Join us  

सनग्लासेस विकत घेताय? ५ गोष्टी चेक कराच, फेक सनग्लासेस खरेदी केले तर होतात गंभीर आजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 7:20 PM

Summer Special Tips : 5 Things To Keep In Mind While Buying Sunglasses : यंदाच्या उन्हाळ्यांत सनग्लासेस खरेदी करणार असाल तर या ५ टिप्स आपल्या नक्की लक्षात ठेवा.

उन्हाळ्यांत घराबाहेर पडताना आपण आवर्जून पाण्याची बाटली, रुमाल, छत्री, सनग्लासेस या सगळ्या गोष्टी आठवणीने घेतो. उन्हाळ्यांत आपले शरीर तर कपड्यांनी झाकलेले असते, परंतु डोळ्यांचे काय? ते तर कायम प्रखर सूर्यप्रकाश झेलत असतात. अशावेळी प्रखर सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस महत्वाची भूमिका बजावतात. सनग्लासेस किंवा गॉगल ही फॅशन या प्रकारांत मोडणारी एक महत्वाची वस्तू होती, परंतु आज ती फॅशनबरोबरच अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. 

 खरंतर सनग्लासेस ही एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उन्हाळ्यात डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरायला पाहिजे. सनग्लासेस हे प्रामुख्याने उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी वापरले जातात. परंतु आपण कधी कधी स्टायलिंगचा किंवा फॅशनचा विचार करुन सनग्लासेसची खरेदी करतो. या स्टायलिश फ्रेम्समुळे किंवा लेंन्समुळे काहीवेळा आपल्याला सनग्लासेस वापरणे अवघड जाते. अशावेळी यंदाच्या उन्हाळ्यांत आपण देखील सनग्लासेस खरेदी करणार आहात तर या ५ टिप्स आपल्या नक्की कामी येतील(How To Choose The Best Sunglasses For Eye Health).  

सनग्लासेस विकत घेताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात... 

१. सनग्लासेसचा शेप लक्षात घ्या :- आपल्यासाठी सनग्लासेस विकत घेताना आपल्या चेहेऱ्याच्या आकाराचा विचार करूनच मग सनग्लासेसची खरेदी करावी. कारण बरेचदा असे होते की, आपण आपल्यासाठी सनग्लासेस विकत तर घेतो परंतु ते आपल्या चेहऱ्याला शोभून दिसत नाहीत. आजकाल आपल्याला  सनग्लासेसचे अनेक प्रकार बाजारात आणि ऑनलाइन विविध शॉपिंग वेबसाईट्सवर पाहायला मिळतील. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार सनग्लासेसचे रंग, आकार निवडू शकतो. सनग्लासेस खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी त्याचा आकार असा असावा की, आपल्या डोळ्यांचा भाग या सनग्लासेसने संपूर्णपणे झाकला जाईल याची खात्री करावी. 

२. सनग्लासेसचे लेंन्स :- सनग्लासेसची खरेदी करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सनग्लासेसचे लेंन्स. सनग्लासेसचे लेंन्स जितके पातळ असतील तितके ते आपल्यासाठी चांगले असतात. सनग्लासेसचे लेंन्स जितके पातळ तितके ते सूर्यप्रकाश परावर्तित करण्यास अधिक सक्षम असतात. पातळ सनग्लासेसचे लेंन्स सूर्यप्रकाश लगेच परावर्तित करुन, प्रखर उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करतात. यासाठीच सनग्लासेसची निवड करताना त्याच्या लेंन्स जाड नसून पातळ असतील हे एकदा तपासून पहावे. सनग्लासेसच्या लेंन्स सोबतच सनग्लासेसच्या फ्रेमचा देखील विचार केला पाहिजे. जड किंवा जास्त हेव्ही फ्रेम्स व लेंन्स असलेल्या सनग्लासेसची निवड केल्यास ते परिधान केल्यानंतर आपल्याला डोळ्यांजवळील भागात जास्त घाम येऊ शकतो. यासासाठीच सनग्लासेसचे लेंन्स व फ्रेम्स या जास्त जड नसून हलक्या व पातळ असाव्यात. जर आपण स्टील फ्रेम्स असलेला सनग्लासेस विकत घेतला तर ही स्टील फ्रेम उन्हांत तापून खराब होऊ शकते तसेच आपल्या त्वचेवर याचे काळे डाग पडून तिथली त्वचा खराब होऊ शकते. यासाठी पॉलीकार्बोनेट, प्लास्टिक व नायलॉन यांसारख्या घटकांपासून तयार झालेल्या सनग्लासेसच्या फ्रेम्स निवडाव्यात. 

३. सनग्लासेसची वॉरंटी तपासून घ्यावी :- उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करणारे सनग्लासेस खरेदी करताना ते आपल्या डोळ्यांसाठी कसे फायदेशीर आहेत याचा विचार सर्वप्रथम करावा. आपल्याला आवडलेले सनग्लासेस विकत घेण्यापूर्वी ते एकदा प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांवर घालून पाहावेत. हे सनग्लासेस डोळ्यांना लावल्यावर आपल्याला प्रखर उन्हापासून आराम व संरक्षण मिळते का याची खात्री करुन घ्यावी. आपण कोणत्या प्रकारातील किंवा आपल्या आवडीचे सनग्लासेस घेणार हे नक्की झाल्यावर एकदा त्याची वॉरंटी तपासून घ्यावी. 

४. डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे :- सनग्लासेसची खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच महत्वाचे आहे. जर आपल्याला चष्मा असेल किंवा आपल्या डोळ्यांच्या दृष्टीमध्ये काही बिघाड असल्यास डॉक्टरांच्याच सल्ल्याने सनग्लासेसची खरेदी करणे उपयुक्त ठरते. सनग्लासेस विकत घेताना अशा सनग्लासेसची खरेदी करावी की जे, ९९% ते १००% यूवीए आणि यूवीबी किरणांना प्रतिबंधित करतील. रॅप अराऊंड सनग्लासेस आपल्या डोळ्यांच्या चारही बाजुंनी प्रखर सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. 

५ डोळ्यांच्या आजारांपासून सावधानता बाळगा :- उत्तम किंवा चांगल्या दर्जाचे सनग्लासेस घातल्याने डोळ्यांच्या अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. डोळ्यांशी संबंधित अनेक आजार आहेत जे सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होऊ शकतात. सूर्यकिरणांच्या असुरक्षित संपर्कामुळे डोळ्यांचे अनेक आजार होण्याची शक्यता असते, आणि याचा थेट आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यांत सनग्लासेस वापरणे हा उत्तम पर्याय आहे.

 

टॅग्स :फॅशनडोळ्यांची निगा