फळं खाणं हा आरोग्यदायी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. विविध जीवनसत्त्वं, खनिजं यांचा खजिना असलेली फळं शरीराला पोषक तत्त्वं तर पुरवतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत करतात. फळं खाल्ल्यानंतर आपण त्यांची सालं फेकून देतो. पण सौंदर्य तज्ज्ञ सांगतात की फळांची सालं फेकून देऊ नका . ती बाजूला ठेवा आणि त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी वापरा. संत्रं, केळी, डाळिंबं, आंबा, पपई, लिंबू यांची सालं सौंदर्योपचारासाठी वापरता येतात. फळांच्या वाया जाणाऱ्या सालीपासून महागाड्या फेस मास्कच्या तोडीचे लेप आपण घरच्या घरी तयार करु शकतो.
संत्र्याची सालंसंत्र्याच्या सालीत क जीवनसत्त्वं असतं. ब्लॅकहेड, डोळ्याखालची काळी वर्तुळं, कोरडी त्वचा या त्वचेच्या समस्या सोडवण्यासोबतच त्वचेचा वर्ण उजळायलाही संत्र्याची सालं मदत करतात.संत्र्याच्या सालीचा उपयोग करण्यासाठी आधी ही सालं वाळवून घ्यावीत आणि त्याची पावडर तयार करावी. थोडी पावडर घेवून त्यात दूध घालावं. आणि एक दिवसाआड ही पेस्ट चेहेऱ्यास लावावी. तोंडाची दूर्गंधी घालवण्यासाठी संत्र्याची सालं चावून खावीत.
लिंबाची सालंलिंबाच्या सालीत मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, सायट्रिक अॅसिड आणि वजन कमी करण्यात प्रभावी असलेलं पेक्टिन हे तत्त्वं असतं. लिंबाच्या सालीचा सौंदर्योपचार करण्यासठी लिंबाच्या सालीचा आतला भाग दात स्वच्छ करण्यासाठी, दात चमकवण्यासाठी तसेच दातावर असलेले पिवळे डाग निघून जाण्यासाठी होतो. चेहेऱ्यावरील काळे डाग , काळेपणा घालवण्यासाठी लिंबाच्या सालीचा आतला भाग त्वचेवर घासावा. लिंबाचा पीएच स्तर हा कमी असल्यानं त्वचा उजळवण्यासाठी लिंबाच्या सालीचा उपयोग होतो.
डाळिंबाची सालंडाळिंबाच्या सालीत मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं आणि अॅण्टिऑक्सिडण्टस असतात. हे दोन घटक त्वचेसाठी उत्तम काम करतात. डाळिंबाची साल चेहेऱ्यास वापरण्यासठी ती आधी वाळवून घ्यावी. वाळलेल्या सालीची पावडर करावी. एक चमचा पावडर, थोडा लिंबाचा रस आणि मध असं मिश्रण तयार करुन हा लेप चेहेऱ्यास लावावा. त्वचेत ओलसरपणा टिकवण्यास, त्वचा उजळवण्यात आणि चमकवण्यात हा लेप प्रभावी ठरतो. शिवाय चेहेऱ्यावरचे काळे डाग काढून टाकण्यास हा लेप मदत करतो. तसेच डाळिंबाची ताजी साल तशीच चेहेऱ्यावर घासल्यास त्वचा सर्व प्रकारच्या हवामानात आर्द्र राहाण्यास मदत होते.
पपईची सालपपईमधे अ जीवनसत्त्वं असतं. खराब झालेली त्वचा जाऊन त्वचा पुर्नज्जीवित करण्याचं काम पपईचं साल करतं. तसेच पपईच्या सालीत पापेन नावाचं विकर असतं ज्याच्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते शिवाय चेहेऱ्यावरच्या मृत पेशी निघून जातात. पपईची साल आणि गर तळपायांवर घासल्यास भेगा पडून आग होत असल्यास ती नाहीशी होते. तळपाय मऊ होतात. पपईच्या सालीचा उपयोग करुन त्वचा आणि केसांवर उपाय करणारा प्रभावी द्राव तयार करता येतो. यासाठी पपईच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करावेत आणि ते व्हिनेगारमधे एक किंवा दोन महिन्यांसाठी भिजवून ठेवावेत. हा द्राव चेहेरा आणि केसांसाठी तयार करण्यात येणाऱ्या कोणत्याही मास्कमधे वापरता येतो.
केळ्याचं सालकेळ्याचं साल बहुगुणी असतं. त्यात खनिजं, जीवनसत्त्वं आणि अॅण्टिऑक्सिड्ण्टस असतात. त्वचेवर आलेली पूरळ घालवण्यास केळ्याचं साल मदत करतं. तसेच मुरुम , पुटकुळ्या घालवण्यास, त्वचेवरील घाण साफ होण्यास केळ्याच्या सालाचा उपयोग होतो. यासाठी पिकलेल्या केळीचं साल घ्यावं. आणि ते चेहऱ्यास घासावं. साल घासून घासून तपकिरी पडल्यास आणि पातळ झाल्यास घासणं थांबवावं. चेहेरा कोरडा झाला की तो थंड पाण्यानं धुवावा. यामुळे चेहेऱ्यावरील मुरुम , पुटकुळ्या जाण्यास मदत होते.
आंब्याची सालआंब्याची सालं फेकून न देता ती वाळवावीत आणि त्याची पावडर करुन ठेवावी. आंब्याच्या सालीची पावडर आणि त्यात थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. त्यात थोडं पाणी घालावं. ही घट्ट पेस्ट मग चेहेऱ्यावर हळुवारपणे घासावी. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.