बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे लग्न, बाळंतपण या गोष्टी अतिशय चर्चेचा विषय असतात. गेल्या काही दिवसांत आलिया भट, बिपाशा बासू, सोनम कपूर या अभिनेत्रींनी आपल्या चिमुकल्यांना जन्म दिला. मग प्रेग्नन्सीमध्ये त्या कॅरी करत असलेल्या फॅशनपासून ते त्यांची डिलिव्हरी कोणत्या पद्धतीने झाली या विषयांवरही बऱ्याच चर्चा झाल्या. या अभिनेत्रीचे चाहतेही याबाबतची माहिती जाणून घेण्यास कायम उत्सुक असल्याचे दिसते. मग या अभिनेत्रींची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सी सेक्शनने याबाबतही चाहत्यांना जाणून घ्यायचे असते (Actress Sonam Kapoor Deliver baby with Gentle Birth Method).
अभिनेत्री सोनम कपूरने ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. वायु असे या चिमुकल्याचे नाव ठेवण्यात आले असून सध्या सोनम त्याच्यात पूर्णपणे बिझी असल्याचे दिसते. या चिमुकल्यामुळे कपूर आणि अहुजा कुटुंबियांत अतिशय आनंदाचे वातावरण आहे. तर सोनम कपूरची डिलिव्हरी नॉर्मल झाली असे जरी आपल्याला माहिती असेल तरी त्यासाठी खास Gentle Birth Method वापरण्यात आली होती. आपल्याला सामान्यपणे डिलिव्हरीच्या नॉर्मल आणि सिझेरीयन या दोनच पद्धती माहिती असतात. सोनम कपूरनेही नॉर्मल पद्धतीनेच आपल्या बाळाला जन्म दिला. पण ही नवी पद्धत नेमकी काय आहे आणि त्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊया...
काय आहे Gentle Birth Method..
डॉ. गौरी मोथा यांनी ही पद्धत डिझाईन केली असल्याचे सोनमने सांगितले. सोनम म्हणाली, मला बाळाला नैसर्गिकरित्या जन्म द्यायचा होता त्यामुळे मी डॉ. मोथा यांचे मार्गदर्शन घेतले. गर्भधारणा आरामदायी, शांत व्हावी यासाठी ही पद्धत वापरली जाते. बाळाला जन्म देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. हे तंत्र ब्रिटनमध्ये बऱ्याच वर्षांपासून वापरले जाते, अलीकडे ते भारतातही वापरणे सुरू झाले आहे. यामध्ये गर्भवती महिलेने योग आणि ध्यानावर लक्ष देणे अपेक्षित असते. तसेच आहाराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टीचे नियोजन केले जाते. हिप्नोथेरपीचाही यामध्ये काही प्रमाणात वापर केला जातो.