Join us  

साडी नेसताना हमखास होतात ४ चुका, साडी दिसते बेढब! पाहा साडीत सुंदर दिसण्याची युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 5:28 PM

Avoid 4 mistakes while draping saree fashion tips : साडी चापून-चोपून आणि व्यवस्थित नेसली तर त्याची नजाकत वाढते...

साडी म्हणजे महाराष्ट्रीयन महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा. एरवी भलेही आपण वेस्टर्न किंवा मॉडर्न लूक देणारे कपडे घालू पण समावाराला मात्र आवर्जून साडी नेसली जाते. आता नवरात्र काही दिवसांवर आलेले असताना साडीमध्ये पारंपरिक लूक करण्यासाठी अनेकींनी तयारी सुरू केली असेल. मग अगदी साडी खरेदी करण्यापासून ते त्यावर घालायचे दागिने, ब्लाऊज, हेअरस्टाईल अशा कित्येक गोष्टींचे प्लॅनिंग एव्हाना सुरू झाले असेल (Avoid 4 mistakes while draping saree fashion tips). 

साडी नेसायला आवडते पण नीट नेसता येत नसल्याने अनेक जणी साडी नेसणे टाळतात. तर काही जणी जमेल तशी ती गुंडाळून आपली हौस पूर्ण करतात. पण साडी चापून-चोपून आणि व्यवस्थित नेसली तर त्याची नजाकत वाढते हे नक्की. निऱ्या आणि पदर नीट बसला तर साडी शोभून दिसते. पण नेसताना आपल्याकडून सामान्यपणे काही चुका केल्या जातात, त्या कोणत्या आणि कशाप्रकारे टाळायला हव्यात याविषयी समजून घेऊया...

१. साडीचा मागचा काढ आपण निऱ्या घालताना ओढून घेतो, त्यामुळे तो काढ छान दिसतो. या काठाला आपण पिन लावतो. ही पीन कुठेही न लावता काठाच्या एकदम टोकाला लावावी ज्यामुळे काठ घट्ट बसतो आणि पाठीवरुन अजिबात सरकत नाही. 

२. निऱ्या घालताना आपण पीन लावल्यानंतर लगेचच सुरुवात करतो. पण तसे न करता बऱ्यापैकी साडीचा भाग घ्यावा आणि साधारण दुसऱ्या मांडीपर्यंत पहिली निरी घ्यावी. त्यामुळे पुढच्या सगळ्याच निऱ्या अतिशय छान येतात आणि साडी चोपून बसण्यास मदत होते.

३. निऱ्या घालून झाल्यावर शेवटच्या निरीचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण ती निरी अर्धवट राहीलेली असते. अशावेळी शेवटची निरी सोडून द्यावी आणि मग निऱ्या फायनल धराव्यात. त्यामुळे शेवटच्या निरीपर्यंत सगळ्या निऱ्या एकसारख्या दिसण्यास मदत होते. 

४. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची  गोष्ट म्हणजे निऱ्या आतमध्ये खोचायच्या आधी पायाने म्हणजेच बोटांनी त्या थोड्या खाली ओढाव्यात. ज्यामुळे निऱ्या नीट चोपून येतात आणि त्या फुगल्यासारख्या दिसत नाहीत. पायाने एकसारख्या केल्यानंतर त्या आत खोचाव्यात.  

टॅग्स :फॅशनसाडी नेसणे