पावसाळा आला की उकाडा कमी झाल्याने आपल्याला एकीकडे छान वाटते. पावसाचा गारवा हवाहवासा असतो. मात्र तरी ऑफीसला किंवा बाहेर जाताना हा पाऊस थांबावा असं आपल्याला वाटतंच. कारण आपण घरातून आवरुन बाहेर पडतो आणि या पावसामुळे आपला मेकअप, कपडे, पाय सगळ्याची पार वाट लागून जाते. चिकचिक झाली की तर आपली चिडचिड आणखी वाढते. पण पाऊस हा अतिशय महत्त्वाचा ऋतू असून पाऊस चांगला झाला तर पिकं चांगली येतात आणि आपल्याला प्यायला आणि वापरायला भरपूर पाणी मिळू शकतं. त्यामुळे आपला अवतार करणारा हा पाऊस आपल्याला नकोसा वाटत असला तरी गरजेचा असतो. आता पाऊस तर पडणारच, त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण भर पासवातही आपल्याला छान दिसायचे असले तर ब्युटी आणि फॅशनबाबत थोडी माहिती असायला हवी (Fashion Tips For Rainy Season). आज आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे धो धो पावसातही तुम्ही आपला छान आणि सोबर लूक सहज कॅरी करु शकाल.
१. छत्री घेताना..
तुम्ही पावसाळ्यात छत्री वापरणार असाल तर थोडी गडद किंवा व्हायब्रंट रंगाची किंवा थोडं हटके डिझाईन असलेली छत्री खरेदी करा. ही छत्री सहज तुमच्या बॅगमध्ये किंवा सॅकमध्ये मावेल अशी लहान घडी होणारी घ्या. छत्री चांगल्या प्रतीची असेल तर ती लगेच तुटत नाही आणि दिर्घकाळ टिकते त्यामुळे थोडे जास्त पैसे गेले तरी किमान २ ते ३ पावसाळे जाईल अशी छत्री एकदाच घ्या.
२. रेनकोट खरेदी करताना...
रेनकोट किंवा रेनी वेअर घेताना त्याचा रंग, उंची यांकडे तर लक्ष द्याच पण त्यातून कुठे आत पाणी जात नाही ना याकडेही लक्ष द्या. रेनकोटमध्ये शर्ट-पँट बरोबरच चांगल्या प्रकारचे स्कर्टही आजकाल बाजारात सहज मिळतात. असा एखादा छानसा स्कर्ट घेतल्यास गाडीवर आपले पाय भिजणार नाहीत. पोंचू हाही अंग झाकण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. यामध्येही छान रंग आणि डिझाइन्स बाजारात मिळतात. मात्र गाडीवरुन जात असताना डोकं भिजू नये म्हणून चांगली टोपी असलेला रेनकोट बघायला हवा. तसंच गळ्याच्या भागातून हातातून पाणी आत जाणार नाही असा रेटकोट हवा.
३. ट्रेंडी आणि चांगले चपला, बूट निवडा...
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते. मग रस्त्यावरचा कचरा आणि माती यांमुळे सगळीकडे चिकचिक होते. हे पाणी पायाला लागणे आपल्याला नकोसे वाटते. मात्र त्याला काहीच पर्याय नसल्याने आपण जास्त चांगल्या चपला किंवा बूट वापरणे हा उपाय असतो. गमबूटसारखे बूट आवडत असतील तर जीन्स किंवा लेगीन्सवरही ते छान दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे आणि डिझाइनचे उंच टाचेचे बूटही सध्या बाजारात हजर झाले असून आपण पाय खराब होऊ नये म्हणून ते वापरु शकतो. बुटामध्ये पाणी तसंच राहणार नाही आणि ते वाहून जाईल असे बूट हवेत. शक्यतो चपला टाळाव्यात म्हणजे आपले कपडे चिखलाने खराब होत नाहीत. तसंच पावसाळी चप्पल किंवा बूट चावणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
४. मेकअप करताना..
पावसाळ्यात ऑफीसला किंवा बाहेर जाताना मेकअप करणे हा एक टास्क असतो. कारण पावसाने आपण थोडे भिजलो तरी हा मेकअप खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी वॉटरप्रूफ उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. पावसाच्या पाण्याने काजळ डोळ्यांखाली पसरते. त्यामुळे काजळ लावण्यापेक्षा वॉटरप्रूफ लायनर, न्यूड लिपस्टीक यांचा पावसाळ्यात वापर करावा.
५. कपड्यांबाबत ही काळजी घ्या..
पावसाचे पाणी साचले तर आपले पाय आणि पायातील कपडे जास्त ओले होतात. हे कपडे दिवसभर घेऊन बसणे शक्य नसते. त्यामुळे अस्वस्थ तर होतेच पण आपण आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे थ्री फोर्थ पँट किंवा अँकल लेन्थ लेगीन्स वापरा. शक्यतो पातळ कपडे घाला जेणेकरुन ते पटकन वाळतील. पावसाळ्यात ऑफीसमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये किंवा बॅगमध्ये कायम आतले कपडे आणि बाहेरचा ड्रेस यांचा एक सेट ठेवा. म्हणजे आपण पावसात जास्तच भिजलो तर ऑफीसला किंवा कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर ओलं न राहता कपडे बदलता येतात.