साडी ही महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट असते. सणवास असो, एखादं कार्य असो किंवा कोणताही खास क्षण असो. साडी नेसल्यावर बाईचं सौंदर्य ज्याप्रमाणे खुलतं तसं ते दुसऱ्या कोणत्याही पेहरावात क्वचितच खुलत असेल. साड्यांचे असंख्य प्रकार बाजारात आले असले तरी सिल्कच्या साडीला कोणताच पर्याय असू शकत नाही. भारतात विविध प्रांतात तयार होणारे सिल्कच्या साडीचे वेगवेगळे प्रकार मिळतात. यात अगदी हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंतच्या सिल्कच्या साड्या असतात. प्रत्येक महिलेकडे तिचे असे साड्यांचे खास कलेक्शन असते. यामध्ये लग्नाच्या साडीपासून ते कोणी गिफ्ट म्हणून दिलेल्या, प्रदर्शनातून आणलेल्या, काही निमित्ताने मिळालेल्या किंवा घेतलेल्या अशा एक ना अनेक साड्या असतात (7 Tips to increase life of silk Saree) .
साड्या नेसणं हे जितकं आवडीचं काम असतं तितकीच त्यांची चांगली काळजीही घ्यावी लागते. साड्या नीट ठेवणे, वेळच्या वेळी त्या धुणे, इस्त्री करणे, वापरात नसल्याने त्या खराब होऊ नयेत म्हणून त्यांच्या घड्या बदलत राहणे अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये असतात. नीट काळजी घेतली नाही तर या महागामोलाच्या साड्या खराब होतात आणि मग त्या कितीही आवडत असतील तरी वापरता येत नाहीत. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी सिल्कच्या साड्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी काही महत्त्वाची माहिती देतात. यासाठी त्या काही टिप्स शेअर करतात, त्या टिप्स कोणत्या पाहूया...
१. परफ्यूमची बाटली साडीपासून किमान १ फूट दूर ठेवावी, जेणेकरुन साडी लवकर खराब होत नाही.
२. आपण साडीसाठी प्लास्टीकचे बॉक्स वापरतो, पण सिल्कची साडी त्यामध्ये ठेवू नये.
३. सिल्कची साडी शक्यतो आधी एखाद्या मलमल किंवा सुती कपड्यात बांधावी आणि मग ती प्लास्टीकच्या ऑर्गनायजरमध्ये ठेवावी.
४. साडीला ठेवणीतला वास लागू नये म्हणून आपण त्यात परफ्यूम बॅग किंवा डांबरगोळी ठेवतो पण तसे करु नये.
५. साडीला पुरेशी हवा लागेल अशाठिकाणी साड्या ठेवायला हव्यात, जेणेकरुन त्या चांगल्या राहतात.
६. दर ३ ते ४ महिन्यांनी सिल्कच्या साडीच्या घड्या बदलायला हव्यात.
७. दर ४ ते ६ महिन्यांनी साड्या बॅगेतून किंवा बॉक्समधून बाहेर काढून फॅनखाली किंवा हवा लागेल अशा ठिकाणी ठेवाव्यात.