सध्या सगळीकडेच लग्नसराईची खरेदी सुरु आहे. लग्नसराई म्हटलं की महागडे कपडे व त्या कपडयांना शोभून दिसतील असे दागिने तर पाहिजेच. लग्नात अंगावर भरपूर दागिने घालून मिरवणे हे काहीजणींना आवडते. पण प्रत्येक वेळीच सोन्याचे दागिने घालणे शक्य होत नाही. अश्यावेळी इमिटेशन ज्वेलरी हा एक उत्तम पर्याय असतो. आजकाल बाजारात इमिटेशन ज्वेलरीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स सहज उपलब्ध होतात. नेकलेस, झुमके, बांगडया, अंगठ्या, बाजूबंद यांच्या असंख्य डिझाईन्स तुम्हांला पाहायला मिळतात. कधी - कधी या इमिटेशन ज्वेलरी इतक्या सुंदर व नाजूक असतात की खऱ्या सोन्याच्या दागिन्यांना सुद्धा मागे टाकू शकतात. इमिटेशन ज्वेलरी कॅरी करायला हलक्या व रेडी टू वेअर असतात. इमिटेशन ज्वेलरीची खरेदी करताना काय घेऊ आणि काय नको असं होत. तरीपण आपण हौसेने या ज्वेलरी खरेदी करतोच. पण एक - दोन वापरात आपल्याला लक्षात येते की, त्यांची चकाकी कमी होत आहे किंवा ते काळे पडत आहेत. यावर उपाय काय करावा हे कित्येकजणींना माहित नसते. आपण इमिटेशन ज्वेलरीची काळजी कशी घेऊ शकतो हे समजून घेऊयात. इमिटेशन ज्वेलरीची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास त्यांची चकाकी कायम राहून त्या वर्षांनुवर्षे चांगल्या टिकतात. (7 Ways you can keep your artificial jewellery all new and lustrous.)
काय काय करता येईल ?
१. स्वच्छ करण्यासाठी सुती कापड किंवा कापसाचा वापर - आपल्याला कधी घाम येतो किंवा पाण्यात काम करताना या ज्वेलरीला पाणी लागू शकत. यामुळे त्यांच्यावरील चकाकी कमी होऊ शकते. इमिटेशन ज्वेलरी वापरून झाल्यानंतर स्वच्छ सुती कापडाने किंवा कापसाने पुसून मगच डब्यात ठेवावी.
२. झिप लॉक बॅग व हवाबंद डब्यांचा वापर - इमिटेशन ज्वेलरी अतिशय नाजूक असल्याने तितक्याच काळजीपूर्वक पद्धतीने हाताळली पाहिजे. या ज्वेलरीचा हवेशी संपर्क झाल्यास त्या लवकर काळ्या पडू शकतात. बाजारात मिळणाऱ्या झिप लॉक बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून हवेशी संपर्क येणार नाही अश्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास त्या खूप वर्ष टिकतात.
३. पाणी लागू देऊ नका - इमिटेशन ज्वेलरींना पाणी लागू देऊ नका. त्यांना पाणी लागल्यास त्याचा रंग किंवा पॉलिश निघून जाण्याची शक्यता असते.
४. पॉलिश करून घेणे - आपण जस सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून घेतो. तसेच इमिटेशन ज्वेलरींनासुद्धा किमान सहा महिन्यातून एकदा तरी पॉलिश करावे.
५. परफ्युम आणि हेअर स्प्रे पासून लांब ठेवा - स्किनकेअर प्रॉडक्टस, हेअर स्प्रे, सिरम, परफ्युम यांसारख्या सौंदर्य प्रसाधनांपासून इमिटेशन ज्वेलरी लांब ठेवा. या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून झाल्यानंतरच इमिटेशन ज्वेलरी परिधान करा. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तुमच्या ज्वेलरीचे मेटल काळे पडू शकते किंवा त्यावरचा रंग निघून जाऊ शकतो.
६. बेबी ब्रशचा वापर - तुमच्या इमिटेशन ज्वेलरी वरील नाजूक खडे, मणी, हुक, नेकलेस कॉर्नर स्वच्छ करण्यासाठी बेबी ब्रशचा वापर करावा. लहान बाळांचे केस विंचरण्यासाठी सॉफ्ट केसांचा जो ब्रश वापरतो किंवा पेंटिंग ब्रशचा वापर करून ज्वेलरी स्वच्छ करू शकतो.
७. उष्णतेपासून लांब ठेवा - शक्यतो, स्वयंपाक करताना इमिटेशन ज्वेलरी घालू नये. जर तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करणार असाल तर इमिटेशन ज्वेलरी काढून ठेवावी. उष्णतेमुळे तुमच्या ज्वेलरीवरील खडे, मणी निखळून पडू शकतात व त्या दागिन्यांची रचना बिघडू शकते.