खरं तर मला पहिला राष्ट्रीय पुरस्कार सहा सात वर्षांपूर्वी ‘ना बंगारु टल्ली’ या तेलगू फिल्मसाठी मिळाला होता. मला एक नेहेमी खंत होती की महाराष्ट्रातील लोकांना हे माहितीच नव्हतं की मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी नवीन होते तेव्हा .पण जेव्हा बार्डो या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा खूप आनंद झाला. एकतर खूप मेहनत केली होती या फिल्मसाठी. हा पुरस्कार म्हणजे आम्हा सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. खूप मोठी आणि आनंदाची बाब आहे ही. वैयक्तिक विजयापेक्षा जो लोकांचा मिळून असलेला कलेक्टिव्ह विजय असतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो जो या ब मिळालेल्या पुरस्कारातून मी अनुभवते आहे.
या फिल्ममधे मी आशालता या मुलीची मुख्य भूमिका करते आहे.जी शिक्षिका असते. जिची स्वप्नं आहे. ती एका गावात येते. त्या गावातल्या लोकांची काही स्वप्नं असतात. तर अशा वेगवेगळ्या स्वप्नांचा प्रवास आहे या फिल्ममधे . बार्डोची जी टीम होती त्यांचंही एक स्वप्नं होतं. फिल्म पूर्ण झाल्यावर फिल्मचा दिग्दर्शक भीम ( भीमराव मूडे)म्हणाला की, आपण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठवू. या पुरस्काराचं स्वप्नं तिथून सुरु झालं जे आता पूर्ण झालं आहे. प्रामाणिकपणे काम करत गेलं तर आपलं स्वप्न पूर्ण होतं असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.
Image: Google
मी काम करते तेव्हा माझे निकष खूप सोपे असतात. मला माझ्या कलेशी प्रामाणिक राहून काम करायचं आहे. मी ज्या पार्श्वभूमीतून येते, माझ्यावर कलेचे, ललित कलेचे जे संस्कार झालेले आहेत त्याचा प्रभाव माझ्या कामाच्या निवडीवर असतोच. कलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनाला माझ्या कलेच्या शिक्षणाने खूप आकार दिला आहे. त्यामुळे चित्रपट निवडताना, काम करताना आपण लोकप्रिय होऊ का ? ही इच्छा किंवा धास्ती नसतेच मनात कलेशी पूर्णत: प्रामाणिक राहून काम करायचं एवढं एकमेव उद्दिष्ट घेवून मी पहिला चित्रपट केला तेच उद्दिष्ट आजही कायम आहे. लोकप्रियतेचा अट्टाहास न धरता जेव्हा असं कलेशी बांधिलकी ठेवून काम केलं जातं, त्यातून जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा जबाबदारी खूप वाढते. मग ती श्रीलंकन फिल्म असू देत, किंवा तेलगू फिल्म असू देत, मराठी असू देत. असा वेगवेगळ्या वाटेनं माझा प्रवास होत होता. हटक्यासाठी म्हणून नाही तर मला माझं काम छान करता आलं पाहिजे. माझ्या कलेसोबत, जीवनासोबत तडजोड न करता प्रामाणिकपणे त्याच्याशी बांधिल राहून काम करायचं एवढंच उद्दिष्ट होतं. माझं जगणं आणि माझी कला ही आज वेगळी नाहीये.
चित्रपट निवडीच्या बाबतीत आणखी एक निकष म्हणजे माझं जिथे मन रुळतं, रमतं तिथे मी असते. मग तो मन फकिरा चित्रपट असू देत किंवा काला असू देत तिथे मी असते. तरुण वयात चित्रपटांकडे पाहाण्याची एवढी प्रगल्भ समज कशी आली असंही मला विचारलं जातं. तेव्हा माझं उत्तर असतं की आजूबाजूच्या जगाकडे, स्वत:च्या जगण्याकडे डोळसपणे बघण्यातून, आजूबाजूच्या राजकीय, भावनिक घडामोडींचा अभ्यास करुनच ही समज आली आहे. मी जर माझं स्वत:चं मत, माझी स्वत:ची गोष्ट जर या धबडग्यात हरवली तर मग कोण हे सांगणार? मी नाही तर मग कोण? असा एक बेसिक प्रश्न मला सतत पडत असतो. मला सतत तू प्रवाहाच्याविरुध्द बोलते, वागते म्हणून टोकलं जातं. पण मी असं काही मुद्दाम ठरवून करत नाही. मला जे योग्य वाटतं तिथे मी बोलते. आणि पुन्हा तेच की मी नाही बोलणार तर मग कोण? कारण मी कलाकार. माझी पहिली बांधिलकी आहे ती कलेशी आहे. मग त्याच्यानंतर माझा प्रांत, धर्म , जात, लिंग येतो.पहिले माझी कला येते. माझ्या डोक्यात हा विचार खूप पक्का आहे.
Image: Google
सध्या आपण अतिशय अस्थिर अशा वातावरणात जगतो आहोत. अशा वेळेस आपल्याला आपल्यातला जो पारा आहे तो स्थिर ठेवणं फार गरजेचं आहे. एक पक्कं मत , एक पक्का विचार जो वैयक्तिक असूनही वैश्विक आहे, जो सत्याला अन करुणेला धरुन आहे तो असणं महत्त्वाचं आहे. माझ्यासारख्या तरुण कलाकारात ही समज येते कारण आम्ही आताच्या अस्थिर अशा जगाचा डोळस अनुभव घेत आहोत. उद्या मी असेन की नाही, जगेन की नाही ते माहीत नाही. त्यामुळे मला आता जी संधी मिळाली आहे त्यात मला माझी गोष्ट सांगायची आहे. त्यासाठी माझी , माझ्यासारख्या इतर तरुण कलाकारांची धडपड सुरु असते.
अंजली म्हणून जे माझं लहानपण गेलंय जे मी शिकलेय, जिथे शिकलेय.. जसं मी नाशिकला वाढले, दिल्लीत शिकले, पुण्यात शिकले त्या सगळ्याशी सुसंगत माझं चित्रपटातलं काम असतं. मी जे काम निवडते ते माझ्या आयुष्याशी सुसंगत आहे, तसं ते ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. चित्रपटातली कॅरेक्टर्स हे मूळ अंजलीपेक्षा नक्कीच वेगळी असतात . हे कॅरेक्टर आणि माझी गल्लत होता कामा नये हा विचारही पक्का आहे. गंमत वाटते याची. न्यूटनमधली अंजली वेगळी, मन फकिरा मधली वेगळी.. प्रत्येक चित्रपटागणिक मी जे काही वेगळी दिसले, जगले ती माझ्यासाठी एक पावती आहे की मी आज कुठेही बाहेर पडू शकते, लोकं माझ्याशी गप्पा मारु शकतात आणि लोकांना लक्षात नसतं की ही अंजली म्हणजे अमूक एका फिल्ममधली आहे. कुठल्याही भूमिकेशी समरस होणं त्यातूनच जमतं.
Image: Google
मी अंजली पाटील. मी अमूक प्रकारच्याच भूमिका करणार असा माझा अट्टाहास कधीच नसतो. मला मूळ अंजली पाटील काय आहे हे ही नीट माहित नाही? कारण आपण सतत विकसित इव्हॉल्व्ह होत असतो.प्रत्येकाच्या बाबतीतही हे असंच असतं.ही अशी अंजली आहे असं मी किंवा माझ्याबाबत कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. दहा वर्षांपूर्वीची अंजली ही आता नाहीच आहे. आता माझ्यात वेगळे विचार आहेत. त्यामुळे माझ्या मूळ कोअरशी फटकून एखादा रोल असतो तो मी करते. त्यासाठी मला माझ्यातली ताकद लावावी लागते. लावावी लागणारच. आज निसर्गात सर्व प्रकारच्या फुला फळांना जागा आहे, वेगळ्या जाती धर्म वंशाच्या माणसांना जागा आहे तशीच माझ्या या कलेच्या विश्वात सर्व प्रकारच्या भूमिकांसाठी जागा आहे, त्यासाठी तेवढं व्यापक आणि तेवढं वैश्विक व्हावं लागेल. माझी साधना ही व्यापक होण्याची आहे.
Image: Google
मी खूप भटकते. मी म्हणजे फकीर आहे. त्यांच्यासारखीच इकडे तिकडे भटकत असते. मी जेव्हा एक प्रोजेक्ट करते तेव्हा पूर्णत: त्या भूमिकेशी एकरुप होते. या भूमिकेतून वेगळी अंजली नाही शोधता येत मला स्वत:लाही. हुतात्मा आम्ही तीन महिने शूट करत होतो. मला त्या रोलमधून बाहेर यायला पुढचे सहा महिने लागले.तो प्रवास असा नऊ महिन्यांचा होता. त्या सहा महिन्याच्या कालावधीत आधीच्या अंजलीला काय आवडायचं हे मला आठवतही नव्हतं. मी माझ्या मित्र मैत्रिणींना विचारायचे मी कशी होते आधी? याच्या आधी काय होते? म्हणजे हुतात्मा आधी मी वेगळी होते, हुतात्मा नंतर मी वेगळी झाले. प्रत्येक प्रोजेक्ट नंतर, प्रत्येक फिल्म नंतर मी बदलत असते. नेमके काय मी बदलले ते एक एक टिपून वेगळं सांगता येणार नाही. पण या सर्व प्रवासात अंजली व्यापक होत गेली हे मात्र नक्की.
Image: Google
चित्रपटातली भूमिका हा खूप छोटा भाग झाला. पण आयुष्य हे खूप मोठं आहे. माझ्या आयुष्यात मी जी काही इव्हॉल्व्ह झाले त्यामुळे चित्रपटातल्या कॅरेक्टरला इव्हॉल्व्ह होण्यास मदत मिळाली. सुरुवातीचा काळ असा होता की मी वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्यासाठी धडपडत होते त्याच्यात आयुष्य जगणं होत नव्हतं. मग मला जाणवलं की मला आयुष्य आधी जगायचंय मग कॅरेक्टर्स करायची आहेत. माझी मूळ कमिटमेण्ट आयुष्यासोबत आहे. त्यामुळे आयुष्य जर व्यापकपणे जगता आलं तर कॅरेक्टर्सही आपोआप इव्हॉल्व्ह होणार.