Join us  

वाट्टेल ती टिकली लावली तर चेहरा खुलत नाही, आपल्या चेहऱ्यासाठी परफेक्ट टिकली निवडण्यासाठी 5 टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 4:18 PM

टिकली लावतानाही बारकाईने विचार करायला हवा. पाहूयात कोणत्या प्रकारच्या चेहऱ्यासाठी कशी टिकली चांगली दिसेल याविषयी...

ठळक मुद्दे लिपस्टीक आणि टिकली यांचा रंग जवळपास सारखा असलेला चांगला.चेहऱ्याची ठेवण, आपली केसांची स्टाईल आणि आपला एकूण लूक यानुसार प्रत्येकीने टिकलीची निवड करायला हवी.

टिकली म्हणजे सौभाग्याचं प्रतीक, आपला धर्म किंवा संस्कृती जपण्याचे एक माध्यम हे सगळे खरे असले तरी पारंपरिक सण-समारंभांना टिकली हवीच. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणारी ही टिकली एरवी नाही तरी खास कार्यक्रम आणि समारंभांना आवर्जून लावली जाते. अगदी एका छोट्या ठिपक्यापासून ते खडे, मोती यांमध्ये आणि विविध रंगात, आकारात, डिझायनर पॅटर्नमध्ये बाजारात टिकल्या उपलब्ध असतात. आता आपल्या चेहऱ्याची ठेवण, आपली केसांची स्टाईल आणि आपला एकूण लूक यानुसार प्रत्येकीने टिकलीची निवड करायला हवी. दागिने किंवा हेअरस्टाईलबाबत आपण जितके जागरुक असतो तितके आपण टिकलीबाबत मात्र नसतो. एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण पटकन समोर येईल ती किंवा आपल्या आवडीची एखादी टिकली लावतो आणि जातो. मात्र टिकली लावतानाही बारकाईने विचार करायला हवा. पाहूयात कोणत्या प्रकारच्या चेहऱ्यासाठी कशी टिकली चांगली दिसेल याविषयी...

१. हार्ट शेप फेस 

भारतीय तरुणींमध्ये साधारणपणे हार्ट शेपमध्ये चेहऱ्याची ठेवण असते. म्हणजेच कपाळाचा भाग मोठा, गालांचा भाग थोडासा फुगीर आणि चेहरा हनुवटीकडे निमूळता होत जाणारा असतो. अशा मुलींनी मोठ्या आकाराची टिकली अजिबात लावू नये. कारण आधीच कपाळ मोठे असते, त्यात मोठी टिकली लावली तर सगळे लक्ष कपाळाच्या भागाकडेच वेधले जाते. त्यामुळे हार्ट शेपचा चेहरा असणाऱ्या मुलींनी शक्यतो लहानशी नाजूक टिकली लावावी. 

(Image : Google)

२. अंडाकृती चेहरा 

अंडाकृती म्हणजेच दंडगोल चेहरा असणाऱ्या तरुणी साधारणपणे दिसायला देखण्या असतात. याचे कारण त्यांचे कपाळ आणि हनुवटीचा भाग हे साधारणपणे सारखे असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधुरी दिक्षित किंवा सोनम कपूर. चेहरा एकसारखा असल्याने या मुलींनी किंवा महिलांनी कोणत्याही प्रकारची टिकली लावली तरी त्यांना छान दिसते. त्यामुळे त्यांनी टिकलीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसते. मात्र त्यांनी खूप उभट आकाराची टिकली लावू नये नाहीतर चेहरा आणखी उभट दिसतो. तसेच लिपस्टीक आणि टिकली यांचा रंग जवळपास सारखा असलेला चांगला.

(Image : Google)

३. गोलाकार चेहरा 

आपल्याकडे साधारणपणे महिलांचा चेहरा गोलाकार असतो. त्यातही तुम्ही थोडे स्थूल किंवा उंचीने कमी असाल तर जाड दिसण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही टिकलीची निवड करताना उभ्या डिझाईनची टिकली निवडावी. त्यामुळे तुमचा चेहरा आणि इतर फिचर्स याचा चांगला बॅलन्स होऊ शकेल. गोल चेहऱ्याला मोठ्या आकाराच्या गोल टिकल्या लावल्या तर तुम्ही आणखी गोल गोल दिसता. त्यापेक्षा उभी टिकली लावली तर चेहऱ्यामध्ये नक्कीच थोडा फरक पडतो. 

(Image : Google)

४. त्रिकोणी चेहरा 

अनेक मुलींचा चेहरा खालच्या बाजुने खूपच निमुळता असतो. यामध्ये खूप बारीक असणाऱ्या मुली येतात. त्यांचे कपाळ लहान असतेच पण एकूण फेसकट त्रिकोणी असतो. म्हणजे हनुवटीच्या बाजुने अगदी टोकदार असल्याने अशा चेहरेपट्टीला आपण साधारणपणे त्रिकोणी चेहरा म्हणतो. या मुली टिकलीच्या बाबतीत नशीबवान असतात, कारण त्यांना कोणत्याही प्रकारची टिकली चांगली दिसते. 

(Image : Google)

५. चौकोनी चेहरेपट्टी

महाराष्ट्र आणि गुजरात या भागातील महिलांची चेहरेपट्टी साधारणपणे चौकोनी असते. अशा महिलांना चंद्रकोरीच्या आकाराची टिकली जास्त खुलून दिसते. इतकेच नाही तर गोल टिकलीही अशा महिलांचा चेहरा बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

(Image : Google)

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्स