Prateik Babbar : काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रतीक बब्बर आणि त्याचे वडील राज बब्बर यांच्यातील कौटुंबिक वाद चांगलाच चर्चेत होता. अलिकडेच प्रतीक बब्बर यानं प्रिया बॅनर्जी सोबत लग्न केलं. या लग्नात राज बब्बर आणि त्यांच्या परिवाराला बोलवण्यात आलं नव्हतं. आता प्रतीक बब्बर यानं त्याच्या नावातून बब्बर हे सरनेम काढून प्रतीक स्मिता पाटील (Prateik Smita Patil) असं करून घेतलं आहे. ज्याची चर्चा सध्या रंगली आहे.
प्रतीक बब्बर यानं १४ फेब्रुवारीला गर्लफ्रेन्ड प्रियासोबत लग्न केलं. या लग्नाची चांगली चर्चा झाली. याची दोन कारणं होती एकतर हे त्याचं दुसरं लग्न होतं आणि दुसरं कारण म्हणजे त्यानं राज बब्बर व त्यांच्या परिवाराला लग्नात बोलवलं नव्हतं. आता तर त्यानं चक्क आपलं नाव प्रतीक स्मिता बब्बर असं करून घेतलं. म्हणजे वडील-मुलाचा वाद चांगला टोकाला गेला आहे असं दिसतं. अलिकडे प्रतीक आणि प्रियानं टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यावेळी याबाबत ते बोलले.
प्रतीक आणि प्रिया यांनी राज बब्बर यांना लग्नात का बोलवलं नाही याबाबत स्पष्टचं सांगितलं की, त्यांना अफवांनी काहीच फरक पडत नाही. कारण त्यांच्यात आणि राज बब्बर यांच्यात काहीच नातं नाही. प्रतीक म्हणाला की, माझे वडील माझ्या जीवनात कधीच नव्हते. जेव्हा मला ३० वर्षात कुणी काही विचारलं नाही तर आता का विचारलं जात आहे.
यावेळी प्रतीक असंही म्हणाला की, त्यानं त्याचे वडील राज बब्बर यांच्यासोबतची सगळी नाती तोडली आहेत. आता त्याला केवळ त्याची आई स्मिता पाटील यांच्या नावानं ओळखलं जाण्याची इच्छा आहे.
आईचं नाव लावणारे बॉलिवूड सेलिब्रिटी
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, लेखक संजय लीला भन्साळी हे नाव सर्वांच्याच परिचीत आहे. ते सुद्धा सुरूवातीपासून आपली आई लीला भन्साळी यांचं नाव आपल्या नावासमोर लावतात. ते बालपणापासून आईचं नाव लावतात आणि त्यांच्या यशाचं सगळं श्रेय आईला देतात.
बॉलिवूडमध्ये असेही काही सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या आईचं सरनेम आपल्या नावासमोर लावतात.
कोंकणा सेन-शर्मा
कोंकणा सेन शर्मा बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कोंकणा तिच्या नावासमोर आई आणि वडील दोघांचेही सरनेम लावते. तिच्या वडलांचं नाव मुकुल शर्मा आहे तर आईचं नाव अपर्णा सेन आहे.
इमरान खान
बॉलिवूड अभिनेता इमरान खान यानंही आपल्या आईचं सरनेम आपल्या नावासमोर लावलं आहे. इमरानच्या आईचं नाव नुजरत खान आणि वडलांचं नाव अनिल पटेल आहे. पटेल ऐवजी तो आईचं खान सरनेम वापरतो.
अदिती राव हैदरी
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आपल्या कमाल अदाकारीसाठी ओळखली जाते. अदिती आपल्या नावासमोर वडलांच्या सरनेमसोबतच आईचं देखील सरनेम लावते. अदितीच्या वडलांचं नाव एहसान हैदरी आहे तर आईचं नाव विद्या राव आहे.
मल्लिका शेरावत
बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावतची लोकप्रियता चांगलीच आहे. मल्लिका तिच्या नावासमोर आईचं सरनेम शेरावत वापरते. तिच्या वडलांचं नाव मुकेश कुमार लांबा असं आहे.