Join us  

साडी नेसली - घागरा घातला की पोट फार दिसते? ४ टिप्स, सुटलेले पोट दिसणारच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 12:57 PM

Fashion tips for hiding belly fat in traditional ware : लठ्ठपणाची समस्या न वाटता जसे आहोत त्यात आपण स्वत:ला छान कॅरी करु शकतो.

लठ्ठपणा ही हल्ली एक मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणा हा आरोग्यासाठी फायदेशीर नसतो त्याचप्रमाणे फॅशनेबल राहण्यासाठी आणि दिसण्यासाठीही लठ्ठपणाची अडचण येते. जाड असलो की एकतर पोटावरची चरबी वाढलेली असते, दंड, मांड्या सगळेच जाड दिसत असल्याने फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत. साडीतही लठ्ठ असल्याने पोटाचे टायर्स लटकताना दिसतात. त्यामुळे वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कपडे फॅशनेबल राहताना लठ्ठ महिलांना काहीवेळा आवडीला मुरड घालावी लागते. पण जाड असूनही तुम्हाला छान आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असेल तर फॅशनच्या बाबतीतल्या काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे आपल्याला लठ्ठपणाची समस्या न वाटता जसे आहोत त्यात आपण स्वत:ला छान कॅरी करु शकतो. पाहूयात यासाठी काही खास टिप्स...

१. शेपवेअर 

बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे शेप वेअर्स मिळतात. पोट आणि मांड्यांवरची चरबी झाकली जाण्यासाठी हे शेपवेअर अतिशय उपयुक्त असतात. शेपवेअर आपल्याला पाहिजे त्या मापाचे, पद्धतीचे असतात ज्यामध्ये बॉडी शेपमध्ये दिसण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीची साडी किंवा सूट, घागरा असं काही घालणार असाल तर शेपवेअरची अतिशय चांगली मदत होते. यामुळे आपण चक्क २ ते ३ इंच नक्कीच बारीक दिसू शकतो. 

(Image : Google)

२. रंगांची निवड 

तुम्ही थोडे जाड असाल आणि तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर कपड्यांची निवड करताना गडद रंग निवडा. कपड्यांचा रंग गडद असेल तर तुम्ही नकळत बारीक दिसता. शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घातले तर तुम्ही मस्त बारीक दिसण्यास मदत होते. त्यामुळे बारीक दिसण्यासाठी कपड्यांच्या रंगाची निवड करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. 

३. सलवार कुर्ता निवडताना

जाडी कमी दिसावी असं वाटत असेल तर शॉर्ट कुर्ता न घालता अनारकली प्रकारातील कपडे घातले तर जाडी झाकली जाण्यास मदत होते. अनारकलीमुळे पोटाचा भाग चांगल्या प्रकारे झाकला जातो आणि त्यामुळे वाढलेली चरबी दिसत नाही. ए लाईन किंवा लेअर असलेले कुर्ते घालणे हा पोटावरची चरबी लपवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे.  

४. साडी नेसताना 

साडीची निवड करताना शक्यतो पातळ अशा सुती साडीची निवड करा. त्यामध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा बारीक दिसण्यास मदत होते. कॉटन, आर्गेंझा यांसारख्या साड्या दिसायला छान दिसत असल्या तरी त्यामुळे आपण विनाकारण जाड दिसतो. त्यामुळे साडीच्या कापडाची निवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास आपण बारीक दिसू शकतो. साडीची बॉर्डरही बारीक असेल असे पाहा. मोठ्या बाह्यांचे ब्लाऊज किंवा जॅकेट घातल्यास आपण आणखी बारीक दिसण्यास मदत होते.  

टॅग्स :फॅशनवेट लॉस टिप्समेकअप टिप्स