गुढी पाडवा (Gudhi Padwa) म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या हा सण सेलिब्रेट करायचा म्हणजे नटणेथटणे तर आलेच. मराठी वर्षातील पहिल्या सणाला मराठमोळा साज तर हवाच. गुढी उभारताना आपणही छान दिसायला हवे त्यासाठी या दिवशी आपण आवर्जून पारंपरिक पोषाख करतो. यंदा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही नऊवारी साडी नेसायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने नऊवारी साडी कशी नेसायची हे सांगणार आहोत. कारण नियमितपणे नऊवारी साडी नेसणाऱ्या महिलांची संख्या आता कमी होत असून आता फॅशन म्हणून किंवा एखाद्या खास समारंभासाठी नऊवारी साडी नेसली जाते. त्यामुळे नऊवारी म्हटली की आपल्याला घरातील आजी किंवा पार्लरवाली यांची मदत लागते.
कोणतीही साडी परफेक्ट नेसली गेली तरच त्याच आपण खुलून दिसतो. नाहीतर एकतर साडीचा बोंगा तरी होतो किंवा या कपड्यांमध्ये आपण अस्वस्थ होतो. यासाठीच आम्ही नऊवारी नेसायची सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी गौरी मुळे हिने झटपट आणि सोप्या पद्धतीने नऊवारी नेसायच्या स्टेप्स नक्की पाहा. सुरुवातीला साडीला गाठ मारण्यापासून ते साडीचा ओचा, पदर सगळं व्यवस्थित राहावं यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरु शकेल आणि अगदी कमीत कमी वेळात तुम्ही घरातील व्यक्तीच्या मदतीने सहज नऊवारी साडी नेसू शकाल.
साडी नेसणं ही एक कला असून तुम्हाला मुळात साडी आवडत असेल तर ती तुम्ही अतिशय आवडीने पेशन्स ठेऊन छान पद्धतीने नेसू शकता. पण तुम्हाला मूळात साडीची आवड नसेल तर मात्र ती नेसताना तुम्ही गुंडाळल्यासारखी नेसता आणि मग तुमच्या लूकची पार वाट लागून जाते. मात्र सणावाराला किंवा ए्खाद्या समारंभाला तुम्हाला परफेक्ट लूक हवा असेल तर तुम्हाला त्यासाठी साडी नेसायची कला शिकून घ्यावी लागेल यात वाद नाही. आपली परंपरा आणि नऊवारी साडीचा ट्रेंड कायम ठेवायचा असेल तर काय नऊवारी नेसण्याची ही कला यायलाच हवी.