आपण जेव्हा अभिनेते, अभिनेत्री किंवा एखादा उद्योगपती, खेळाडू अशा मोठ्या व्यक्तींकडे बघतो, तेव्हा त्यांच्या आयुष्यात सगळं किती सुरळीत चालू असेल असं आपल्याला वाटतं. सामान्य माणसांप्रमाणे या व्यक्तींच्या जीवनात रोजच्या कटकटी, अडचणी नसतील, त्यामुळे हे सगळे किती समाधानी असतील, असंही काही जणांना वाटतं. पण जेवढी मोठी माणसं, तेवढ्या त्यांच्या अडचणी मोठ्या, असं म्हणतात ते काही खोटं नाही. यश, किर्ती, नाव, प्रसिद्धी असं असूनही नैराश्य येतं. अशी कित्येक स्टार मंडळी आपण पाहिली आहेत. प्रियांका चोप्रा, दिपिका पदूकाेन अशा अनेक जणींना प्रचंड मानसिक नैराश्य आलं होतं. यापैकीच एक नाव आहे ज्येष्ठ- श्रेष्ठ अभिनेत्री आशा पारेख.
आशा पारेख म्हणजे बॉलीवूडचं एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. अभिनेत्री ही केवळ पडद्यावर छान दिसण्यासाठी नसते. तर तिचीही चित्रपटात काही भूमिका असते, ती देखील कसदार अभिनयाची मानकरी ठरू शकते, असं वळण बॉलीवूडला आणि प्रेक्षकांना ज्या अभिनेत्रींनी लावलं, त्यापैकी एक नाव म्हणजे आशा पारेख. आशा पारेख यांनी नुकतंच ७९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. इंडियन एक्सप्रेसने त्यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सांगताना आशा पारेख यांनी त्यांना कधी काळी आलेल्या नैराश्याबाबत भाष्य केलं आहे.
मानसिक त्रास हा प्रत्येकालाच जाणवतो. पण तरीही याबाबत अजूनही म्हणावं तेवढं मोकळेपणाने बोललं जात नाही. एकवेळ शारीरिक त्रासाबाबत मोकळं बोललं जातं, पण मानसिक त्रास मात्र लपवला जातो. आशाजी याला अपवाद ठरल्या आणि त्यांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल, नैराश्याबद्दल मनमोकळं भाष्य केलं. त्या म्हणाल्या की कधीकाही मी एवढी जास्त निराश होते की त्यामुळे अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचे विचारही डोकावून गेले. त्यांच्या पालकांचे मृत्यू त्यांना खूप जास्त हादरा देऊन गेले. त्यांच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी अतिशय त्रासदायक ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की हा काळ माझ्यासाठी खूपच खडतर आणि अतिशय वाईट होता. मी माझ्या पालकांना गमावलं होतं. त्यामुळे मी पुर्णपणे एकटी पडले हाेते. ते गेल्यानंतर प्रत्येक लहान- सहान गोष्ट मलाच सांभाळावी लागली. सगळं काही मला एकटीला करावं लागलं. यासगळ्या परिस्थितीमुळे त्या काळात मी खूपच निराश, हताश झाले होते. मानसिक दृष्ट्या खचले होते. यामुळेच त्या काळात अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचे विचार डोकावून गेले. तो एक संघर्ष होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.
आईबद्दल सांगताना आशा पारेख म्हणाल्या की, मी आज जी कुणी आहे, त्यामागे माझ्या आईची भूमिका खूप मोठी आहे. मी एक आत्मनिर्भर, धाडसी मुलगी म्हणून घडावं, असं माझ्या आईने पक्क ठरवलेलं होतं आणि त्याच अनुशंगाने तिने मला घडवलं. ती माझा कणा होती. तिचं हो म्हणजे होच असायचं आणि एकदा तिने नाही सांगितल्यावर ते नाहीच असायचं. आयुष्यात असं पक्क राहणं मी तिच्याकडूनच शिकले. मी स्वत:च माझ्या कथा निवडायचे आणि माझे नियम मी स्वत:च बनवायचे. त्यामुळेच आज मी एक आत्मनिर्भर आयुष्य उत्तमपणे जगते आहे. जसं प्रत्येक मुलीची आई करते, तसंच माझ्या आईने माझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न केले. पण स्वत:ला लग्न बंधनात अडकून घ्यायला मी ठाम नकार दिला, असंही आशाजींनी सांगितलं.