पुजा भट म्हणजे बॉलीवूडचं एक बडं प्रस्थ. अभिनेत्री म्हणून पुजाला नक्कीच एक स्वतंत्र ओळख होती, पण तिच्या काळात ती एक लिडींग ॲक्ट्रेस म्हणून पुढे येऊ शकली नाही. प्रेमाच्या बाबतीत पण पुजाच्या पदरी कायम नैराश्यच आलं. यामुळे तणावग्रस्त झालेली पुजा व्यसनांच्या आहारी गेली होती. पण महत् प्रयासाने पुजा या व्यसनांतून बाहेर पडली असून दारूमुळे आयुष्य कसं पोखरून टाकलं हाेतं आणि तिने यातून कसा मार्ग काढला, हे पुजाने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट टाकून शेअर केलं आहे.
आजकाल दारूचं व्यसन करण्यात स्त्री- पुरुष असा भेद राहिलेला नाही. उच्चभ्रू किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातल्या स्त्रियादेखील आता पार्ट्यांमधून किंवा थ्रील म्हणून किंवा अगदीच पिअर्स प्रेशर म्हणून दारूची चव चाखतात आणि मग ही हळूच झालेली सुरुवात व्यसनापर्यंत आपल्याला कधी घेऊन जाते, हेच समजत नाही. असंच काहीसं पुजा भटचं झालं. सुरुवातीला मनावरचा तणाव घालविण्यासाठी तिनं दारूला जवळ केलं खरं, पण नंतर मात्र व्यसनाच्या या खोल गर्तेत ती अडकत गेली.
पण वेळीच सावध झालेली पुजा आता मात्र दारूच्या व्यसनातून पुर्णपणे बाहेर आली असून मागील ५ वर्षात तिने दारूला स्पर्शही केलेला नाही. ही तिच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची घटना पुजाने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून शेअर केली आहे. यामधे पुजा म्हणते माझ्या आयुष्यात प्रेमाचा शोध घेत मी खूप फिरले, पण प्रत्येक वेळी नैराश्य आले. याच नैराश्यातून मी दारूच्या आहारी गेले. एकदा मला जाणीव झाली की माझं व्यसन दिवसेंदिवस वाढत असून आता दारू पिणं ही केवळ माझी सवय राहिलेली नाही, तर त्याचं आता मला व्यसन लागत आहे.
पुजा म्हणते आपल्याला व्यसन जडत आहे, ही जाणीव होताच मी सावध झाले आणि प्रयत्नपुर्वक दारूला स्वत:पासून दुर केलं. येत्या डिसेंबर महिन्यात दारू सोडून पुजाला ५ वर्षे पुर्ण होत आहेत. याच काळात मला माझ्या आयुष्यातलं माझं प्रेम भेटलं. हे प्रेम म्हणजे दुसरं- तिसरं कुणी नसून संयम आहे. या संयमाने मला खूप काही शिकवलं. आयुष्यात अनेक वादळं आले, चढ- उतार आले, या सगळ्यामध्ये मला खंबीर ठेवण्याचं काम संयमामुळेच झालं.
संयमामुळेच मी या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर येऊ शकले. माझं मानसिक स्वास्थ्य माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असून या संयमाने मला तेच तर मिळवून दिलं आहे. मी आणि माझा संयम असल्यावर मला आयुष्यात तिसऱ्या कशाचीही गरज नाही, असंही पुजा म्हणते. ''no matter what people say,my choice is clear- it is SINGLE BLESSEDNESS all the way! '' असं देखील पुजाने तिच्या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.