मागच्यावर्षी खणाच्या साड्या तुफान चालल्या. कोणत्या ना कोणत्या सणाला महिलांनी खणाची साडी आवर्जून घेतली. त्यानंतर काही महिन्यांनी खणाची साडी आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी हा ट्रेण्ड आला. अगदी नाकातल्या मोरनीपासून ते बुगड्यांपर्यंत सारे काही ऑक्सिडाईज प्रकारातले घेऊन झाले होते. आता सणावाराला सुरूवात झाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅडिशनल फॅशन प्रकारात मोडणारे नवनविन ट्रेण्ड इन झाले आहेत. या सगळ्यामध्ये आता खणाचे मंगळसूत्र जबरदस्त चालते आहे.
मराठी अभिनेत्री समिधा गुरू हिने देखील खणाचे मंगळसूत्र घालून एक फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून फोटाेंना खूपच लाईक्स मिळत आहेत. यामध्ये समिधाने निळ्या रंगाची खणाची साडी घातली असून त्यावर चंद्रकोरीचे पदक असणारे खणाचे मंगळसूत्र घातले आहे. तिचे कानातलेही तसेच चंद्रकोरीच्या आकाराचे असून खणाचेच आहेत. विशेष म्हणजे तिने खणाची नऊवार नेसली आहे. समिधाचा हा अस्सल मराठमोळा हा लूक खूपच व्हायरल झाला असून अनेकजणी रात्रीपौर्णिमेसाठी या लूकचा विचार करत आहेत.
अस्सल महाराष्ट्रीयन वेशभुषा करण्यासाठी तरूणी सध्या खणाच्या साडीचा पर्याय निवडत आहेत. खणाची साडी नुसतीच नेसली तर ती खूलत नाही. तिचे खरे सौंदर्य तेव्हाच खुलते, जेव्हा तुम्ही खणाच्या साडीवर तिला शोभतील असे आकर्षक दागिणे घालता. त्यामुळे खणाची साडी घालण्यापुर्वी खणाच्या साडीवर कोणते दागिणे घालायचे आणि कोणते टाळायचे, हे पक्के माहिती करून घ्या. ऑक्सिडाईज ज्वेलरी घालणार असाल तर बेस्टच आहे. पण आता नव्याने आलेले खणाचे मंगळसूत्र आणि कानातले देखील ट्राय करून पाहायला हरकत नाही.
खणाच्या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या साड्या नेसल्यावर तुम्ही जरा बोल्ड आणि डार्क मेकअप केला तरी तो सहज साडीच्या सौंदर्यात ॲडजस्ट होऊन जातो. खणाची साडी घालताना शक्यतो साडी मध्ये जे ब्लाऊज पीस दिलेले असते, त्याचे ब्लाऊज शिवू नका. काठाच्या रंगांचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातल्यास साडीचा रंग अधिक खुलतो.