साडी म्हणजे अनेक मैत्रिणींचा जीव की प्राण. म्हणूनच तर कितीही जुनी झाली तरी त्यांना साडी (old printed saree) टाकून द्यावीशी वाटत नाही. आणि जुनी झाली म्हणूनच नेसावी पण वाटत नाही. कारण बऱ्याचदा बऱ्याच कार्यक्रमांना ती नेसून झालेली असते. शिवाय सगळ्यांनी पाहूनही झालेली असते. पण तरीही तिचा मोह सुटत नाही आणि त्या मोहापायी ती काही कुणाला दिली जात नाही. अशा वर्षांनुवर्षांच्या साड्या अनेक जणींनी जपून ठेवलेल्या असतात. या साड्या नेसायच्या नसतील तर त्याचा आता असा झकास उपयोग करा.. साडी तिच पण स्टाईल नवी... करून तर बघा. (latest innovative idea with your old printed saree)
१. साडीचं जॅकेट
आतमध्ये प्लेन स्लिव्हलेस ड्रेस आणि त्यावर पायघोळ प्रिंटेड जॅकेट अशा पद्धतीचा ड्रेस आजकाल बराच ट्रेण्डी आहे. तुमच्या कपाटात पडून असलेल्या एखाद्या जुन्या प्रिंटेड साडीचा अशा पद्धतीने नक्कीच उपयोग करता येईल. यासाठी साडीच्या बेस रंगाचा किंवा त्यावरचा एखादा लाईटशेड रंगाचा प्लेन कपडा आणा आणि त्याचा कुर्ता शिवा. त्या कुर्त्यावर घालण्यासाठी साडीचं मस्तपैकी जॅकेट शिवून घ्या. एकदम नवी स्टाईल.
२. पटियाला आणि ओढणी
आजकाल पटियाला स्टाईलचे पंजाबी ड्रेसही खूपच जणींच्या अंगावर दिसतात. पायघोळ पॅण्ट आणि तशाच कपड्याची ओढणी असे प्रिंटेड पटियाला- ओढणी सेटही बाजारात खूप दिसतात. तुमच्याकडच्या प्रिंटेड साडीचा अशा पद्धतीने नक्कीच वापर करता येईल. साडीचा वापर करून पटियाला शिवून घ्या आणि त्याचीच ओढणी करा. त्यावर घालण्यासाठी एखादा प्लेन कुर्ता घेतला की झाला आकर्षक ड्रेस तयार.
३. घेरदार स्कर्ट
स्कर्ट आणि त्यावर स्लिव्हलेस टॉप हा लूक अतिशय आकर्षक दिसतो. यावर जर स्टोल घेतला तर त्यामुळे तुमची ड्रेसिंग अधिकच खुलते. असाच प्रयोग तुम्ही जुन्या प्रिंटेड साडीतून करू शकता. साडीचा घेरदार स्कर्ट शिवा आणि त्याचाच एक लहानसा स्टोल बनवून घ्या. एखाद्या स्लिव्हलेस टॉपवर हा स्कर्ट आणि स्टोल घाला..
४. प्रिंटेड ब्लाऊज
प्रिंटेड ब्लाऊज आणि प्लेन साडी हा प्रकारही खूपच ट्रेण्डी दिसतो. तुमच्याकडच्या एखाद्या साडीचं छान स्टायलिश ब्लाऊज शिवून घ्या आणि त्यावर एखादी प्लेन साडी नेसा.