उन्हाळ्यात शॉर्ट्सची खूप चलती असते. त्यामुळेच या दिवसांत खरेदी करायला गेल्यास शॉर्ट्सच्या किमती दुपटी- तिपटीने वाढलेल्या असतात. शॉर्ट्स घेण्यात एवढे पैसे घालविण्याची मुळात काहीच गरज नाही. कारण थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर घरच्याघरी जुन्या जीन्स, कॉटन जीन्स किंवा ट्राऊझर्स यांचा वापर करून उत्तम शॉर्ट्स तयार करता येतील. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स..
घरच्याघरी कसे तयार करायचे शॉर्ट्स (how to make shorts from jeans)
- बरेचदा आपल्या जुन्या जीन्स वापरून वापरून आपल्याला कंटाळा आलेला असतो. किंवा मग त्या जीन्स आपण इतक्या जास्त वापरलेल्या असतात की शेवटी त्याचे उडघे पुढे आलेले, लोंबकळलेले दिसू लागतात. अशा जीन्सचा उत्तम वापर शॉर्ट्स तयार करण्यासाठी होऊ शकतो.
- लहान मुलांची उंची सारखी वाढते. त्यामुळे काही दिवसांतच त्यांना घेतलेल्या जीन्स किंवा इतर पॅण्ट त्यांना अखूड होऊ लागतात. एवढे पैसे खर्च करून घेतलेल्या पॅण्ट टाकूनही द्याव्या वाटत नाहीत. त्यामुळे मुलांना लहान झालेल्या पॅण्टचा उपयोगही त्यांना शॉर्ट्स तयार करण्यासाठी होऊ शकतो.
कशा तयार कराव्या शॉर्ट्स
- सगळ्या आधी तुम्हाला शॉर्ट्स किती लांबीची पाहिजे आहे ते ठरवा. त्यानुसार पॅण्टवर बरोबर माप घ्या.
- आता शॉर्ट्सला आपण खालून दुमडणार आहोत, शिवणार आहोत किंवा मग आवडीनुसार त्यावर काही डिझाईन करणार आहोत. त्यामुळे पॅण्ट कापताना साधारण बोटभर माप जास्तीचंच घ्या. नाहीतर ती तुमच्या अपेक्षित मापापेक्षा अखूड होईल.
- माप घेतल्यानंतर घरात असणाऱ्या एखाद्या धारदार कात्रीचा वापर करून पॅण्ट कापा...
- पॅण्ट कापली म्हणजे शॉर्ट तयार झाली असं नाही. जोपर्यंत तुम्ही कापलेल्या भागावर काहीतरी डिझाईन करत नाही किंवा तो भाग शिवत नाही, तोपर्यंत तिला आकर्षक, स्टायलिश लूक येणार नाही.
शॉर्ट्सवर डिझाईन करण्यासाठी..
१. तुम्ही कापलेल्या पॅण्टला शॉर्ट्सचा लूक देण्यासाठीचा एक जुना पण तेवढाच लोकप्रिय प्रकार म्हणजे त्या पॅण्ट खालच्या बाजूने शिवून घेणे. बोटभर माप घेऊन खालचा भाग दुमडून घ्या आणि त्याला टिप मारा.
२. दुसरा एक प्रकार म्हणजे शॉर्ट्स खालच्या बाजूने फक्त दुमडून घेणे. हा एक अतिशय सोपा आणि ट्रेण्डी प्रकार आहे. बोटभर माप घेऊन शॉर्ट्स खालून बाहेरच्या बाजूने फोल्ड करा. आणखी एक असाच फोल्ड घ्या. एका छानसा लूक येण्यासाठी अशा पद्धतीचे २ फोल्ड पुरेसे आहेत.
३. तिसऱ्या प्रकारात ब्लेडचा वापर करून शॉर्ट्सच्या खालच्या बाजूला उभे किंवा तिरके तिरके काप द्या. हे काप साधारण एक ते दिड सेमी घ्यावेत. अशा पद्धतीच्या शॉर्ट्सही ट्रेण्डी दिसतात.
४. ब्लेडने आडवे काप मारून रिप्ड शॉर्ट्सचा फिलही तुम्ही देऊ शकता.