॅनिंग क्रीमचा वापर करा - त्वचा टॅन झाली की आपण वयस्कर दिसतो. ही त्वचा टॅन व्हायची वेगवेगळी कारणे असतात. यामध्ये कधी स्विमिंगच्या क्लोरीन असलेल्या पाण्यामुळे, कधी उन्हामुळे तर कधी तुम्ही सतत कारखान्यात काम करत असाल किंवा काही पदार्थ तयार करण्यासाठी सतत गॅससमोर उभे असाल तर त्वचा टॅन होऊ शकते. अशावेळी तुम्ही अँटीटॅनिंग क्रीमचा वापर करु शकता. जेणेकरुन त्वचा टॅन होण्यापासून तुम्ही वाचू शकाल.
३. धूम्रपान बंद करा - तुम्हाला धुम्रपानाची सवय असेल तर ती बंद करा. कारण धुम्रपानामुळे तुमची त्वचा सुरकुतण्यास मदत होते. यामुळे त्वचा निस्तेज तर होतेच पण ती सैलही पडते.
४. चांगला आहार घ्या - उत्तम आरोग्यासाठी ज्याप्रमाणे संतुलित आहार घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यासही तुमच्या आहारात शरीराला पोषक घटकांचा समावेश आवश्यक आहे. ताजी फळे, भरपूर भाज्या खाल्ल्याने तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश ठेवा.
५. आठवड्यातील शक्य तितके दिवस व्यायाम करा - धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामाला अजिबात वेळ मिळत नाही असे आपण वारंवार म्हणतो. पण व्यायाम हा तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आठवड्याचे सगळे दिवस व्यायाम करणे शक्य नसले तरी शक्य तितके दिवस नक्की व्यायाम करा. याचा त्वचा तुकतुकीत राहण्यास निश्चित मदत होईल.
६. त्वचा हळूवार धुवा - अनेकदा आपण हात किंवा चेहऱ्यावर मळ आहे म्हणून ती जोरजोरात घासतो. किंवा बाजारात मिळणाऱ्या स्क्रबचा वापर करतो पण यामुळे त्वचा सुरकुतण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा हळूवारपणे धुणे आवश्यक आहे.
७. घाम आल्यावर चेहरा लगेच धुवा - सतत मास्कचा वापर, हेल्मेट, स्कार्फ यांमुळे चेहऱ्याला घाम येऊ शकतो. अशावेळी चेहरा तसाच न ठेवता तो लगेच स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे आहे. हा घाम त्वचेत मुरल्यास तो त्वचेचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे प्रत्येकवेळी चेहरा धुणे चांगले.
८. चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा - मॉइश्चरायझरमुळे तुमच्या त्वचेत पाणी काही काळ तसेच राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडून सुरकुतण्याची क्रिया होत नाही. म्हणून चेहऱ्याला नियमित मॉइश्चरायझर लावावे.
९. अल्कोहोलचे कमीत कमी सेवन - अल्कोहोलमुळेही त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अल्कोहोलमुळे त्वचा डिहायड्रेट होते आणि यामुळे कालांतराने त्वचा खराब होते. असे झाल्याने तुम्ही नकळत वयस्कर दिसायला लागता.
१०. चांगली उत्पादने वापरा - तुम्ही चेहऱ्याच्या मेक अपसाठी जी उत्पादने वापरता ती चांगल्या प्रतीची असणे आवश्यक आहे. ही उत्पादने जर चांगली नसतील तर त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळेही तुमच्या त्वचेवर डाग पडणे, पिंपल्स येणे किंवा त्वचा सुरकुतणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.