अयोध्येच्या राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना हा देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय होता. बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर राम याठिकाणी विराजमान होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे होते. या खास दिवशी देशातील राजकारण, समाजकारण, बॉलिवूड, उद्योग क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी यावेळी उपस्थित होती. अभिनेत्री कैतरीना कैफ, विकी कौशल, रोहीत शेट्टी, रणबीर कपूर, माधुरी दिक्षित, अमिताभ बच्चन आणि आलिया भट यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आलिया भट कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते (Alia Bhat Special Saree for Ram Mandir Ayodhya) .
राम मंदिर सोहळ्यासाठी तिने नेसलेली मोरपंखी रंगाची साडी आणि केलेली हेअरस्टाईल यांची विशेष चर्चा झाली. ही सिल्कची साडी दिसायला अगदी साधी दिसत असली तरी ती या सोहळ्याच्या दृष्टीने अतिशय विशेष होती. रणबीर, आलिया आणि विक-कैतरीना या सोहळ्यादरम्यान एकत्र असल्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याठिकाणी गर्दी असल्याने रणबीर आलियाला सुरक्षितपणे नेत असताना दिसले. पारंपरिक सोहळा असल्याने आलियाने अतिशय सुंदर अशी मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. या साडीचे काठ गोल्डन रंगाच्या जरी वर्कचे होते. तर या साडीच्या पदरावर अतिशय सुंदर अशी रामायणाची कथा साकारली होती.
यावर भगवान राम, हनुमान आणि रामसेतूची एम्ब्रॉडरी केलेली होती. रंगबिरंगी दोऱ्याने या पदरावर अतिशय नाजूक अशी रामायणातील चरीत्र रेखाटण्यात आले होते. सोशल मीडियावर या साडीचे झूम केलेले फोटो काहींनी पोस्ट केले मात्र त्यावरील नक्षी म्हणावी तशी स्पष्ट दिसू शकली नाही. आलियाने यावेळी फारसा मेकअपही केलेली नव्हता. इतकेच नाही तर तिने फक्त झुब्याचे कानातले आणि एक लहानशी टिकली लावून आपला लूक खुलवण्याचा प्रयत्न केलेला. तिच्या हातातील साडीला मॅच असणारा झोला आणि तिने केलेली वेणीची हेअरस्टाईलही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.