साडी हा आपला पारंपरिक पोषाख. कोणताही सणवार, लग्नकार्य किंवा छानसा कार्यक्रम असेल तर आपण आवर्जून साडी नेसतो. हल्ली तर साडीला एकप्रकारचे वलय आल्याने कॉर्पोरेट क्षेत्रातही आवर्जून साडी नेसली जाते. भारतात साडीचे असंख्य प्रकार उपलब्ध असून ती साडी कॅरी करण्याची पण एक खास पद्धत असते. आपला बांधा थोडा आडवा असेल किंवा उंची कमी असेल तर साडी नेसल्यावर आपण काकूबाई दिसतो असे अनेकींना वाटते. तसे काही प्रमाणात होतेही. पण असे होऊ नये आणि साडी नेसल्यावर आपण उंच आणि बारीक दिसावे यासाठी साडी नेसताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यांनी यासाठी काही महत्त्वाच्या आणि नेमक्या फॅशन टिप्स दिल्या असून त्या कोणत्या पाहूया (5 Fashion tips to look tall and slim in saree)...
१. केस पूर्ण मोकळे सोडणार असाल तर ते पूर्णपणे मानेच्या मागच्या बाजूला सोडायला हवेत. नाहीतर सगळे केस एका बाजूने पुढे घ्यायचे, त्यामुळे मानेचा कट दिसून येईल आणि तुम्ही नकळत आहात त्यापेक्षा उंच दिसाल.
२. आपण एकतर पदर पिन अप करतो किंवा हातावर सोडतो. असे काहीही केले तरी पदर वरच्या बाजूने मानेला चिकटून येणार नाही याची काळजी घ्या. पदर शक्यतो मानेपासून लांब राहील असे पाहा. म्हणजे नेकलाईन दिसेल आणि त्यामुळे तुम्ही बारीक दिसण्याची शक्यता वाढेल.
३. साडीच्या निऱ्या घालताना त्या जास्तीत जास्त बारीक असतील असे पाहा. लहान निऱ्या घेतल्यामुळे आपण नकळत बारीक आणि उंच दिसू शकतो.
४. साडीचा रंग आणि चपला किंवा शूज यांचा रंग खूप कॉन्ट्रास्ट नसेल याची काळजी घ्या.
५. एकावेळी खूप जास्त आणि मोठेमोठे दागिने घालणे टाळा. गळ्यात, कानात, हातात असं सगळंच एकावेळी हेवी घातलं तर त्यामुळे आपण बुटके आणि जाड दिसू शकतो. उदाहरणार्थ साडी हेवी असेल तर गळ्यात काही न घालता केवळ मोठे कानातले घातले तरी पुरेसे असते.