स्तन हा स्त्रियांच्या शरीराला सुडौल करणारा महत्त्वाचा अवयव आहे. काहींना आपले स्तन खूप लहान आहेत म्हणून समस्या वाटते तर काही महिलांना स्तन खूप मोठे असतील तर लाज वाटत राहते. कधी अनुवंशिकरित्याच स्तनांची ठेवण मोठी असते तर कधी लठ्ठपणा, गर्भधारणा यांमुळे स्तनांचा आकार वाढतो. स्तनांचा आकार जास्त वाढलेला असेल तर ते ओघळल्यासारखे दिसायला लागतात. मग कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी स्तनांचा आकार मोठा दिसत असल्याने आपल्याला ओशाळल्यासारखे होते. स्तनांचा आकार आणि ठेवण योग्य त्या मापात असावी असं प्रत्येकीलाच वाटतं (5 Bra Types for sagging Heavy busts).
पण काही वेळा ते आपल्या हातात नसल्याने शारीरिक ठेवणीमध्ये आपण फारसे बदल करु शकत नाही. मात्र आपण ब्रेसियरचा प्रकार बदलून हे स्तन थोडे वर उचलल्यासारखे करु शकतो. यासाठी आपण नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या ब्रेसियरची निवड करायला हवी. यामुळे नकळत आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण तरुण दिसण्यास मदत होते. ब्रेसियरमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार असून आपल्याला ते माहित असतातच असं नाही. त्यासाठीच इमेज कोच म्हणून काम करणाऱ्या आरती अरोरा आपल्याला या प्रकारांची ओळख करुन देतात, ब्रेसियरचे हे प्रकार कोणते आणि त्याचा ब्रेस्ट लिफ्ट करण्यासाठी कसा फायदा होतो पाहूया…
१. पुश अप ब्रा
या ब्रा नेहमीच्या कापडाच्या नसून थोड्या कडक अशा पॅडींगप्रमाणे असल्याने त्यामुळे ओघळणारे ब्रेस्ट लिफ्ट होण्यास मदत होते. त्यामुळे फॅशनेबल कपडेही अतिशय चांगले दिसू शकतात.
२. फुल कव्हरेज ब्रा
या ब्रेसियरही काहीशा पॅडेड ब्रेसियरप्रमाणेच असतात. पण यामध्ये ब्रेस्ट पूर्ण झाकले जात असल्याने ते ओघळल्यासारखे दिसत नाहीत. त्यामुळे एखाद्या समारंभाला जाताना तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे कपडे घालणार असाल तर या ब्राचा तुम्ही नक्की विचार करु शकता.
३. अंडरवायर ब्रा
या ब्रेसियरना खालच्या बाजुने प्रत्यक्ष वायर दिलेली असते. वापरण्यासाठी त्या काहीशा अनकम्फर्टेबल असू शकतात. पण त्यामुळे स्तनांचा शेप एकदम परफेक्ट दिसत असल्याने तुमचे स्तन ओघळल्यासारखे दिसत असतील तर या ब्रेसियर तुम्ही नक्की ट्राय करा.
४. हॉल्टर किंवा बिकीनी ब्रा
स्तनांचा आकार लहान असेल आणि तरीही ते ओघळलेले दिसत असतील तर या फॅशनेबल प्रकारच्या ब्रेसियर तुम्ही नक्की वापरु शकता. वेस्टर्न कपड्यांवर या ब्रेसियर परफेक्ट सूट होण्यासारख्या असतात. याला एकप्रकारचा होल्ड दिलेला असल्याने स्तन व्यवस्थित दिसतात.
५. स्पोर्टस ब्रा
खेळाडू साधारणपणे या ब्रेसियर वापरतात. ज्यामुळे स्तनांचा आकार खूप मोठा दिसत नाही आणि ते एका जागी नीट बांधल्यासारखे राहण्यास मदत होते.