त्वचेची काळजी घेण्यासाठी फेसवॉश, टोनर, मॉईश्चरायझर, सिरम, नाईट क्रिम असं स्किन केअर रुटीन सांगितलं जातं. असंच एक ठराविक रुटीन तुमच्या केसांबाबतही असायला हवं. सध्या प्रत्येकाच्याच डाएटमध्ये खूप बदल झाला आहे. त्यामुळे आहारातून केसांसाठी आवश्यक असणारे घटक पोटात जातीलच याची काही खात्री नाही. त्यामुळे कॉस्मेटिक्सच्या (6 must hair care products) माध्यमातून केसांची काळजी घेणं आता गरजेचं झालं आहे.. म्हणूनच आहारातून तर केसांसाठी पौष्टिक ठरणारे पदार्थ नक्कीच घ्या. पण या काही गोष्टी वापरून तुमच्या केसांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा..
१. ॲण्टी ड्रॅन्ड्रफ स्काल्प लोशन
केसांत कोंडा होणं ही समस्या अक्षरश: अनेकांना छळते. हिवाळ्यात तर केसांतला कोंडा एवढा वाढतो की एखादी दुसरी हेअरस्टाईल ट्राय करण्याचीही भीती वाटते. कोंडा वाढला की केस गळती वाढायलाही सुरूवात होते. म्हणूनच केसांसाठी नियमितपणे ॲण्टी डॅन्ड्रफ स्काल्प लोशन वापरा. यामुळे स्काल्पची पीएच लेव्हल मेंटेन राहते आणि कोंडा होण्याची समस्या हळूहळू कमी होते. ॲण्टी डॅन्ड्रफ स्काल्प लोशन वापरल्यामुळे स्काल्पवर असणारी डेड स्किन निघून जाते तसेच स्काल्पमधून होणारं अतिरिक्त ऑईल सिक्रिशन देखील नियंत्रित ठेवलं जातं. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲण्टी डॅन्ड्रफ स्काल्प लोशन ३०० ते ४०० रूपयांत उपलब्ध आहेत.
२. हेअर रिपेअर मास्क
धुळ, प्रदुषण, ऊन यामुळे किंवा मग आहारातून कमी प्रमाणात पोषण मिळाल्याने अनेकदा केसांचा पोत खराब होतो. केस मऊ, मुलायम, चमकदार न दिसता कोरडे आणि रुक्ष दिसू लागतात. अशा केसांना पुन्हा मुळ स्वरूपात आणण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी हेअर रिपेअर मास्क वापरायला हवा. या मास्कमध्ये असणारे घटक केसांचं पोषण करतात, त्यांचा पोत सुधारून त्यांना निरोगी, चमकदार बनवतात. या हेअरमास्कची किंमत साधारण ४०० रूपयांच्या पुढेच असते.
३. हेअर सिरम
आपल्या त्वचेसाठी ज्याप्रकारे सिरमची गरज असते, तशीच गरज आपल्या केसांनाही असते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्यावर अधून मधून सिरमचा वापर करणे गरजेचे आहे. हेअर सिरमच्या वापरामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून ती पक्की होतात. त्यामुळे केस गळतीची समस्या कमी होते. केस तुटणे, केसांना फाटे फुटणे असा त्रासही हेअर सिरममुळे कमी होतो.
या गोष्टीही गरजेच्या....
या तीन गाेष्टींप्रमाणेच शाम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑईल या ३ गोष्टीही केसांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या ६ गोष्टींच्या मदतीने केसांची काळजी घेतली तर नक्कीच केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी होतील.