Join us  

सणावाराला सिल्कची साडी नेसा फक्त ५ मिनिटांत, ८ टिप्स-झटपट साडी नेसून नटूनथटून व्हा रेडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 6:39 PM

Tips to drape perfect silk saree : Here are some tips for draping a silk saree : How to drape a silk saree perfectly : अगदी सहज सोप्या पद्धतीने कमी वेळात परफेक्ट पद्धतीने सिल्कची साडी नेसण्यासाठी उपाय...

सणवार, घरातील खास प्रसंग, समारंभ, विशेष कार्यक्रम असला की सगळ्याचजणी साडी नेसण्याला प्राधान्य देतात. अशा खास प्रसंगांना आपण उठून दिसावे म्हणून स्त्रिया आपल्या खास ठेवणीतल्या भारीतल्या साड्या नेसणे पसंत करतात. शक्यतो भारीतल्या ठेवणीतल्या काठापदराच्या साड्या या सिल्क आणि इतर महागामोलाच्या कापडांच्या असतात. या सिल्कच्या साड्या आपण काही खास प्रसंग असेल तरच नेसतो. परंतु शक्यतो सिल्कच्या साड्या नेसताना आपल्याला अनेक अडचणी येतात. या साड्या नेसताना काहीवेळा खूप फुलतात किंवा त्या व्यवस्थित बसत नाही त्याचबरोबर या सिल्कच्या साड्यांचा पदर किंवा निऱ्या काढताना आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावीच लागते(Tips to drape perfect silk saree).

काहीजणी तर या सिल्कच्या साड्या व्यवस्थित नेसता येत नाही म्हणून त्या नेसणेच टाळतात. सिल्कच्या साड्या नेसताना त्या खास वेळ काढून अगदी व्यवस्थित नेसल्या तरच त्या साडीची सुंदरता अधिक खुलून येते, आणि तुमचा लुकदेखील परफेक्ट दिसतो. सिल्कच्या साड्या नेसणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम असते परंतु त्या जर का व्यवस्थित नेसल्या तर अगदी सुंदर आणि साजेशी अशी साडी दिसते. त्यामुळे या श्रावणात येणारे सणवार किंवा इतर खास प्रसंगांच्यावेळी सिल्कची साडी नेसताना आपण काही सोप्या (How to wear very heavy silk saree perfectly) टिप्स लक्षात ठेवूयात. जेणेकरुन या टिप्सचा वापर करुन आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने कमी वेळात परफेक्ट पद्धतीने सिल्कची साडी नेसू शकतो. या टिप्सचा वापर केल्याने अगदी १० मिनिटांतच आपण झटपट सिल्कची साडी नेसून तयार व्हाल(How to drape a silk saree perfectly).

सिल्कची साडी नेसल्यासाठी खूप वेळ जातो त्यासाठीच या टिप्स... 

१. सिल्कची साडी नेसण्याआधी साडीला नीट इस्त्री करुन घ्यावे. इस्त्री किंवा आपण स्टिम प्रेसचा वापर करु शकतो.  इस्त्री किंवा आपण स्टिम प्रेस केल्याने साडीवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. तसेच साडी व्यवस्थित इस्त्री केलेली असली तर ती नेसताना देखील काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि साडी अंगाला अगदी चापूनचोपून बसते. 

२. सिल्कची साडी नेसताना परकर नीट व्यवस्थित घट्ट बांधला आहे ना याची खात्री करुन घ्यावी. तसेच परकर खूप खाली बंधू नका, कारण काहीवेळाने साडी तिच्या वजनामुळे खाली घसरण्याची शक्यता असते. 

३. साडी नेसायला सुरुवात करताना सर्वात आधी खोचताना त्या ठिकाणी साडीच्या कोपऱ्याची बाजू धरुन एक गाठ मारा. त्यामुळे साडी कितीही ओढली गेली तरीही सुटणार नाही. या एका बांधलेल्या गाठीमुळे तुम्ही सेफ रहाल. 

४. आपण समारंभात शक्यतो सिल्कची हेवी साडी नेसणार असलो तर अश्या सिल्कच्या साडीचा काठ थोडा जाड असण्याची शक्यता असते. अशावेळी साडी खोचताना एकदम एकसारखी खोचा, जेणेकरुन ती फुगल्यासारखी वाटणार नाही. 

५. साडीच्या पुढच्या भागाच्या निऱ्या घातल्यानंतर वरती हातात असलेला भाग आपण आतमध्ये खोचतो. त्यावेळी त्या भागाला एकत्रित पीन लावून मगच आत खोचा म्हणजे तो एकसारखाच आत जाईल आणि पोटापाशी बोंगा असल्यासारखे दिसणार नाही. 

६. सिल्कची साडी असल्याने ती जास्त सुळसुळीत असेल तर पदराला पीन लावला तरीही पुढच्या बाजूने पदर सतत खाली येण्याची शक्यता असते. यामुळे पदराच्या छातीवरील प्लेट्स व्यवस्थित दिसत नाही. त्यावेळी छातीपाशी दोन ते तीन पदर एकत्र घेऊन लक्षात येणार नाही अशी एखादी पीन लावावी. त्यामुळे पदर एका जागेवरच राहण्यास मदत मिळते आणि या ट्रिकमुळे सुळसुळीत सिल्कच्या साडीच्या पदर अगदी झटपट लावून होतो. 

७. सिल्कची साडी नेसल्यानंतर काहीवेळा ती फुगल्यासारखी दिसू शकते त्यामुळे ती कडक इस्त्रीची असणे गरजेचे असते. साडी नेसण्यापूर्वी तुम्ही पदराच्या निऱ्या घालून  त्याला पीन लावून इस्त्री करुन ठेवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि साडीही झटपट नेसून होईल. 

८. साडी नेसताना आपण अनेकदा प्लीट्स बनवतो. पण सिल्कची साडी नेसताना तुम्हाला आधीच प्लीट्स बनवाव्या लागतील. यासाठी साडीला नीट इस्त्री करुन घेतल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार प्लीट्स बनवा. यानंतर त्यांना पिनच्या मदतीने सेट करा. आता त्या प्लीट्सना पुन्हा एकदा इस्त्री करुन घ्यावी. यामुळे या प्लीट्स एकसमान दिसण्यास मदत होईल. तसेच यामुळे तुम्हाला साडी नेसण्यासाठी कमी वेळ लागेल. याशिवाय साडी नेसताना तुम्हाला कोणाची मदत देखील घ्यावी लागणार नाही. 

या सोप्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करुन आपण सिल्कची साडी अगदी कमी वेळात पटकन नेसून तयार होऊ शकता.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्ससाडी नेसणे