उंची ही आपल्याला अनुवंशिकतेतून मिळालेली गोष्ट असते. आपले आईवडील, आजी आजोबा यांच्या उंचीनुसारच आपली उंची वाढते. त्यामुळे अनेकदा आपण उंची वाढण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फारसा उपयोग होतोच असे नाही. उंची ही गोष्ट आपल्या हातात नसलेली त्यामुळे फारसे निराश व्हायचे कारण नाही. उंच व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व प्रभाव पाडणारे असते, त्यांना कोणतीही फॅशन जास्त चांगल्या पद्धतीने कॅरी करता येते. हे जरी खरे असले तरी बुटक्या असणाऱ्या व्यक्तीही व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडू शकतात. फॅशनबाबतच्या काही गोष्टी लक्षात घेतल्यास आपली कमी असलेली उंची झाकली जाऊन आपण थोडे उंच दिसू शकतो. मात्र त्यासाठी फक्त कपड्यांची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात त्या कोणत्या पाहूया (avoid 5 Fashion mistakes for short girl)...
१. मोठ्या आकाराच्या प्रिंट असलेले आणि मोठे पोलका डॉट असलेले कपडे बुटक्या मुलींनी टाळायला हवेत. लहान प्रिंटमध्ये उंची जास्त असल्याचे दिसते पण मोठ्या प्रिंटमध्ये ती आहे त्याहून जास्त कमी दिसते.
२. सध्या फॅशन इन असलेल्या बॅगी पद्धतीच्या खूप ढगळ्या आणि पायाच्या बाजूला मोठा घेर असलेल्या पँट शक्यतो टाळायला हव्यात. त्यामुळे बुटक्या मुली आणखी बुटक्या दिसतात.
३. तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला फॅशनेबल बूट घालायचे असतील तर तुम्ही अँकल लेन्थचे शूज घालू शकता. पण पोटरीपर्यंत किंवा गुडघ्यापर्यंत उंच शूज घालू नयेत. यामुळे नकळत उंची आहे त्यापेक्षा कमी दिसते.
४. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या को ऑर्ड सेटची बरीच फॅशन आहे. हे सेट घातले की मस्त दिसतात आणि कॅरी करायलाही अतिशय सोपे असतात. पण अशा कपड्यांत बुटके लोक जास्त बुटके दिसतात त्यामुळे ते घालणे शक्यतो टाळावे.
५. पारंपरीक लूक करायचा असेल तर सलवार, प्लाझो, पतियाला आणि धोती यांसारखी फॅशन शक्यतो कमी उंचीच्या मुलींनी टाळायला हवी. त्यापेक्षा अनारकली किंवा चुडीदार हे पर्याय केव्हाही जास्त चांगले.