साडी किंवा पंजाबी ड्रेस हा जसा पारंपरीक पोषाख म्हणून कॅरी केला जातो. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात घागरा, लेहंगा यांचे वेगवेगळे प्रकारही कोणाच्या लग्नात किंवा सण-समारंभांना आवर्जून घातले जातात. हेवी-डिझायनर ब्लाऊज, त्यावर घोळदार घागरा आणि त्याला सूट होणारी अशी एखादी मस्त ओढणी अशा ३ गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. या ड्रेसची ओढणी कॅरी करणे हे एक मोठे जिकरीचे काम असते. कारण आधीच घोळदार घागरा, त्यात दागिने, हेअरस्टाईल असे सगळे असल्याने त्यात ओढणी हातावर किंवा अंगावर असेल तर आपल्याला ती कॅरी करण्याचे एक मोठे काम होऊन जाते (3 Easy Ways to Drape Your Dupatta) .
त्यातही आपल्या घरातले कार्य असेल आणि आपल्याला थोडेफार काम करावे लागणार असेल तर ही ओढणी व्यवस्थित एकाजागी असलेली केव्हाही चांगली. ती मधेमधे आली तर आपल्याला वावरायला सुचत नाही. म्हणूनच ती पीनअप करुन जुनाट फॅशन करण्यापेक्षा थोडी हटके पद्धतीने कॅरी केली तर ड्रेसचा आणि आपला ग्रेस वाढण्यास मदत होते. पण हटके पद्धतीने ओढणी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला माहित असेलच असं नाही. म्हणूनच आज आपण हेवी घागरा किंवा लेहंग्यावर ओढणी कॅरी करण्याच्या ३ सोप्या पद्धती पाहणार आहोत. यामुळे आपले कपडे आणि आपण समारंभात उठून दिसायला नक्कीच मदत होईल.
१. ओढणीची दोन्ही टोके एकमेकांना जोडायची आणि त्याठिकाणी एक सेफ्टीपीन लावून टाकायची. सेफ्टीपीन लावलेला भाग एका खांद्यावर घ्यायचा आणि ओढणीचा बाकी भाग दुसऱ्या हातातून घालून खाली सोडून द्यायचा. यामुळे दुपट्टा खूप सांभाळावाही लागत नाही आणि घागराही छान दिसतो.
२. दुसऱ्या पद्धतीतही दोन्ही टोकांना लावलेली पीन तशीच ठेवायची. पीन लावल्याने ओढणीला तयार झालेला गोल मानेतून घालायचा. यामुळे पीन लावलेला भाग आपल्या गळ्यावर येईल आणि ओढणी दोन्ही हातांना आणि बाजुने कव्हर करेल.नेटची किंवा हलकी छान ओढणी असेल तर ही पद्धत अतिशय छान दिसते.
३. पीन लावलेला भाग मानेवर घ्यायचा आणि गोलातून दोन्ही हात बाहेर काढायचे. त्यामुळे ओढणीचे एकप्रकारचे जॅकेट तयार होईल. यामुळे ब्लाऊजवर ओढणी हवी असेल तरीही येईल आणि ती खूप कॅरीही करावी लागणार नाही.